मिकी
मिकी
वडिलोपार्जित व्यवसाय असताना तो पुढे सुरू न ठेवता मुलाला स्वत:चं काही तरी वेगळं करायचं आहे, ही झाली घराघरांत दिसणारी एक सिच्युएशन. पण यावर किती वेगळ्या पद्धतीनं विचार होऊन काय काय होऊ शकतं, हे आपण अनेक सिनेमांमधून बघितलं आहे. मग त्यात येणारी रडारड, नको इतके इमोशनल सीन हे सगळं आलंच. नाटकातही त्याला वेगळा अपवाद येणार नाही, असं वाटत होतं. पण ‘मिकी’ हा एक स्ट्राँग अपवाद आहे. मुळात ‘मिकी’मध्ये अशी काही स्टोरी असेल, हेच मुळात वाटलं नव्हतं.
सन १९८४मध्ये पुणे शहरात केशकर्तनालय (सलून) कसं असेल, त्याचा उत्तम सेट पडदा उघडल्यावर आपल्या समोर येतो. सखाराम (विराजस कुलकर्णी) यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा केशव (शिवराज वायचळ) हा व्यवसाय व्यवस्थित सांभाळतोय. त्याला अँथनी (सूरज पारसनीस) हा मित्रही मदत करतोय. दुकानाच्या जागेचा मालक पैशांचा तगादा लावत असल्यानं सखाराम आणि केशव त्रस्त आहेत. यावर उपाय आहे; पण त्यांच्या हाताला तो सहजासहजी लागणारा नाही. त्यांच्या एका चुलत भावाच्या नावावर बरीच प्रॉपर्टी आणि रक्कम सखारामच्या वडिलांनी करून ठेवली आहे. पण तो बेपत्ता आहे. त्यात केशवची वेगळी स्वप्नं आहेत. त्याला स्वप्ननगरी मुंबई साद घालत आहे. पण हे वडिलांना सांगायचं कसं, हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर आहेच. या सगळ्यात एक घटना घडते आणि या त्रयीच्या हाती एक ‘बॉडी’ येते. त्यांच्या दुकानात केस कापायला इन्स्पेक्टर वाघमारे (ओंकार गोखले) नेहमी येत असतात. त्यांना याच्याबद्दल काही कळतं का? सखाराम आणि केशवचं नातं पुढं कसं जातं? त्यांना पैसे मिळतात का? अँथनीचा रोल नेमका काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाटकाचा पुढचा शो जेव्हा असेल, तेव्हा न चुकता जायला पाहिजे.
नाटकात ओंकारचं कॅरेक्टर छान जमून आलं आहे. शिवाय त्याची आणि सूरजची केमिस्ट्री मस्त दाखवली आहे. जे प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला घडत असतं, त्याची किळस का यावी, हा प्रश्न त्यांची ’के(स)मिस्ट्री’ बघून पडतो. सूरजनं त्याच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे; शिवाय त्याला वेशभूषाकाराचीही चांगली जोड आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून शक्यतो समोर येणारा विराजस या नाटकात ज्येष्ठ व्यक्तीच्या भूमिकेत कॉमेडी करतोय. ते पाहण्यासारखं आहे. शिवराजनं नेहमीप्रमाणं उत्तम काम केलं आहे. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या माणसाचं काम तो फार छान करतो. त्याचा प्रत्यय ‘भंवर’मध्येही आला होता. गौरव बर्वेचं पात्र आणखी खुलायला हवं होतं. त्याच्याबद्दल आणखी काही तरी सांगायला हवं होतं असं वाटतंय.
मुळात थिएट्रॉनच्या नाटकांत एक मेन पात्र आणि बाकी सहायक असा प्रकार नसतो, हे माझं निरीक्षण आहे. संवाद, सीन कमी जास्त असतातच. पण सगळी पात्रं मुख्यच असतात. त्या सगळ्यांमुळं गोष्ट पुढं जात असते. या नाटकातली गोष्ट, संवाद, गाणं, बाकी म्युझिक आणि सगळे सहकलाकार अतिशय छान आहेत. फुल पॅकेज बघताना अजिबात बोअर होत नाही. नाटकाचा जॉनर ब्लॅक कॉमेडी असल्यानं ते पाहताना कंटाळा आला नाही. पण शेवट थोडा खेचल्यासारखा वाटत होता. लवकर संपलं असतं, तरी मजा ‘कॉम्पॅक्ट’ झाली नसती हे नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा