कात्री
"अरे दादा, हे सॅचे उघडत नाही. दुसरं मिळेल का? किंवा मग कात्री असेल तरी चालेल." त्या मुलानं असं म्हणताच आजूबाजूच्या दोन-तीन टेबलांवर खसखस पिकली. त्याच्याबरोबरची मुलगी तर त्याच्याकडं खाऊ की गिळू नजरेनं बघत होती. शिवाय एकीकडं तोंड लपवायचाही प्रयत्न करत होती. तो 'दादा' काय करायचं हे न समजल्यानं त्याच्याकडं बघून हसला. (महागड्या ठिकाणी गेल्यावर आपली जशी पंचाईत होते ना तसं त्याचं झालं) "एन्जॉय युअर मील सर." असं म्हणून तो बिचारा निघून गेला. तोपर्यंत त्या मुलाला काय घडलं असेल याचा जरासा अंदाज आला होता. बरोबरच्या मुलीनं त्याची थोडक्यात कानउघाडणी केली आणि मग तो मुलगा सॉसचा सॅचे बाजूला ठेवून कोल्ड्रिंकबरोबर बर्गर गिळू लागला. मी त्यांच्या मागच्याच टेबलावर बसून हे सगळं बघत होतो. मजा येत होती मला. नुकतीच दहावी झालेली त्यांची आणि तो मुलगा बहुदा पहिल्यांदाच आला होता अशा जागेत. (मुलगा-मुलगी गप्पा मारतायत म्हटल्यावर त्यांचं बोलणं माझ्या 'कानावर पडत' होतंच) झाल्या प्रकरणावर हसता हसता मला माझाच जुना किस्सा आठवला आणि कोल्ड्रिंकचा मोठा घोट घेऊनही बर्गर घशात अडकल्यासारखा ...