वेड लावणारा आणि लावणारं 'ग़ालिब'...
हैं और भी दुनिया में सुख़नवर बहुत अच्छे,
कहते हैं कि ‘ग़ालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और।
म्हणजे,
दुनिया में यूं तो बहुत से अच्छे शायर हैं,
लेकिन ग़ालिब की शैली सबसे निराली है।
ज्यांना ग़ालिब कोण हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हे ग़ालिबनं स्वतःच लिहून ठेवलं आहे. मलाही ग़ालिब माहीत नाही. पूर्वी ओम भूतकरची प्रमुख भूमिका असलेलं नाटक कंपनीचं 'मी ग़ालिब' नावाचं नाटक बघितलं होतं. त्या वेळी फार आवडलं होतं. तेव्हा ग़ालिबचे शेर नाटकात बघितल्यानं / ऐकल्यानं फार आवडले होते. 'मी ग़ालिब' हे नाटक एकूण तीनदा बघितलं आहे. आणि 'सुखन'ही तीन वेळा बघितलं आहे. या सगळ्यात ग़ालिबचे शेर ऐकले आहेत आणि ते आवडलेही आहेत. पण आत्ता हा विषय काढण्याचं कारण वेगळं आहे.
सध्या रंगभूमीवर 'ग़ालिब' नावाचं एक नवंकोरं नाटक आलं आहे. त्याचे दमदार प्रयोग सुरू झाले आहेत. गेल्या शनिवारी शुभारंभाचा प्रयोग पुण्यात 'यशवंतराव'ला झाला. तो मी बघितला. ग़ालिब हे नाव, त्यात विराजस काम करतोय आणि नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर हे ऐकूनच मी हे नाटक बघायला गेलो होतो. फार आवडलं. विराजसचं काम आवडतं मला. गौतमीनं खूप छान अभिनय केला आहे. त्या दोघांबरोबर अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी या दोघांनीही सुंदर काम केलं आहे.
सस्पेन्स न फोडता नाटकाची थोडक्यात स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. प्रख्यात लेखक प्रा. मानव किर्लोस्कर यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांची मुलगी ईलाच्या आयुष्यात तिच्या तिच्या अडचणी आहेतच. त्या अडचणींना तोंड ती देत असतानाच प्रा. किर्लोस्करांचा माजी विद्यार्थी आणि सध्याचा प्रसिद्ध कादंबरीकार अंगद दळवी तिच्या आयुष्यात येतो. आता तो आयुष्यात कसा येतो? आल्यानंतर नेमकं काय होतं? त्यांच्या या नात्यात पुढं काय होतं? आणि या सगळ्यात ग़ालिबचा नेमका संबंध काय, यासाठी नाटक बघायला लागेल.
नाटकातल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यांचा थोडासा क्लू मी या लिखाणाच्या सुरुवातीला हेडिंगमधून द्यायचा प्रयत्न केला आहे. ग़ालिब ही काय चीज आहे, हे सांगता येणार नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. त्याचे शेर नुसते ऐकले, तर ते कानाला फार भारी वाटतात. अर्थ समजून घेण्यासाठी कितीही वेळा वाचले किंवा ऐकले तरी ते कमी आहेत. नाटकातले डायलॉगही असेच आहेत. यातले काही डायलॉग समजून घेऊन लक्षात ठेवेपर्यंत बाकीचे भारी डायलॉग समजून घ्यायचेच राहून गेले.
मला समजलेले डायलॉग.....
१. जग हे एक मार्केट आहे आणि या जगात केवळ दोन प्रकारचे लोक आहेत. विकणारे आणि विकत घेणारे. मग ते क्षेत्र कुठलंही असो.
हा डायलॉग विराजसच्या तोंडी आहे.
आणि हा डायलॉग गुरुराज यांच्या तोंडी आहे.
२. करोडो शून्य एकत्र आले, तरी त्यांची बेरीज शून्य असते. त्यांच्यापेक्षा 'एक' कधीही मोठा ठरतो. स्वतःतील तो 'एक' जप.
या दोन्हींपेक्षा मला सगळ्यात जास्त आवडलेला डायलॉग विराजस म्हणतो.
तो म्हणतो, तुम्ही हिरे विकताय हे एकदा लोकांना कळलं, की तुम्हाला काचा विकायची मुभा राहत नाही.
क्या बात... क्या बात... क्या बात....
सुंदर नाटक आहे हे खूप. आता इतरही महत्त्वाच्या लोकांबद्दल. नाटकाचे निर्माते आहेत संतोष शिदम आणि नेहा जोशी मांडलेकर. सहनिर्माते आहेत के. रूपाली आणि आनंद केकाण. नेपथ्य आणि प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची आहे. नाटकाचं संगीत राहुल रानडे यांचं आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार प्रणित बोडके आहेत. कलाकार मी मघाशी सांगितले आहेतच. आता पुन्हा एकदा सांगतो. गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी, अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी हे चार जण ऑनस्टेज आहेत. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांचं आहे.
नाटकाचं संगीत अतिशय छान झालं आहे. सगळ्यात जास्त आवडलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे नाटकाचा सेट. अरे अख्खा वाडा उभा केला आहे त्यांनी. मधोमध असलेल्या कारंज्यासकट. कायच्या काय भारी आहे सेट. नाटक एकदा बघा. न समजलेले शेर आणि डायलॉग ऐकायला मी पुन्हा एकदा जाणार आहे नाटक बघायला.
हे सगळं लिहायच्या आधी मला ग़ालिबचा शेर हवा होता. तो मी गूगलवरून शोधेपर्यंत मला आईनं एक साधासा पटकन तयार करून दिला. म्हटलं त्यानं शेवट करू या पोस्टचा...
गमो दर्द की दुनिया
लाई जिसने करीब,
बादशाह लफ्जोंका
नाम उसका ग़ालिब।
(१५ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा