वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर


वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर

गेल्या काही वर्षांपासून लग्न जमणं आणि मग ते टिकवणं हे एक टास्क झालं आहे. आता मात्र लग्न जमणं हेच एक टास्क आहे. मुला-मुलींची वयं वाढत जातात आणि मग लग्न जुळवणं ही त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरच्यांची, विशेषतः आयांची डोकेदुखी होऊन बसते. मग ही मुलं-मुली वेगवेगळ्या आयडिया काढतात. काही वेळा त्यातून इगो जपला जातो; पण सुख मिळेलच याची शाश्वती नसते. असे काही उपाय करून झाल्यावर किंवा कोणाचे तरी ऐकून/बघून झाल्यावर एक रिअलायझेशन होतं आणि तेच महत्त्वाचं ठरणारं असतं, असं माझं मत आहे.
‘वरवरचे वधूवर’ या दोन अंकी नाटकाची थीम हीच आहे. नाटकाची सुरुवात होते, तीच फोर्थ वॉल मोडून. नायिका विशाखा (सखी गोखले) मंचावर येते, तेव्हाच कळतं, की हे काही नेहमीसारखं नाही. काही तरी वेगळं घडणार आहे. समजायला आणि उच्चारायला अतिशय क्लिष्ट असं तिचं प्रोफेशन असतं. नाटकातला नायक मोहितचंही (सुव्रत जोशी) तेच प्रोफेशन असतं. आता कसंय... मालिकांमध्ये नायक नायिका भेटणार हे आपल्याला माहिती असतं. पण ते कसे भेटणार आणि गोष्टीचा शेवट होण्यापूर्वी त्यांच्यात काय गोष्ट घडणार याची आपल्याला उत्सुकता असते, म्हणून तर ती मालिका बघितली जाते ना... पण नाटकात काही तरी वेगळं घडलं पाहिजे असा आपला कयास असतो. तोच खिळवून ठेवण्यात हे नाटक यशस्वी झालं आहे. म्हणजे ‘वधूवर’मधले नायक-नायिका एकत्र यावेत ही आपली इच्छा ते दोघं भेटल्यापासून असते. पण आपली इच्छा पूर्ण होणार की नाही, हे कळण्यासाठी शेवटपर्यंत नाटक बघायला पाहिजे. सस्पेन्स चांगला जपला आहे. ट्विस्ट अँड टर्न्सही आहेत.


प्रत्येक गोष्टीत नायक आणि नायिका यांचं जुळवून देणारा-देणारी असा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाचा तरी सहभाग असतोच असतो. हे नाटकही त्याला अपवाद नाही. पण अर्थात ही काही टिपिकल स्टोरी नाही. मग त्याला हे पात्र तरी कसं अपवाद असेल? पांडा (सूरज पारसनीस) या दोघांना कंपनीकडून मिळालेल्या घरांचा मालक कम केअरटेकर असतो. आता असे लोक काय प्रकारे धमाल उडवून देऊ शकतात, त्याची कल्पना आपण अनेक सिनेमे बघितल्यानं करूच शकतो. पण इथं पांडा त्याला अपवाद आहे. तो आपल्या कल्पनेपेक्षाही पुढची धमाल करतो.
विशाखा आणि मोहित हे दोघं त्यांच्या त्यांच्या कंपनीकडून पाचगणीमध्ये आलेले असतात. त्यांचा कायमस्वरूपी फिरतीचा जॉब असतो. त्यांचा घरमालक असतो पांडा. तो या दोघांना एकत्र आणण्यात काय करामत करतो, हे नाटकात बघावं लागेल. हे दोघंही लग्नाला योग्य असतात. आपापल्या आयांशी ते फोनवरून नाटकभर बोलत असतात. त्यांची लग्नं का होत नसतात, ते आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातं. या बोलण्यामधून पूर्वीची पिढी आणि आताची पिढी यांच्यातली ‘लग्न’ या विषयाबद्दलची मतं आपल्यासमोर येतात. त्यामुळं हे नाटक लग्नाचा विचार करणाऱ्यांसाठी, लग्न करणाऱ्यास इच्छुकांसाठी (पार्टनर शोधणाऱ्यांसाठी), नुकतंच लग्न झालेल्यांसाठी आणि लग्नाला अनेक वर्षं झालेल्यांसाठी अशा सर्व वयोगटांतल्या लोकांनी बघावं असं आहे.
नाटकाचा सेट छोट्या घराचा; पण अत्याधुनिक विचारांनी तयार केलेला आहे. त्यात सगळे ‘ॲस्थेटिक्स’ अगदी व्यवस्थित जपलेले आहेत. लेखक आणि दिग्दर्शक विराजस कुलकर्णीनं त्याचा अगदी बारकाईनं विचार केलेला आहे, हे प्रत्येक वेळी जाणवत राहतं. पाचगणीसारख्या डोंगरावर असलेल्या ठिकाणच्या लहानशा बिल्डिंगमध्येही अत्याधुनिक सोयी असतात; पण त्यात रेंजसारख्या मर्यादा येऊ शकतात, हे त्यानं विशिष्ट पद्धतीनं दाखवलं आहे. त्यामुळं नाटकात प्रसंगानुरूप आपसूक विनोदनिर्मिती होते. ती ओढूनताणून केलेली वाटत नाही. काही विनोदांबाबत किंवा संवादांबाबत माझं मत थोडं वेगळं आहे. मला वैयक्तिक ते आवडलेले नसले, तरी प्रेक्षकांना ते अतिशय आवडल्याचं दिसत होतं. नाटकात प्रसंगानुरूप गाणी आलेली आहेत. ती आपण नाटक संपल्यानंतरही गुणगुणत राहतो, इतकं त्याचं संगीत सुंदर झालेलं आहे. त्यावर बसवलेला डान्सही अतिशय सुंदर आहे.
विशाखा, मोहित आणि पांडा या तिघांचीही एनर्जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहते. हे दोन अंकी नाटकासाठी सोपं नाही. कुठेही ढिले पडत नाहीत हे तिघे. नाटकाचा शेवट मला वास्तवाला धरून वाटला नाही. कारण माझ्या माहितीतल्या ९० टक्के लोकांमध्ये असं झालेलं नाही. पण नाटकात जे झालं, ते तसंच व्हायला पाहिजे होतं, हे वाटणं महत्त्वाचं आहे. उगाच ते रिॲलिस्टीक करायला गेले असते, तर मला कदाचित कमी आवडलं असतं.
नाटकात विचार करायला लावणारे अनेक संवाद आहेत, प्रसंग आहेत. त्यामुळं नाटकाचं नाव ‘वरवरचे वधूवर’ हे केवळ दोन मुख्य पात्रांतल्या ‘ठरावा’मुळं दिल्यासारखं नाटत आहे. संपूर्ण नाटकाचा विचार करायचा झाल्यास ‘वरवरचे वधूवर’ असं नाव न ठेवता ‘खोलवरचे वधूवर’ असं नाटकाचं नाव असावं या मताचा मी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे