रस्ता
रस्त्यांची पण फार गंमत असते. आपल्याला माणसांची जितकी सवय होते तितकीच रस्त्यांचीही होते याचा मला अनुभव आला आहे. गेले आठ महिने मी एका रस्त्यावरून जात होतो. आता त्या रस्त्यावरून जात नाही. मात्र आठवण येते अधून मधून त्या तिथल्या वातावरणाची, दिसणाऱ्या माणसांची, वास्तूंची, सिग्नल्सची आणि एकंदरीतच त्या संपूर्ण रस्त्यावरून जो प्रवास झाला त्याची. मी भैरोबा नाला सिग्नलवरून उजवीकडे वळायचो. खरंतर इतर रस्तेही होते; पण मी ज्यावरून आधी गेलो तोच मार्ग निवडला होता. सगळ्यात आधी लागायचं ते वाटेतलं चर्च. तिथं शाळाही आहे. पूर्वी मुलं नव्हती रोज कारण शाळा बंद होत्या. मात्र ते प्रार्थनास्थळ असल्यानं तिथं शांतता आणि स्वच्छता होतीच, पूर्वीही. आता नुकतीच मुलं दिसली होती नवीन नवीन, त्यांना तर पाहिलंही नव्हतं खूप वेळा. जेमतेम महिनाभर पाहिलं असेन. पण काय करणार मी मार्ग बदलला.
तिथून पुढं गेल्यावर लागतं ते म्हणजे एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन. आता जाऊन कधीच पाहिलं नाही. मात्र त्याच्या समोरून जा ये करताना प्रसन्न वाटायचं. तिथून रस्त्याच्या दुतर्फा सुरु व्हायचे पथारीवाले. सकाळी नाश्ता घेऊन असायचे काही जण. तर ऊन उतरल्यावर इतर अनेक प्रकारचे वस्तू विक्रेते आणि फळवाले. आत्ता आत्ता कुठं सरबत, सोडावाले सुरू झाले होते. त्यांच्यापाशी थांबलो नाही एकदाही. पण काय करणार मी मार्ग बदलला.
त्यानंतर लागायचा तो रेसकोर्सचा मागचा भाग. घोड्यांना बाजूच्या गल्लीतून मैदानात घेऊन जायचे. काय छान उमदे घोडे असायचे. मात्र त्यांच्याकडे बघायला, मनातल्या मनात का होईना त्यांच्याशी गप्पा मारायला कधी वेळ मिळालाच नाही. काही काळे होते, काही तपकिरी तर काही पांढरे. थोडं थांबून नीट बघायला पाहिजे होतं त्यांच्याकडं. पण काय करणार मी मार्ग बदलला.
त्यापुढं होतं सदर्न कमांड मुख्यालय, नॅशनल वॉर मेमोरियल आणि छत्रपती शिवाजी सैनिक आराम घर. याठिकाणी फार वेळ थांबता आलं नसतं कदाचित. लष्कराचा भाग असल्यानं त्यांनी लगेच विचारणा केली असती सुरक्षेच्या कारणास्तव. तरीही एकदा थांबून बघू शकलोच असतो. निदान वॉर मेमोरियल तरी बघता आलं असतं. पण काय करणार मी मार्ग बदलला.
यापुढं चौकात उजवीकडं वळल्यावर पूना क्लब स्क्वॅश कॉम्प्लेक्स, सदर्न स्टार गोल्फ कोर्स, राजेंद्र सिंहजी संस्थान, न्यू सर्किट हाऊस, व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस अशी काही ठिकाणं होती. त्याबद्दल मला काही माहिती नाही फार. पण बाकी रस्त्याच्या तुलनेत इथून प्रवासाला खरी मजा यायची. आधीचा रस्ता आदरयुक्त भीती असायची मनात. पण काय करणार मी मार्ग बदलला.
इथून मी डावीकडं स्टेशनच्या दिशेने वळायचो. वळल्यावर पुणे स्टेशनपर्यंतच्या चौकात जाईस्तोवरचा रस्ता मला कायम निर्जीव वाटला. काही जीव नसल्यासारखा. वाटायचं इथं आपण एकदा तरी निवांत येऊन बसू. एक तर जाताना किंवा येताना. पण काय करणार मी मार्ग बदलला.
मग यायचे पुणे स्टेशन परिसरातले दोन चौक. आधीच्या रस्त्यावर जेवढी शांतता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं इथं गजबज. माणसं तर कुठं कुठं, काय काय असं विचारत अंगावर धावून यायची. मार न खाता एकदातरी त्यांना काहीतरी खवचटपणे बोलायची इच्छा होती. पण काय करणार मी मार्ग बदलला.
हे दोन्ही चौक ओलांडले की मुख्य रस्ता यायच्या आधी दिसायची ती भीषण गरिबी. रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर राहणारी ती माणसं बघितली की मनातून फार वाईट वाटायचं. असं वाटायचं की एकदा तरी थांबून बोलूया यांच्याशी. पण काय करणार मी मार्ग बदलला.
आता काय मुख्य रस्ता यायचा. त्याबद्दल फार काही बोलण्यासारखं नाहीच. पण हा माझा मार्ग मी सकाळी लोक उठायच्या आधीपासून ते रात्री लोक झोपेपर्यंतच्या सगळ्याच वेळांना बघितला आहे, अनुभवला आहे. त्यामुळं आठ महिनेच हा प्रवास केला असला तरी जवळ जवळ या रस्त्यावरच्या सगळ्याच गोष्टी मला ठाऊक आहेत. आणखीही माहिती मिळवलीच असती मी, शहाणा झालोच असतो अजून; जर आणखी काही काळ राहिलो असतो तर....
पण काय करणार मी मार्ग बदलला.
(२० एप्रिल २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा