अभिनेत्री
अगदी लहान असल्यापासून मी पिक्चर बघत आलोय. पण तुझी आवडती हिरॉइन किंवा हिरो कोण, हा प्रश्न विचारल्यावर अजूनही गोंधळतो मी. कायमस्वरूपी कोणी तरी आवडतं असं काही नाहीच. त्या त्या वेळेला हिरो किंवा हिरॉइन आवडायच्या. काही जुने आणि मी न बघितलेले सिनेमे आता बघतो, तेव्हा त्यातले कलाकार आवडतात. पण मग त्या वेळी कथा, दिग्दर्शन, फ्रेम, पटकथा किंवा यासारख्या अनेक गोष्टी बाजूला ठेवता येत नाहीत. त्यांचा विचार होतोच. पण हे सगळं कळत नसेल किंवा कळत नव्हतं, त्या वेळी कोणी आवडलं होतं की नाही, हे मीच मला विचारलं. तेव्हा सापडलं उत्तर. मग मी जरा विचार केला, की बाकीच्या लोकांसारखं नाही; पण एखादी व्यक्ती आपल्याला समोर दिसणार असेल आणि त्या वेळी कथा वगैरेचा विचार करणार नसू, तर स्क्रीनवर कोणाला बघायला आवडेल? यानंतर काही नावं समोर आली.
‘डॉन’ नावाचा तेलगू किंवा तमिळ सिनेमा मी बघितला होता लहान असताना. स्पष्ट आठवतोय तो. (तो माझ्यासकट सगळ्यांनी ‘डॉन नं. १’ या नावानं हिंदीत डब झालेला बघितला असेल.) २००८च्या मे महिन्यात तिरूपतीहून पुण्याला चारचाकीतून परत येत होतो. तेव्हा त्या ड्रायव्हरनं लावला होता. मी बहुतेक पाचवीत होतो. एक शब्द कळाला नव्हता तेव्हा. पण त्यातली गाणी आठवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुष्का. तिला मी विसरणं शक्यच नाही. (अर्थात नागार्जुनलाही नाही. पण ही पोस्ट हिरॉइनसाठी आहे. हिरोसाठीची नंतर कधी तरी.) तेव्हा मला अनुष्का फार आवडली होती. त्यानंतरही तिचे खूप सिनेमे बघितले. गेल्या काही वर्षांत शोधून शोधून बघितले सगळे यूट्यूबवर वगैरे. सध्या अनेक जण ‘बाहुबली’मुळं तिच्या प्रेमात असतील.
परवा ‘आयपीएल’च्या वेळी प्रीती झिंटाला बघितलं. ती किती सुंदर आहे, हे सोशल मीडियावरच्या बऱ्याच पोस्ट्समधून दिसलं. तेव्हा म्हटलं, अरे हीसुद्धा एक आहे, जिला आपण कधीही स्क्रीनवर बघू शकतो. (ती खूप छान दिसते आणि मला आवडतेही. फक्त या पोस्टमुळे ती सुंदर आहे हे कळालं असं नाही.) आतापर्यंत तिचेही खूप सिनेमे बघितले आहेत. पण ‘वीर-झारा’मध्ये जी दिसली आहे, त्याला तोड नाही. (पुढच्या पोस्टमध्ये शाहरूख आहेच.) मला ती ‘झूम बराबर झूम’, ‘सलाम नमस्ते’ वगैरे सिनेमांतही खूप आवडली आहे. हे तर मी आत्ता आत्ता हूडकून हुडकून बघितले आहेत. ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना केहना’ यात काही फार आवडली नाही. पण मी तिला स्क्रीनवर कोणतीही कथा नसली, तरी बघू शकतो, हे परवाच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्समुळं कळालं.
अमृता रावला मी पहिल्यांदा शाहिद कपूरबरोबरच्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या सिनेमात बघितल्याचं आठवतंय. (शाहिद आहेच नंतर.) तेव्हा ती खूप आवडली होती. त्यानंतर ती आवडली ‘मैं हूँ ना’मध्ये. पण सुश्मिता सेन जेव्हा तिचा अवतार बदलायला मदत करते ना, त्यानंतरच. काही महिन्यांपूर्वी मी तिचा ‘विवाह’ नावाचा सिनेमा बघितला. त्यात जरा अतीच संस्कारी दाखवली आहे. आत्ताच्या काळात ते जरा नको वाटतं गुळमुळीत. पण एकूणच ती मला आवडते.
एकदा मित्रांबरोबर गप्पा मारताना कुठले सिनेमे चांगले, असा विषय सुरू होता. त्यात कशाची गोष्ट चांगली, कशाचं दिग्दर्शन चांगलं, कशाची अॅक्शन चांगली असं सुरू होतं. कथेवरून ‘स्वदेस’चं नाव निघालं होतं. मी नव्हता बघितला. पण त्या गप्पांमधून असं वाटलं, की अरे हा बघायला पाहिजे. मग काही महिन्यांपूर्वी मी तो बघितला होता. फार आवडला मला. आधी खूप स्लो वाटला. तसा जरा वाटतोच तो. पण त्यात गायत्री जोशीची एंट्री झाली आणि मी जरा सरसावून बसलो. काय दिसते ती त्यात! फार छान दिसली आहे. तिचं कॅरेक्टर पण छान दाखवलं आहे. त्या सिनेमात ती शाहरूखला थांब म्हणत असते; पण तो थांबत नाही. मग अमेरिकेला गेल्यावर तो विचार करतो आणि परत येतो. त्याच्या जागी मी असतो, तर अमेरिकेला जायचा विचारही केला नसता परत, ही त्या क्षणी मनात आलेली प्रतिक्रिया. ‘स्वदेस’ बघून झाल्यावर ती अजून कुठं दिसते का ते बघायचा प्रयत्न केला. पण तिनं तेवढा एकच सिनेमा केला आहे म्हणे.
मध्यंतरी साउथचे जेवढे म्हणून सिनेमे आहेत, ते सगळे बघायचे असा माझा हट्ट होता. बऱ्यापैकी बघून झालेही माझे. (जरा बऱ्या दिसणाऱ्या हिरो आणि हिरॉइनचे). त्या वेळी मी नानीचा ‘गँगलीडर’ नावाचा सिनेमा बघितला. त्याच्या आधी मी त्याचा ‘निन्नू कोरी’ बघितला होता. मला त्यात निवेथा थॉमस आवडली; पण तिला मी कोणत्याही वेळी स्क्रीनवर बघू शकेन असं सध्या तरी वाटत नाही. तर... ‘गँगलीडर’मध्ये मला प्रियंका मोहन दिसली. तीही फार आवडली मला. तिचेही फार सिनेमे नाहीत. आता तिचा धनुषबरोबर आलेला ‘कॅप्टन मिलर’ बघायचा आहे. वेळ मिळाला की बघणार. (लिस्टमध्ये धनुष आहेच. त्याला विसरून कसं चालेल?)
हे सगळं जरी असं असलं, तरी बाकी कोणत्या हिरॉइन किंवा हिरो मला आवडले नाहीत असं नाही. खूप आहेत जे त्या त्या वेळी आवडले आहेत. फक्त एवढंच की वर सांगितलेल्या व्यक्तींना मी कथा, दिग्दर्शन अशा कोणत्याही गोष्टींशिवायही स्क्रीनवर बघू शकतो. सध्या तरी एवढी नावं आहेत. काही विसरलो असीन तर सांगा.
तळटीप - मुद्दाम एकीचाही फोटो जोडलेला नाही. कोणाचंही नाव सर्च केलं, तरी वेगवेगळे अनेक फोटो गूगलवर उपलब्ध आहेत. त्यामुळं मी कशाला तुम्हाला या अभिनेत्रींचे फोटो दाखवू, असं मला वाटतं. पण फोटोशिवाय फेसबुकवरची पोस्ट जास्त लोकांपर्यंत जात नाही, असं कुठं तरी वाचल्यासारखं वाटतंय. त्यामुळं जोडायचा म्हणून एक फोटो जोडला आहे.
(२५ मार्च २०२४ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा