विचारप्रवर्तक 'फास्ट'
विचारप्रवर्तक ‘फास्ट’
काल बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ‘डोंबिवली फास्ट’ बघितला. रात्री साडेबारा वाजताच्या शांततेत सुरू झालेल्या पिक्चरच्या सुरुवातीला असलेल्या मोन्ताजमुळं बाहेरची शांतता अंगावर आली. पूर्वी पाहिला होताच. पण प्रत्येक वेळी एखादी कलाकृती बघताना ती नव्यानं पाहिली जाते. कालही तेच झालं. माधव आपटेचा (संदीप कुलकर्णी) मोनोलॉग, इन्स्पेक्टर अनासपुरेंचे (संदेश जाधव) मधले मधले डायलॉग जास्त विचार करायला लावणारे ठरले. अनासपुरेंचे बॉस (नाव आठवत नाही) आणि केशव जोशी (चंद्रकांत गोखले) यांच्या वाक्यांमुळं २००६ सालचं असलेलं वास्तव आजही बदलेलं नाही हे जाणवलं.
ज्यांनी हा सिनेमा अजूनही बघितला नसेल आणि ज्यांना आता नक्की काय झालं होतं ते आठवत नसेल, त्यांच्यासाठी थोडक्यात स्टोरी सांगतो. माधव आपटे हा कनिष्ठ मध्यमवर्गीय मनुष्य मुंबईस्थित एका बँकेत अधिकारी. सुसंस्कृत आणि सुशिक्षित असलेल्या माधवला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या नसानसांत भिनलेला भ्रष्टाचार सहन होत नसतो. त्याची बायको अलका (शिल्पा तुळसकर) एक सर्वसामान्य गृहिणी. दोन्ही मुलांना आणि सध्याच्या कलियुगात कालबाह्य होत जाणाऱ्या तत्त्वनिष्ठ नवऱ्याला सांभाळताना होणारी चिडचिड अतिशय उत्तम दाखवली आहे.
पाणी देणाऱ्या टँकरवरच्या कर्मचाऱ्याला दिली जाणारी चिरीमिरी, बँकेच्या मोठ्या ठेवीदाराला कागदपत्रे पूर्ण नसताना दिले जाणारे कर्ज, मुलीच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी मागितलेले कर्ज अशा बारीकसारीक आणि रोजच्या आयुष्यातल्या घटना सिनेमात उत्तम रीतीने दाखवल्या आहेत. हे सगळं माधवला अजिबात आवडत नसतं, पटत नसतं. पण तो तात्विक वाद घालण्याशिवाय काही करूही शकत नसतो. हेच त्याची बायको त्याला दाखवून देत असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा अनेक घटना साचत जात असतात. त्याचा निचरा होणं गरजेचं असतं. माधव त्याचा निचरा करतो; पण त्याला हिंसक किनार असते. कावळा बसायला अन् फांदी तुटायला गाठ पडते आणि माधव एक पाऊल उचलतो. हे पाऊल उचलल्यानंतर तो मागे वळून पाहतच नाही. व्यवस्थेला आव्हान द्यायला एखादा माणूस निघाल्यावर व्यवस्था कधी शांत बसते का? व्यवस्था खवळून उठणारच ना!
माधव त्याला न पटणाऱ्या भ्रष्ट लोकांना जाब विचारायला लागतो. प्रसंगी हिंसक होतो. पण एका प्रसंगात तो असाच हिंसक झाल्यावर त्याला केशव जोशी आरसा दाखवतात. तिथं त्याला कुठं तरी वास्तवाची जाणीव झाल्याचं आपल्याला दिसतं. आता सिनेमा काय वळण घेईल याचा आपल्याला अंदाज यायला लागतो. पण आपल्याला हवं तसं घडेल, तेच समोर दिसलं, तर त्याला सिनेमा कसं म्हणणार ना? सध्या आपल्यात नसलेले या पिक्चरचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी आपल्याला धक्का दिला आहेच तसा. माधव इकडे असा वागत असताना, दुसरीकडे प्रशासन त्यांचं काम करत असतं. इन्स्पेक्टर अनासपुरे आणि त्यांचं पथक माधवचा शोध घेत असतं. पण तेही व्यवस्थेच्या हातातले बाहुलेच. हे मी म्हणत नाही, अनासपुरे यांच्या संवादांमधूनच आपल्याला कळत जातं.
सिनेमाच्या शेवटी काय होतं? माधव आपटे आणि पोलिसांची भेट होते का? आपल्याला हा सिनेमा काय देऊन जातो? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर सिनेमा नक्की बघायला हवा. आपल्या प्रत्येकात माधव आपटे आहे. आपल्यातले काही जण त्याच्यासारखं वागायलाही जातात. पण त्यांना केशव जोशी भेटतातच असं नाही. त्यामुळं त्यांची अवस्था पुढं वाईट होते. सिनेमातला माधव मानसिक ताण सहन करू शकत नाही. पण सध्याच्या काळात आपल्याकडं तो सहन करण्याची अनेक साधनं उपलब्ध आहेत. तरीही आपल्यात माधव आपटे होणं थांबत नाही.
माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा आहे, की ‘डोंबिवली फास्ट’सारखी कन्सेप्ट घेऊन सिनेमे येत रहावेत. त्यात ‘शिक्षणाच्या आईचा घो’ आणि ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या दोन सिनेमांचाही समावेश आहे. यासारख्या कल्पना आताच्या काळात कशा दिसतील, हे मला पाहायचं आहे. तुमचं काय मत आहे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा