शर्माजी का लड़का





आठवले का मिम्स? व्हॉट्सॲपवर फिरणारे मेसेजेस? कधी काळी जाहिरातीतही ‘शर्माजी का लडका’ची कन्सेप्ट प्रचंड फेमस होती. त्यातून मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये होणाऱ्या तुलनेवर बोट ठेवलं होतं. त्याचाच आधार घेऊन थोडं मनात आलं ते मांडतो. मात्र, मला जे म्हणायचं आहे, ते फक्त मुलाला लागू होणार नाही. त्यात मुलगीही येणार. म्हणून आता लिहिताना मला आणि वाचताना तुम्हाला सोपं जावं असा विचार करून तरुणी किंवा तरुण, मुलगा किंवा मुलगी असं प्रत्येकवेळी उलगडून न सांगता लिखाणाच्या सोयीसाठी म्हणून मुलं, मुलाला असे उल्लेख करतो.

तर... मध्यमवर्गीय पालक, त्यांची मुलं, मुलांचं शिक्षण आणि त्यांच्यावर असणारा ताण याबाबत थोडं बोलायचं होतं. आपण कितीतरी वेळेला वाचतो किंवा आजूबाजूलाच बघतो की, 

१. ‘रिक्षावाल्याचं मूल अमुक झालं’

२. ‘घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मुलानं अपरिमित कष्ट करून पटकाविली तमुक पोझिशन’

३. ‘श्रीमंत आईवडील असूनही त्यांचा मार्ग सोडून वेगळा मार्ग निवडला आणि ते मूल झालं आणखी काहीतरी’ 

अशी हजारो उदाहरणं देता येतील; पण ती फक्त गरीब आणि श्रीमंत या दोघांबाबतच सीमित राहतील. उरला कोण, तर मध्यमवर्ग. तोसुद्धा आहेच की हो या जगाच्या पाठीवर कुठंतरी! त्यांच्याबाबत का बोललं जात नाही? त्यांची पोरंही परिस्थितीशी झगडून जातात की वर, मिळवतात की पैसे, कमावतात की नाव. मी तर म्हणतो, की अशा घरातल्या मुलांच्या खांद्यावर घराचं ओझं आणि मनावर प्रचंड ताण असतो. त्यांनी समजा काही चूक केली, तर खापर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर फुटतं. या उलट त्यांनी काही करून दाखवलं तर ‘मग त्याला सपोर्ट होता ना, मग करणारच की’ हे ऐकावं लागतं. यात वादाचे मुद्दे असतातच खूप. अनेकदा या तीनही स्तरांवर अपवादही असतात; पण जगाच्या डोक्यात काही गोष्टी फिक्स असतात. 

१. गरिबाघरचा कुठं वर आला तर कौतुक; नाही आला तर, ‘त्याला किती कष्ट होते,’ असं म्हणायचं. 

२. श्रीमंताघरचा कुठं वर आला, तर ‘त्याच्या घरच्यांकडं पैसा आहे, त्याला आणणारच वर,’ असं म्हणायचं. नाही आला तर, ‘त्याला काय शेवटी तेच (दुकान, व्यवसाय इ.) बघायचं होतं. मग असेना का तसाच,’ असं म्हणायचं. 

पण ३. मध्यमवर्गातल्या पोरांनी वर यायलाच हवं. तशी ती आली तर, ‘यायलाच हवं होतं. वर आली नसती, तर काय केलं असतं,’ असं म्हणायचं. नाही आले तर, ‘घरच्यांचे कष्ट वाया घालवले,’ असं म्हणायचं.

आता यातही फक्त ‘मध्यमवर्गीय’ असा गट नाही. त्यातही ‘निम्न मध्यमवर्गीय’, ‘मध्यमवर्गीय’ आणि ‘उच्च मध्यमवर्गीय’ असे प्रकार आहेत. कायम भरडले जाणारे हे तीन वर्ग. आपण सध्या एकत्रितपणे यांना फक्त ‘मध्यमवर्गीय’ म्हणू. या वर्गातल्या कुटुंबाच्या त्यांच्या पोरांकडून अपेक्षा भरपूर असतात, ज्यात काहीही वावगं नाही. शिवाय या असं वाटण्यात त्यांचा काहीच दोष नाही; कारण ते कुटुंबीय समाजात वावरताना इतर दोन वर्गांमधल्या पोरांची कौतुकं ऐकत असतात. 

‘गरीब वर्गापेक्षा आपल्याकडं जरा जास्त आहे. मग त्यांची पोरं यशस्वी होत असतील, तर आपली का नाही?’, या उलट ‘श्रीमंतांकडं आपल्यापेक्षाही जास्त असून, आपण त्यांच्या पुढं जाऊ शकतो, तर का नाही जायचं’ हे विचार त्यांच्या मनात येणं स्वाभाविक कसं आहे, ते त्यांच्या जागी जाऊन उभं राहिल्याशिवाय समजणार नाही. ही एक स्पर्धा असते; पण त्यात हेतू वाईट नसतो. कुठल्याही आई-बापाला ‘आपलं पोर पुढं जावं’ असंच वाटत असतं. त्याची वाट लागावी, असं त्यांना कधीच वाटत नाही; पण याचा पोरावर ताण येतो. आता हे झालं फक्त बाहेरच्या लोकांबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत; नात्यातल्या नात्यात होणाऱ्या तुलनेबाबत नकोच बोलायला.

आलेला हा ताण काही पोरं सहन करू शकतात, काही मित्र-मैत्रिणींबरोबर बोलून मिटवतात; पण काही जण एकटेच असतात. त्यांना कोणाशीच अशा गोष्टी बोलता येत नसतात. त्यामुळं त्यांना हे अजिबात सहन होत नाही. याचं मूळ पुन्हा आधीच्या वाक्यांमध्ये आहे. पोराचे आई-बाप जसे गरीब-श्रीमंतांमध्ये वावरतात, तशी पोरंही वावरत असतातच की त्यांच्यात. त्यांनाही दिसत असतात की काही गोष्टी. मी तर म्हणेन, की त्यांना जरा जास्त दिसत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी ते घरात सांगू शकत नाहीत. उलट बरेच जण बाकी दोन गटांमध्ये आपण वेगळे दिसणार नाही, याची काळजी घेत बरोबरच्यांशी ‘त्यांच्याप्रमाणं’ वागायला जातात आणि इथंच फसतात.

लहानपणी बेडूक आणि बैलाची गोष्ट त्यांनी ऐकलेली असते; पण ती नेमकी आत्ताच विस्मरणात जाते. ‘गरिबांसमोर आपण श्रीमंत नको दिसायला’ आणि ‘श्रीमंतांसमोर गरीब नको दिसायला’ या फालतू गोष्टींमध्ये ते अडकतात. त्यामुळं आपण काय करायला हवं आहे, ते विसरून जातात. काही जण पुन्हा रुळावर येत नाहीत, तर काहींना वेळ लागतो. अर्थात, यालाही अपवाद आहेतच.

मध्यमवर्गीय पोरांवर ‘समाज काय म्हणेल’, ‘घरचे काय म्हणतील’ या गोष्टींचं टेन्शन सतत असतं. या सगळ्या गोष्टी ते बोलू शकत नाहीत. ज्यांच्याशी बोलतात, त्यांनाही कमी अधिक प्रमाणात त्याच समस्या असतात. मग ‘सगळीकडेच असं असतं,’ असं म्हणून या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात. त्यामुळं दुर्दैवानं त्यांना पळ काढायची सवय लागते. शिक्षणाच्या बाबतीतही हेच होताना दिसतं; पण पोरांनी पळ काढला. तरी लोक असतातच की बोलायला. मात्र, अजून इथं कुठंही सोशल मीडियाचा उल्लेख केलेला नाही. त्या अनुषंगानं येणारी स्पर्धा (गर्लफ्रेंड, हॉटेलिंग, डेटिंग, व्यसनं) इथं सांगितलेली नाही. फक्त या मध्यमवर्गीय पोरांना समजावून सांगायला हवं. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही; मात्र हे सगळं त्यांना उघडपणे बोलून दाखवलं, तर ती दूर पळतील. त्यांच्याशी अशा गोष्टी बोलताना इन्डायरेक्टली सांगायला हव्यात. तर, आणि तरच काहीतरी बदल घडेल. पण आजकाल असे महत्त्वाचे विषय बोलायला वेळ नाही कोणाकडे. राजकारण आणि जातपात यांवर बोलायचं असेल तर सांगा. एका पायावर तयार आहेत सगळे.

वरील लिखाणाव्यतिरिक्त कोणाला काही वेगळा अनुभव असल्यास जरूर सांगावा.


(८ डिसेंबर २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर