रस्ता
रस्त्यांची पण फार गंमत असते. आपल्याला माणसांची जितकी सवय होते तितकीच रस्त्यांचीही होते याचा मला अनुभव आला आहे. गेले आठ महिने मी एका रस्त्यावरून जात होतो. आता त्या रस्त्यावरून जात नाही. मात्र आठवण येते अधून मधून त्या तिथल्या वातावरणाची, दिसणाऱ्या माणसांची, वास्तूंची, सिग्नल्सची आणि एकंदरीतच त्या संपूर्ण रस्त्यावरून जो प्रवास झाला त्याची. मी भैरोबा नाला सिग्नलवरून उजवीकडे वळायचो. खरंतर इतर रस्तेही होते; पण मी ज्यावरून आधी गेलो तोच मार्ग निवडला होता. सगळ्यात आधी लागायचं ते वाटेतलं चर्च. तिथं शाळाही आहे. पूर्वी मुलं नव्हती रोज कारण शाळा बंद होत्या. मात्र ते प्रार्थनास्थळ असल्यानं तिथं शांतता आणि स्वच्छता होतीच, पूर्वीही. आता नुकतीच मुलं दिसली होती नवीन नवीन, त्यांना तर पाहिलंही नव्हतं खूप वेळा. जेमतेम महिनाभर पाहिलं असेन. पण काय करणार मी मार्ग बदलला. तिथून पुढं गेल्यावर लागतं ते म्हणजे एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन. आता जाऊन कधीच पाहिलं नाही. मात्र त्याच्या समोरून जा ये करताना प्रसन्न वाटायचं. तिथून रस्त्याच्या दुतर्फा सुरु व्हायचे पथारीवाले. सकाळी नाश्ता घेऊन असायचे काही जण. तर ऊन उतरल्या...