मैत्री (ण)?






"एक चहा..."

"बसा."

मला खरंतर भूकही लागली होती; पण पांडूनं अशी ऑर्डर सोडल्यावर मी माझं वाक्य पूर्ण न करताच एका कोपऱ्यात बसलो. पांडू म्हणजे आमच्या शाळेच्या बाहेरचा चहावाला. शाळेबाहेरच त्याची चहाची टपरी होती. ४-५ वर्षांपूर्वी आम्ही दहावी झाल्यानंतर एकदा त्याच्याकडं चहा प्यायलो होतो. एकदाच... कारण तेव्हा खिशात पैसेच नसायचे. आज मला काही चहा प्यायची खास इच्छा अशी नव्हती. पण या पावसात मी भिजत आणि कुडकुडत आलो होतो, तेही एका फोनवर. फक्त विज्यामुळं! 

विज्या म्हणजे विजय पाटील. आम्ही भेटलो तिसरीत असताना. त्यानंतर एकाच वर्गात होतो दहावीपर्यंत. आमची पहिली भेटही म्हणावी तर एकदम मस्त, नाही तर विचित्र होती. माझ्या आई-वडिलांची शहरात बदली झाल्यानंतर मीही आलोच त्यांच्यासोबत. त्यांनी जशी नोकरी बदलली, तशी मला शाळा बदलावी लागली.

तिसरीला शाळेचा पहिलाच दिवस होता. नवीन गणवेश, नवीन बाई, नवीन शहर आणि त्याहीपेक्षा नवीन गोष्ट म्हणजे आमच्या वर्गात मुली होत्या. माझ्या आधीच्या शाळेत तर मुली नव्हत्याच; पण इथं तर वर्गात निम्म्या मुली आणि निम्मी मुलं. सुरुवातीला प्रार्थना झाली. त्यानंतर प्रत्येक जण उभा राहून नाव सांगू लागला. २-३ नावं झाली, तेवढ्यात एक चष्मेवाला मुलगा दरवाजात येऊन उभा राहिला. बाई त्याच्यापाशी गेल्या आणि त्यानं काहीतरी कुजबुज केली. त्याचं बोलून झाल्यावर बाई लगेच माझ्यापाशी आल्या आणि म्हणाल्या,

"अरे, तू नवीन आहेस ना शाळेत?"

त्यांनी अचानक असं का विचारलं ते मला कळेना. पण मी म्हणालो, "हो."

"तू चुकून या वर्गात आला आहेस. तुझा वर्ग दुसराच आहे."

त्यांनी असं म्हटल्यावर मला फार बरं वाटलं. जीव भांड्यात वगैरे पडला. आपण वेगळ्याच वर्गात आलो असू, असं मला मुलींना बघून सुरुवातीला वाटलं होतंच. पण मी काहीच बोललो नव्हतो. आता बाईंनी सांगितल्यावर मी माझं दप्तर उचललं आणि त्या चष्मेवाल्या मुलाबरोबर जायला लागलो. 

तिसरीतला चष्मेवाला मुलगा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक हडकुळा, वयाच्या मानानं जरा उंच आणि तोंडावर बावळट भाव अशी एक प्रतिमा उभी राहते. पण हा पोरगा या सगळ्या समजुतींना छेद देणारा होता. गोलगप्प्या, दोरीवाला चष्मा, जरा सावळा, उंचीला सर्वसाधारण आणि चेहऱ्यावर रागीट भाव होते या पोराच्या. त्याच्यामागं जाताना मला भीती वाटत होती. पण तेवढ्यात 'आमचा' वर्ग आला. वर्गात शिरताना मला आगीतून फुफाट्यात आल्यासारखं झालं. कारण या वर्गातही मुली होत्याच. शिवाय इथं एका बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असं बसवलं होतं सगळ्यांना. मी वर्गात जाईपर्यंत बहुतेक सगळ्यांची नावं सांगून झाली होती. कारण मी आल्या आल्या बाईंनी मला नाव विचारलं. मी माझं नाव सांगितलं आणि बाईंनी दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो. ती सगळी पोरं-पोरी माझ्याकडं काही तरी वेगळ्याच नजरेनं बघत होती. पण मी त्यांच्याकडं फार लक्ष दिलं नाही.

ती सगळी पोरं बालवाडीपासून एकाच शाळेत होती. फक्त त्यांचे वर्ग वेगवेगळे व्हायचे किंवा माझ्यासारखी थोडीबहुत 'जनता' त्यांच्यात मिसळायची, हे मला नंतर समजलं. त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जाताना माझ्या वर्गातलं एक पोरगं माझ्याजवळ आलं. मी त्याच्याकडं बघून हसलो. एकतर मला या सगळ्या मुलांशी काय बोलायचं ते समजत नव्हतं. कारण ही शहरातली मुलं. (मुलींशी बोलणं काय, त्यांच्याकडं तर बघणंही लांब राहिलं.) हा गोरा आणि गरगरीत, बुटका, चेहऱ्यावर जरा मिश्किल भाव असलेला पोरगा माझ्यापाशी आला होता, त्यानं मला विचारलं,

"तुझं नाव काय म्हणालास?"

"विजय पाटील."

तो हसून म्हणाला, "अरे, माझं पण नाव विजय पाटील आहे. तुझ्या पप्पांचं नाव काय?"

आपल्याच नावाचा आणि आडनावाचा एखादा मुलगा आणि तोही आपल्याच वर्गात! मला फार भारी वाटत होतं. आता याच्याशी दोस्ती करायची आणि काहीही झालं, तरी तोडायची नाही असं मी तिथल्या तिथं ठरवूनही टाकलं.

"माझ्या पप्पांचं नाव केतन आहे आणि तुझ्या?"

"सुरेश." असं त्यानं सांगितलं. कुठं राहतोस वगैरे गोष्टी विचारेपर्यंत त्याला त्याच्या गॅंगमधल्या एकानं आवाज टाकला आणि हा मला टाटा करून गेला त्यांच्यात.


त्या दिवशी तो टाटा करून गेला होता. पण दुसऱ्या दिवशीपासून मात्र आम्ही मागच्या-पुढच्या बाकांवर बसायला लागलो. एकत्र डबा खायला लागलो. त्याची आणि माझी घरची परिस्थिती साधारणपणे एकसारखीच. आम्ही दोघंही मध्यमवर्गीय. आपलं काम बरं आणि आपण बरं, असा आम्हा दोघांचाही स्वभाव असल्यानं आमचं छान जमत होतं. आमची मैत्री मस्त टिकून होती. 

त्यातच आम्ही प्राथमिकमधून हायस्कूलला गेलो. त्यामुळं आमचा वर्ग पूर्ण फुटला. कारण हायस्कूलला वेगवेगळे प्रकार होते. आमचं आत्तापर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं होतं. पण आता आमच्याकडं हायस्कूलला जाताना सेमी इंग्लिश, पूर्ण मराठी असे ऑप्शन होते. त्यातही मुलांचा वेगळा वर्ग, मुलींचा वेगळा आणि मुला-मुलींचा एक असेही ऑप्शन होते. पण ते निवडणं आमच्या हातात नव्हतं. वशिल्यानं लोकांना मिळायचे तसे वर्ग. पण आमचं तसं नव्हतं. 

योगायोगानं बऱ्याच जणांना त्यांच्या मनासारखे वर्ग मिळाले आणि ज्यांना मिळाले नाहीत ती पोरं-पोरी शाळा सोडून गेली. पण मी आणि विज्या, आम्ही दोघंही एकाच वर्गात आलो. आम्हाला मिळाला होता मुलांचा वर्ग. आम्ही सगळी पोरंच होतो वर्गात. एकही मुलगी आमच्यात नव्हती. त्यामुळं मी तर फारच खूश झालो. गेल्या दोन वर्षांत ज्यांच्याशी व्यवस्थित बोलू शकलो नव्हतो, त्यांच्याशीही आता चांगली मैत्री झाली. शिवाय आमच्या वर्गात दुसऱ्या शाळेतून किंवा शहरातून जी नवीन मुलं आली होती, त्यांच्याशीही चांगली मैत्री व्हायला लागली.

वर्षं कशी भुर्र्कन उडून गेली ते समजलंच नाही. आता हायस्कूलला येऊनही ३ वर्षं संपत आली होती. या ३ वर्षांत खूप धमाल केली. पण सगळ्यात जास्त भाव कोणी खाल्ला असेल, तो म्हणजे मी आणि विजयनं. आम्ही एकाही शिक्षकाला त्रास द्यायचं सोडलं नाही. सुरुवात व्हायची प्रेझेंटीपासूनच! वर्गशिक्षक सोडून दुसरं कोणी दिसलं की आम्ही सुरू व्हायचो.

प्रेझेंटीला 'विजय?' अशी हाक मारली की आम्ही दोघंही 'प्रेझेंट' म्हणायचो. मग पोरं हसायची. शिक्षक वैतागायचे आणि 'विजय पाटील?' असं विचारायचे. मग पुन्हा आम्ही दोघंही 'प्रेझेंट' म्हणायचो. मग शेवटी त्या शिक्षकानं आमचं संपूर्ण नाव घेतलं, की आम्ही एकेकटे 'प्रेझेंट' म्हणायचो. आम्ही जेव्हा पोरांनाही असं करायला लागलो, तेव्हा पोरं आम्हाला जाड्या विजय आणि बुटका विजय म्हणायची. आम्ही जास्त आगाऊपणा केला, तर सरळ बापाच्या नावानं हाका मारायची. पुढं पुढं तेच सुरू राहिलं शाळा संपेपर्यंत. शाळेत असेल त्या स्पर्धेत आम्ही दोघंही भाग घ्यायचो. खेळात आम्हाला काही विशेष रस नव्हता. पण वक्तृत्व, काव्यवाचन, नाटक, समूहगीत अशा प्रकारच्या सगळ्याच स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो आणि नंबरही काढायचो.

पण कोणाचंही सुख जास्त काळ टिकत नाही असं म्हणतात ना, तेच झालं. पाचवी ते सातवी असं ३ वर्षांचं सुंदर आयुष्य जगल्यावर आठवीमध्ये पुन्हा आमच्या वर्गात मुली आल्या. आठवीमध्येही लोकांना ऑप्शन्स होते. जर्मन आणि हिंदी किंवा संस्कृत आणि हिंदी किंवा पूर्ण संस्कृत. यामध्येही सेमी इंग्लिश, नॉन सेमी इंग्लिश अशा तुकड्या होत्याच. (हेही आमच्या हातात नव्हतंच.) पण त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझा आणि विजयचा वर्ग काही बदलला नाही. फक्त आमच्या वागण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या. वर्गात मुली आल्यामुळं! पण तरीही आम्ही जमेल तितकी मजा करायचो. म्हणजे, स्टाफरूममधून एखादा शिक्षक किंवा शिक्षिका दिसेल त्या बारक्या पोराला बोलावून 'विजयला निरोप दे.' असं सांगायचे. मग ते पोरगं वर्गात यायचं आणि म्हणायचं,

"विजय कोण आहे?" की राहिलो आम्ही दोघं उभे.

मग ते गोंधळून म्हणायचं, "विजय पाटील कोण आहे?" 

तरीही आम्ही दोघं उभेच असायचो. मग त्याला शिक्षकानं सांगितलेला संदर्भ आठवायचा आणि ते बिचारं म्हणायचं,

"तुमच्यापैकी नाटकात काम कोण करतं?"

"आम्ही दोघंही." असं मी आणि विज्या एकाच सुरात म्हणायचो. वर्गातली सगळी हसत सुटायची आणि ते बिचारं पोरगं निघून जायचं. 

सुरुवातीला काही जणांनी आम्हाला दोघांनाही 'तुम्ही जुळे आहात का?' असा अत्यंत बावळट प्रश्न विचारला होता. (दोघंही दिसायला तर अगदी वेगवेगळेच होतो. शिवाय जरी जुळे असलोच, तरी आम्हा दोघांची नावं विजय का ठेवली असती? हा कॉमन सेन्स नव्हता तेव्हाच्या लोकांमध्ये. असो!)


शाळेत केलेली गेल्या ७-८ वर्षांमधली ही सगळी मजा पुन्हा एकदा अनुभवताना, आठवतानाच (शुद्ध मराठीत नॉस्टॅल्जीक होत असतानाच) विज्या समोरून येताना दिसला. तो मला हाका मारत मारतच आला.

"अरे, भिजत का आलास? छत्री नव्हती का? पांडूदादा, चहा तरी द्या की याला!"

आल्या आल्या माझ्याशी बोलता बोलताच विज्यानं पांडूला ऑर्डर सोडली. तो येईपर्यंत पाऊस थांबला होता. शिवाय साहेब रिक्षानं आले होते. आमचा प्रवास बसनंच.

"तू एवढ्या घाईघाईत बोलावलंस, म्हणून धावत-पळत आलो. बोल, काय झालं?"

"अरे, ते बोलणं आहेच रे. आधी चहा घे. भिजला आहेस, थंडी वाजत असेल तुला. काही खाणार आहेस का?"

"मला कळतं माझं काय करायचं ते. तू असा फोन का केलास ते सांग."

"सांगतो. तुला कल्पना आठवते का?"

५ सेकंद गप्प बसून जरा विचार केल्यावर मला आठवली ती कल्पना. चौथीपर्यंत आमच्याच वर्गात होती. हा विज्या कधीतरी चोरून तिच्याकडं बघायचा. मी नुकताच आलो होतो तेव्हा यांच्या वर्गात. पण हा गडी मात्र गेल्या २-३ वर्षांपासून तिच्याच वर्गात होता. कधी गृहपाठाच्या वह्या देताना बोल, कधी गॅदरिंगच्या वेळी बोल किंवा असलीच काहीतरी कारणं काढून तिच्याशी बोल, असले उपाय करायचा. पाचवीत तिनं शाळा बदलली आणि मग त्यानं बहुतेक तिचा नाद सोडला... असं मला वाटलं होतं. म्हणजे अजूनही तसंच वाटत होतं; पण आत्ता त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकताना माझ्या डोक्यात चक्रं फिरायला लागली.

"आठवते की. कोण कल्पना, त्याची मला पूर्ण कल्पना आहे."

"साल्या, शब्दच्छल करू नकोस रे. इथं परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय?" असं म्हणत म्हणत त्यानं चेहरा जरा गंभीर केला.

"का रे? काय झालं?" असं मी विचारल्यावर तो म्हणाला,

" जाऊ दे सोड. काही नाही."

"नाटकं करू नको. पटापट सांग काय ते!"

"बरं ऐक. फक्त कोणाला बोलू नको. मी त्या कल्पनाला दहावी झाल्यानंतर सांगितलं होतं."

"काय सांगितलं होतं?"

"ती मला आवडायची रे फार पूर्वीपासून. फक्त दहावी झाल्यावर मी तिला लगेचच हे फेसबुकवर सांगितलं होतं. त्यानंतर तिचा काही रिप्लाय आला नाही. मी बरेच दिवस वाट बघितली. पण मला वाटलं तिला राग आला असेल किंवा मी आवडत नसेन. म्हणून मी फेसबुक अकाउंटही डिलीट केलं होतं."

"मग? पुढं काय झालं? आत्ता मधेच काय तिचं?"

"मला दोन दिवसांखाली दिसली होती ती. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला; पण ती भडकलेली होती. मला जणू ती अनोळखी कोणीतरी असल्यासारखं वागवत होती. नीट बोलली नाही. फटकून वागत होती. शेवटी मी पण फार मागं लागलो नाही. निघालो तिथून. पण तिला अचानक काय झालं असेल? की मी तिला ती आवडत असल्याचं सांगितलं होतं, तो राग अजूनही धरून बसली असेल?"

तो हे सांगत होता आणि खूप नाराजही झालेला होता. त्यावरचा उपाय पांडूनं दिला. त्यानं आम्हाला चहा आणून दिला आणि त्याच्याबरोबर न मागताच दोन क्रीमरोलही दिले. विज्या आता गप्प बसून चहा पीत होता आणि मी एकीकडं विचार करत होतो. च्यायला! एका शब्दानं बोलला नव्हता मला हा. तिसरीत जेव्हा मी त्यांच्या वर्गात गेलो होतो, तेव्हा पहिले ३-४ महिने कल्पना माझ्याच शेजारी बसत होती. पण मी मुळात मुलींना घाबरत असल्यानं बोलण्याचा संबंध नव्हताच. शिवाय विज्याचं वागणं बघून मी कधी तिचा विचारही मनात येऊ दिला नसता. पण... तिनं शाळा बदलल्यावर विज्यानं तिचा नाद सोडला असं मला वाटलं आणि ते वाटणं घातक ठरलं. माझ्या आणि विज्याच्या मैत्रीसाठी.


मी हा विचार करत असतानाच माझी तंद्री मोडत विज्या म्हणाला,

"चल. जाऊ देत आता. घरी जाऊ. पाऊसही थांबलाय. तू आजारी पडशील. जा घरी जाऊन कपडे बदल आधी. पुन्हा भेटू, तेव्हा निवांत भेटू. आता भेटलो तसं गडबडीत नको."

विज्या असं म्हणाला आणि मी विचारातून बाहेर आलो. पांडूला पैसे दिले आणि त्यानं सांगितल्याप्रमाणं गप घरी गेलो. सगळं आवरलं आणि आडवा झालो खरा. पण झोपच लागेना. 

कल्पना... कल्पना... कल्पना... तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. तिसरीत माझ्या शेजारी बसायची ती. गोरीपान, कानात चंदेरी रंगाचे छोटेसे डूल, नकटं नाक, केसांचे दोन बो, थोडासा हस्की म्हणता येईल असा; पण कणखर आवाज असणारी कल्पना. 

तिच्या नकट्या नाकावर कायम राग असायचा. पण ती चिडकी किंवा तुसडी नव्हती, हे आम्ही चौथीत असताना एक नाटक एकत्र केलं होतं, तेव्हा जाणवलं. त्या नाटकात आम्ही बक्षीस जिंकलं होतं. आमचा एक फोटोही होता तेव्हाचा. मी, आणखी एक मुलगा, कल्पना आणि तीन मुली. मी सगळ्यात बुटका होतो त्यांच्यात. कित्येक वर्षं जपून ठेवला होता तो फोटो. पण नंतर हरवला. फोटो हरवला असला, तरी तो आजही डोळ्यासमोर आहे. 

पाचवीत कल्पनानं शाळा बदलली. त्यानंतर काही संबंधच उरला नाही. पण सातवीत असताना अचानक एका नाट्यवाचन स्पर्धेदरम्यान ती भेटली. मी आमच्या शाळेतल्या लहान-मोठ्या पोरांसोबत होतो. नशीब त्या वेळी वर्गातलं कोणी नव्हतं. तिथं आम्ही बक्षीस घ्यायला जाताना कोपऱ्यातून एक चेहरा आमच्याकडं रोखून बघतोय असं मला जाणवलं होतं. नंतर कळलं की तो चेहरा म्हणजे कल्पना. डायरेक्ट येऊन बोललीच ती.

"काय रे? ओळखलं का?"

"हो. हो. ओळखलं की." 

आता स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून जरा धीट झालो होतो मी. आधी तिला ओळखलं नव्हतं मी. खूपच बदलली होती. लहानपणाचा गोरा रंग आता सावळा झाला होता, डोळ्यावर भिंगं आली होती, कानातले डूल गायब झाले होते, लहान बो जाऊन मोठ्या आणि वर गुंडाळलेल्या वेण्या आल्या होत्या.

"काय मग? बाकी? शाळा का बदलली?"

"अरे, चौथीपर्यंत बाबा सोडायचे शाळेत. पण नंतर त्यांची नोकरी बदलली आणि माझ्या घरापासून कोणते रिक्षाकाका यायला तयार नव्हते. म्हणून बदलावी लागली शाळा. बाकी काही नाही. बाकीचे आहेत का रे सगळे?"

"हो आहेत की. पण एकाच वर्गात नाहीत. वर्ग बदलले. काहींनी तुझ्यासारखीच पाचवीत शाळा बदलली आणि काही जण सहावीत गेले दुसरीकडं."

"बरं बरं. तुला काँग्रॅच्युलेशन्स!"

"थँक्यू!"

याच्या पुढं काही बोलायच्या आत मला पोरांनी फोटो काढायला बोलावलं आणि मग काही बोलणं झालं नाहीच नंतर तिच्याशी. त्याच दिवशी मला कल्पनाची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि आम्ही तिथं अधूनमधून चॅट करायला लागलो. पण आठवीत घरच्यांनी माझं फेसबुक अभ्यासामुळं बंद केलं. त्यामुळं कल्पनाशी नंतर काही बोलणं झालं नाही. तिथं तो विषय बंदच झाला होता. त्यानंतर ते आजपर्यंत, म्हणजे विज्यानं तिचं नाव काढेपर्यंत मी तिला विसरलो होतो.

च्यामायला! पण मग ती विज्याशी असं वागली त्याचा काय अर्थ असेल? नक्की काहीतरी गोची झाली असणार... 

कदाचित... कदाचित... 

तिला मी तो विजय वाटलो असेन का? 

ती मला सातवीत भेटली होती, माझ्याशी बोलली होती, ते सगळं त्या विजयसाठी होतं का? 

त्यानंतर माझ्याबरोबर चॅट केलं ते सगळं त्या विज्यासाठी असेल का?

माझी झोप आता पूर्ण उडाली. डोक्यात दुनियादारीमधला अंकुश चौधरीचा डायलॉग वाजायला लागला. 

"विज्या, मोठा गेम झाला यार...."


(२ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२३दरम्यान फेसबुक अकाउंटवर चार भागांत प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर