नैराश्याची सोशल जाहिरात
'खूप वाईट वाटतंय. निराश झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळं काय करावं हे सुचत नाहीए,' अशा आशयाची एक पोस्ट समाजमाध्यमावर वाचली; पण त्यावर असंख्य लाइक्स दिसले. त्या पोस्टवर 'काय झालं' अशा अर्थाच्या कमेंट कमी होत्या. किती लोकांनी त्या पोस्टकर्त्याला भेटून कारण विचारलं असेल किंवा निदान फोन केला असेल? या अशा प्रकारच्या अनेक पोस्ट्स आजकाल 'व्हायरल' झालेल्या दिसतात. त्यांना लाइक्स भरपूर असतात; पण खरी मदत किती मिळते, हा चर्चा करण्याचा विषय आहे. मुख्यतः या पोस्ट्स स्क्रोल केल्या जातात. मुळात आपल्याला एवढं निराश झाल्यासारखं वाटतंय, तर आपण आपल्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी का बोलत नाही? जर यांपैकी कोणाशी संवाद साधायला लाज किंवा संकोच वाटत असेल, तर एखाद्या समुपदेशकाची मदत घ्यायला काय हरकत आहे? आजकाल विशेषतः तरुणाईमध्ये लहान सहान गोष्टींवरून नाराज होण्याचं आणि निराश होण्याचं वाढतं प्रमाण आहे. बऱ्याच वेळा कुटुंबासोबत साध्या कारणावरून वाद झाला की नाराजी, कधी छोटं जरी अपयश आलं की नाराजी किंवा रोज बोलणारी एखादी व्यक्ती बोलली नाही की लगेच नाराजी व्यक्त केली जाते. या नाराजीलाच का...