कौतुक कशाचं करावं?

कौतुक कशाचं करावं?


हा प्रश्न आजकाल कोणाला पडताना दिसत नाही. लोक दिसेल त्या गोष्टीचं कौतुक करत बसतात. एक तर इथे किंवा प्रत्यक्षात. जी गोष्ट सर्वसामान्य लोक सहसा करायला जात नाहीत, ती गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने करून दाखवली तर त्याचं कौतुक करावं असं मला वाटतं. ती गोष्ट वाईट नसावी हा तर झाला बेसिक नियम. आधी एखादी गोष्ट सुरू असेल, ती कालानुरूप बदलत जाऊन बंद झाली आणि तरीही ती कोणीतरी करत आहे, तर मग करा त्याचं कौतुक.

उदा. सकाळी उठल्यावर रोजच्या रोज आंघोळ करून देवाला नमस्कार करून मगच बाहेर पडणे, संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर बसून परवचा म्हणणे इत्यादी.

या गोष्टी आता ठरावीक ठिकाणीच सुरू असलेल्या दिसतात. काही काळानं त्या बंदच होण्याच्या मार्गावर आहेत. काही लोक ही परंपरा आवर्जून जपत आहेत.

पण सर्वसामान्य लोकांनी वागण्याचे काही अलिखित नियम असतात.
उदा. वाहतुकीचे नियम पाळणे, मोठ्यांचा आदर राखणे, शक्यतो व्यसने न करणे, समाजात वावरताना व्यवस्थित वागणे (याच्या व्याख्या बऱ्याच लोकांनी स्वतःसाठी काही ठरवून घेतल्या आहेत.)

कोणाचं कौतुक? कोणत्याही व्यसनी माणसाने सगळी व्यसने सोडून नॉर्मल आयुष्य जगावं, तर त्याचं कौतुक! अरे, ती व्यसनं सोडून दिल्यानं तो व्यसन न करणाऱ्या लोकांबरोबर येतोय फक्त. फार भारी केल्यासारखे दाखवून काय उपयोग? जे लोक व्यसनांच्या नादीच लागलेले नाहीत, त्यांच्या लेव्हलला हे गेलेले नाहीतच. उलट तब्येत थोडी फार खराब झालेली असते. पण त्यांनी सोडलं, म्हणून कौतुक.

लोकांनी टापटीप राहण्याचे उगाचच कौतुक. अरे, ती सध्याच्या काळातली गरज आहे. आणि त्यातही गर्भश्रीमंत घरातलं कोणी नॉर्मल टापटीप राहत असेल किंवा एखादी शेतकरी कुटुंबातील व्यक्ती तशीच नॉर्मल टापटीप राहत असेल, तर त्यांची कौतुकं. तो श्रीमंत असूनही साधे कपडे घालतो, हा शेतकरी असूनही उत्तम कपडे घालतो, अशी विभागणी करायला जायचं. समाजात आधीच आपापल्या परिस्थितीबद्दल न्यूनगंड किंवा अहंगंड आहे. तो सोडून ते लोक कुठं समान पातळीवर यायचं बघायला लागले, की समाजच त्यांना पुन्हा त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देतो.

राजकीय गोष्टींबद्दल मला फार काही बोलायचं नाही. कारण कोणतीही बाजू न घेता बोललं किंवा लिहिलं, तर तुम्ही त्या वेळेला असं लिहिलं नव्हतं किंवा तेव्हा काय झालं होतं बोलायला असं म्हणायला कमी करत नाही कोण. सांगायचं एकच आहे, सत्तेसाठी जे काही चालतं, ते आपल्या डोक्याच्या बाहेरचं असतं. त्यासाठी आणि त्याचं टेन्शन घेण्यासाठी लोक आहेत आणि ते त्याचं टेन्शन घेण्यासाठी समर्थ आहेत. जे नाहीत, ते त्याचं टेन्शन प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सामान्य लोकांवर टाकतात आणि लोक ते घेत बसतात. घरात किंवा नातेवाईकांत लोकांनी आपलं ऐकावं, लोकांनी आपल्याला मान द्यावा, आपला शब्द त्यांनी अलगद झेलावा, म्हणून आपण काय काय करत नाही? त्याच्या शतपटीने वरच्या लेव्हलवर राजकीय सत्ताकारण चालत असण्याची शक्यता आहे. त्यामुळं नेते काय करतात आणि काय करत नाहीत याची राळ इथे उठवून उपयोग नाही, असं माझं मत आहे.

त्यामुळं त्यांच्यात कोण कसं वागतं आणि कसं राहतं याची कौतुकं करायला नकोत असं मला वाटतं. कारण त्यांनी लोकांशी चांगलं वागणं आणि प्रेझेंटेबल राहणं हो आवश्यकता आहे; ऑप्शनल नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर