तरुणाई





 ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं.’ असं पुण्यात कुठल्याही भागातून, संस्थांमधून ऐकू येऊ शकतं, हे पुलंनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते बिचारे फक्त पुण्याच्या बाबतीत लिहून गेले. सध्या त्याच्या पुढची लेव्हल आली आहे. 

‘आजकालची ही पोरं म्हणजे...’ असं किंवा अशा अर्थाचं वाक्य आपल्याला कुठंही गेलं तरी ऐकू येतं. भविष्यात हे असं सगळीकडं ऐकू येईल आणि तेही मुख्यतः तरुणाईच्या बाबतीत, हे पुलंना कसं ठाऊक असणार! 

म्हातारी माणसं मध्यमवयीन लोकांबद्दल, मध्यमवयीन नोकरदार लोक तरुणाईबद्दल आणि तरुण लोक शाळकरी पोरांबद्दल 'आजकालची ही पोरं म्हणजे...' म्हणताना दिसतात.

सध्या भारतात तरुणवर्ग जास्त असल्यानं आपण त्यांच्याबाबतच बोलूया. का असं वागत असतील तरुण पोरं आणि पोरी? बेदरकार वागून काय मिळवत असतील ते? असे प्रश्न ठरावीक वयोगटापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांना पडून उपयोग नाही. ते प्रश्न त्या त्या वेळी त्यांचे त्यांनाच पडले पाहिजेत; पण ते तरुण असतील तेव्हाच! एकदा तारुण्य ओसरल्यावर हे प्रश्न पडून किंवा झालेल्या चुका लक्षात येऊन काय उपयोग? मग ते पुन्हा समजावणाऱ्या मध्यमवयीन लोकांच्या रांगेत जाणार आणि नव्या तरुण पिढीवर आपले अनुभव लादणार. ही साखळी कधीतरी आणि कोणीतरी तोडायला हवी ना? 

माझ्या मते या गोष्टीची सुरुवात तरुणांनीच केली पाहिजे. काहीही करण्याआधी ‘आपण हे का करत आहोत/करणार आहोत?’ असं स्वतःलाच विचारायला शिकलं पाहिजे त्यांनी. मग त्याला विषयाचं बंधन नाही. 

तरुणांबद्दल लोकांच्या अनेक तक्रारी असतात. काही वेळा ‘तरुण आहे, असू दे! मोठा झाला, जरा अनुभव आला की मग कळेल,’ असं म्हणून लोक सोडून देतात. मात्र, ‘तरुण आहे म्हणून काहीही करणार का? आम्ही काय तरुण नव्हतो का कधी? असं म्हणून काही लोक भांडायला उठतात. असो! मूळ मुद्दा असा होता, की तरुणांना त्यांची चूक वेळीच उमगली पाहिजे.

आता काही जण आपल्याकडून झालेल्या चुकांचा अभ्यास करून पुढं जातात; पण काही जण शिकत नाहीत. उलट ‘आपण जे करत आहोत तेच बरोबर आहे आणि जग चूक आहे,’ असं त्यांना वाटत असतं. याला ते स्वतः, त्यांचे आई-वडील आणि त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडिया जबाबदार आहे, असं मला वाटतं. कोणीतरी उठून एखादं पेज काढतं, त्यावर त्याचं मत लिहितं आणि हे तरुण लोक ते लिहिलेलं स्वतःच्या आयुष्याला जोडून ते कसं खरं आहे, हे दाखवत राहतात. स्वत:लाच फसवत राहतात. त्यांच्या वागण्यातून आणि स्टोऱ्यांमधूनही! यामध्ये उदास कंटेन्ट लिहिणारे लोक जास्त असतात. हा कंटेन्ट नेमका असतो कसा? त्यावर उपाय काय? याबाबत वेगळा विषय तयार होईल आणि त्याबद्दल एखादा तज्ज्ञ माणूस सांगू शकेल. 

(मी या विषयावर काही तज्ज्ञांशी बोलून एक स्वतंत्र लेख लिहिला आहे.)

बऱ्याच वेळा हे भरकटलेले तरुण आपले आपणच रुळावर येतात. त्यातले काही जण येऊ शकत नाहीत किंवा काहींना थोडा वेळ लागतो. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. सध्या या स्पर्धेच्या जगात प्रत्येकानं स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे. ते जर जमलं नाही, तर मग अवघड आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या घटकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे कुटुंब! पण तरुण त्यांच्यापासूनच दूर पळतात. ‘घरी काय सांगायचं सारखं!’ असं कोणीतरी म्हणतं आणि बाकीचे नंदीबैल (म्हशीही) ते फॉलो करतात.

साधारणपणे १६ ते २२ या वयोगटातली बरीच तरुण पोरं-पोरी घरच्यांना मित्र आणि मित्रांना कुटुंब समजण्याची घोडचूक करतात आणि इथंच ते चुकतात, असं मला वाटतं. प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी घरी सांगायच्या नसतात, हे मलाही माहीत आहे; पण कोणत्या सांगायच्या असतात, हेही वेळीच समजलं पाहिजे. या ठिकाणी कुटुंबाचीही थोडी चूक असते, असं मला वाटतं. ती म्हणजे त्यांनी गरजेपेक्षा जास्त दुर्लक्ष केलेलं असतं किंवा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवलेलं असतं. काही वेळा कुटुंब पोरांना समजून घेत नाही, विश्वासात घेत नाही. काही वेळा हीच चूक मुलं-मुलीही करतात. ते तर बऱ्याचदा कुटुंबाला गृहीत धरूनच वागतात.

इथं पालकांचा रोल जास्त महत्त्वाचा आहे. बहुतेकवेळा पालकांना त्यांच्या लहानपणी किंवा तारुण्यात जे मिळालेलं नसतं, ते सगळं पोरांना आयतं मिळतं. पालकच त्यांना त्या गोष्टी आणून देतात. न मागता आणि न कष्ट करता मिळालेल्या या गोष्टींमुळं त्यांची किंमत कळत नाही. त्यामुळं एक माज येतो. आता यात पालकांचं चुकलं आहे; पण थोडंच. त्यांनी पोरांना अशा गोष्टी देताना त्याची लगेचच किंवा खरोखर गरज आहे का, मुलं या गोष्टी मागतात का, हे फक्त तपासलं पाहिजे. ते तपासून झाल्यानंतर मुलांना त्या गोष्टी देताना त्यांची किंमत समजेल, हे ध्यानात घ्यायला हवं. त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलो, आपण मुलांना काय काय सोयीसुविधा देतोय, या गोष्टी पालकांनी त्यांच्या मुलांना बोअर न करता समजावून सांगितल्या पाहिजेत. 

एवढा मनमोकळा संवाद मुलांमध्ये आणि पालकांमध्ये असेल, तर चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी पोरं दहा वेळा विचार करतील. त्यातूनही उचललं तसं काही पाऊल, तरी ती चूक लवकरात लवकर सुधारण्याचं त्यांना भान येईल. ‘आपल्या आई-बापाला जी गोष्ट मिळाली नव्हती, ती त्यांनी आपल्याला मिळवून दिली. मग आपल्या पोरांना या गोष्टींबरोबरच आत्ता ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत किंवा त्यावेळी ज्या गोष्टींची गरज पोराला असेल त्या घेऊन देता यायला हव्यात,’ याचं भान पोरांना आपोआपच येतं. त्यांना त्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही; फक्त त्याची जाणीव करून दिली, की झालं पालकांचं काम.

मुलांनी काय काय करायला हवं ते सांगायला नको. त्यांना काही सांगायला गेलं, की ते टांगायला नेतात, अशी सगळ्या पालकांची तक्रार असते. त्यामुळं पालकांनीच मन मोठं करून (नेहमीप्रमाणं) समजूतदारपणे वागायला हवं? हो की नाही?


(१५ जानेवारी २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर