शोध
‘काय करू मला काहीच समजत नाहीए. हिचं बरं आहे. मस्त पोरगा गटवलाय तिनं. पण माझं काय? मला हिच्यासारखं आयुष्य जगायचं नाही ना... हरामखोर साली. मी असं करणार आहे, तसं करणार आहे. माझ्याशी असं वागणारा नवरा असेल, तरच मी लग्न करीन, नाही तर बिन लग्नाची राहीन... आणि आता काय? आईबापानं एक श्रीमंत स्थळ काय बघून दिलं, ‘माय हबी, बेस्ट हबी इन द वर्ल्ड’ म्हणायला लागलीए... जसं काय जगातल्या सगळ्या बायांच्या नवऱ्यांना भेटून आलीए....’
प्रियाच्या मनातले विचार थांबतच नव्हते. तिची प्रचंड चिडचिड होत होती. सहनच होत नव्हतं तिला नेहाचं वागणं. खरं तर या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. गेल्या २० वर्षांपासून बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहत होत्या. आता दोघींची वयं २५ झालेली. नेहाचं मागच्याच वर्षी लग्न झालं. तेव्हापासून प्रियाच्या घरच्यांनी तिच्याही मागं लग्नासाठी किरकिर सुरू केली होती. पण....
‘हे काही माझं लग्न करायचं वय नाही. आत्ता कुठं जॉब सुरू झाला आहे माझा. मनासारखा पगार मिळू दे, जरा सेटल होऊ देत. मग बघू लग्न वगैरे....’
‘अगं आता २५ झालीस तू. नेहाचं पण बघ योग्य वयात लग्न झालं. उशिरा लग्न झालं की अडचणी येऊ शकतात. आणि पगार काय पगार असतो. माणसाची भूक कधीच थांबणार नाही. आत्ता तुला ४० हजार पगार आहे आणि तो मनासारखा नाही म्हणतेस. उद्या ६० हजारही मनासारखे नसतील तुझ्या. तोपर्यंत वय निघून गेलं, तर काय करणार मग? एकटीच राहशील. तुला कधीपासून विचारतीए, तू कोणी शोधून ठेवला आहेस का? तसं असेल, तर ते तरी सांग. किंवा मग जर तुला लग्नच करायचं नसेल, तर तसं एकदाचं काय ते सांगून टाक बाई. कंटाळा आलाय आता मला तीच तीच बडबड करून. गेले सहा महिने तेच बोलून बोलून.’
प्रियाची आई बोलून बोलून थकली आणि वैतागून खोलीत निघून गेली. मग प्रियासुद्धा चिडून बाल्कनीत जाऊन थांबली होती. सगळे विचार कितीही झटकायचे ठरवले, तरी ते येत होतेच. तिला लग्न करायचं नव्हतं असं नाही; पण नेहाचं झालं म्हणून स्वत:चं लवकर उरकायचं नव्हतं. प्रियाच्या घरचे, विशेषत: तिची आई नेहाचं लग्न झालं, म्हणून प्रियाच्याही मागं लागली होती. आणि तेच प्रियाला आवडत नव्हतं.
आधी प्रियाच्या आयुष्यात अरुण होता. दहावी झाल्यानंतरचं ते नवं नवं प्रेम होतं. जसं असतं, तसंच असायचं होतं ते. फार टिकणार नव्हतंच. वर्षभरात किरकोळ कारणांवरून भांडणं झाली आणि ते नातं संपलं. त्यानंतर अनेक वर्षं मुलांबद्दल मनात राग साठलेला होता तिच्या. तो नाहीसा केला राकेशनं.
राकेश लास्ट इयरला भेटला होता तिला. आधी साधीच मैत्री होती त्यांची. कॉलेजच्या ग्रुपबरोबर मिळून एकत्र फिरायला जायचे, जेवायला जायचे, सिनेमा बघायचे. त्यानंतर डिग्री संपली आणि त्याबरोबर मोठा ग्रुपही. नंतर त्यातले फक्त दोन-तीन जण आणि राकेश-प्रिया एवढेच राहिले. त्या दोघा तिघांनाही ‘राकेश-प्रिया’ आणि ‘आपण’ असा ग्रुप राहिलो आहोत, हे जाणवायला लागलं होतं. त्यामुळं मग त्यांनीही या जोडीला एकटं सोडलं.
त्याचा ना राकेशला फरक पडला, ना प्रियाला. कॉलेजमध्ये असताना ज्या ॲक्टिव्हिटी ग्रुपबरोबर व्हायच्या, त्या आता फक्त हे दोघंच करायला लागले. हळूहळू दोघांनाही एकमेकांशिवाय करमेना झालं. राकेशनं त्याच्या घरी प्रियाबद्दल सांगितलं होतं. पण त्याच्या घरच्यांना प्रिया सून म्हणून नको होती. त्याचं कारण राकेशला माहीत होतं. ते त्यानं शेवटपर्यंत कळू दिलं नाही प्रियाला. पण जर तिच्याबरोबर लग्न करता येणार नसेल, तर तिचा आणि आपला वेळ वाया का घालवा, असा विचार करून तो प्रियाच्या आयुष्यातून हळूहळू निघून गेला होता. परत कधीही न भेटण्यासाठी.
त्याला खोदून खोदून विचारलं, धमक्या दिल्या, रागावले, चिडले, आदळआपटही केली मी. पण राकेशनं मला समजावलं आणि गेला तो. पुन्हा मला एकटीला टाकून. माझ्या या सगळ्या प्रवासात नेहा होतीच सुरुवातीपासूनच. मैत्रिणच ना लहानपणापासूनची. तिला मी हे सगळं सांगत होतेच. तिनं दिलेल्या धीरामुळं तर माझं मास्टर्स पूर्ण झालं, नोकरी सुरू झाली. ती म्हणाली होती मला. ‘आता मुलं आपल्याला बघायला येणार नाहीत. आपण मुलं बघायची. आवडला एखादा, तर भेटायला सुरुवात करायची. त्याच्याबद्दल सगळं माहीत झालं आणि पटलं तर लग्न, नाही तर दुसरा मुलगा.’
काय बिन्धास्त विचार होते तिचे. मस्त वाटलं होतं तेव्हा. पण अचानक कशी काय बदलली ती? असं कसं काय घरच्यांनी बघून दिलेल्या मुलाशी लग्न करून मोकळी झाली ती? मला डायरेक्ट लग्न ठरल्यावरच कसं काय सांगितलं? जाऊ दे. गेली खड्ड्यात. तिचं वागणं पटलं नसलं, तरी विचार पटले होते ना. तसंच वागायचं आपण. आईला सांगून टाकू. निदान ती तरी शांत बसेल.
असा विचार करत करत प्रिया पुन्हा हॉलमध्ये आली. तोंड धुवायला जाणार होती तितक्यात ’कुठं जाणार असलीस, तर चहा घेऊन जा. झाला आहे.’ असा आईचा आवाज आला. शेवटी आईच ती. मुलांचं मन न ओळखून कसं चालेल तिला? आईबापाशिवाय मुलांचं मन कोण ओळखेल?
प्रिया तोंड धुवून आली, चहा घेतला. मग आईला समोर बस म्हणाली.
‘आई, शांतपणे ऐक. मी लग्न करणार आहे. ऐक आधी सगळं. पण आत्ता लगेच नाही. मला २ वर्षं द्या तुम्ही. तोपर्यंत मला शोभेल आणि मला आवडेल असा मुलगा शोधायची संधी द्या. आणि जर नाहीच जमलं मला, तर तुम्ही आहातच की शोधायला.’
‘ते ठीक आहे. पण....’
‘माझं झालं नाही अजून बोलून. तू काय म्हणणार आहेस, ते माहीत आहे मला. प्रिया, तू सांगितल्यावर लगेच काय मुलांची लाइन लागणार नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आता करते लग्न म्हटल्यावर लगेच काही जुळत नसतं वगैरे वगैरे म्हणायचं असेल तुला. हो ना? हसू नकोस. मी सीरियसली बोलतीए. आणि मी शोधू नका म्हटल्यावर तुम्ही काय आज्ञाधारक माणसांसारखं थांबणार आहात का? नाही ना!? तुम्ही शोधलेली किंवा माझ्यासाठी आलेली स्थळं मी सांगेपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाहीत याची काळजी घ्या फक्त. आता मी पण दमले एवढं सगळं बोलून. आलेच मी जाऊन.’
असं म्हणून प्रियानं हळूच हसत आईला मिठी मारली आणि ती घराबाहेर पडली.
(२७ एप्रिल २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा