इंद्रधनुष्य

 




"होय. घरीच येतोय. निघायला उशीर झाला, त्यामुळं आता बस मिळत नाही. जरा उभं राहायला जागा असलेली बस मिळाली, की लगेच येतो."
वैतागूनच फोन ठेवला. फोनवर बोलताना माझा आवाजही थोडा वाढला होता. त्यात इअरफोन असल्यानं मी जरा मोठ्यानं बोलत होतो. एकूणच माझ्या अशा वागण्यानं बस स्टॉपवरचे लोक माझ्याकडं बघत होते. पण उसनी बेफिकिरी चेहऱ्यावर आणत आणि काहीही न झाल्यासारखं दाखवत मी पुन्हा फोनमध्ये डोकं घातलं. एकतर शनिवार, त्यात निघायला झालेला उशीर. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. माझ्यासमोरून २-३ बस गेल्या. एका बसमध्ये चढायलाही जागा नव्हती. बाकी २ बसमध्ये तर कंडक्टरनं चढू दिलं नाही. 'मागून बस येत आहेत' म्हणाले दोघंही. शेवटी मला हवी असलेली बस आली एकदाची. संध्याकाळची वेळ असल्यानं त्यात बसायला जागा नव्हतीच. शिवाय उभं राहायलाही फार कमी जागा होती. तरी 'ही बस काही सोडायची नाही' असं ठरवून ती बस थांबता थांबताच मी आत घुसायचा प्रयत्न केला. पण माझ्या मागून 'एक मिनिट, एक मिनिट' असा कानाला छान वाटणारा आवाज आला. मी मागं वळून बघू शकलो नाही; पण एका बाजूला होऊन 'त्या आवाजाच्या मालकिणीला' माझ्या पुढं जायला जागा करून दिली. तेव्हा एक काकू माझ्या पुढं गेल्या. मी खजील झालो. 'त्या आवाजाची मालकीण कोणीतरी वेगळी असेल', असा मनात पटकन विचार करून जमेल तशी मान मागं वळवली. पण कंडक्टर जोरात खेकसला,
"ए हिरो! चला वर. दरवाजे बंद होतील. अडकशील मग."
तो असं म्हटल्यावर जरा खसखस पिकली. मी पडीक चेहऱ्यानं वर आलो. मला वाटलं ती गोड आवाजाची मालकीण खालीच राहिली बस स्टॉपवर. तेवढ्यात 'एक हडपसर द्या.' अशा गोड आवाजात त्या काकूंनीच तिकीट मागितलं. मनातल्या मनात नशिबाला शिव्या देत 'पास आहे' असं सांगून मी पुढल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबलो. पण पुढं जात असतानाच इअरफोनची पिन मोबाईलमधून निसटली. त्यामुळं कानात सुरू असलेलं 'जिंदगी इक सफर है सुहाना' मोठ्यानं वाजायला लागलं. आजूबाजूचे लोक, ज्यांच्या कानात इअरफोन नव्हते, माझ्याकडं बघायला लागले. मी पटकन मोबाईल बाहेर काढला आणि आधी ते गाणं पॉज केलं. नंतर इअरफोन लावले आणि पुन्हा उरलेलं गाणं ऐकायला लागलो. हे सगळं होईपर्यंत खिडकीतून बाहेर थुंकणे, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, कंडक्टरशी सुट्ट्या पैशांवरून वाद घालणे, ट्रॅफिकला शिव्या देणे, घरच्यांशी किंवा होऊ घातलेल्या घरच्यांशी लाडीक आवाजात बोलणे अशा आपापल्या कामांना लोकांनी सुरुवातही केली होती.
मी माझं माझं गाणं ऐकत होतो; पण स्कार्फ बांधलेल्या चेहऱ्यावरचे, काजळ घातलेले टपोरे डोळे माझ्याकडं बघत होते. आता गेला आठवडाभर मीही त्या डोळ्यांकडं अधूनमधून बघत होतोच. पण असं डायरेक्ट बघण्याची हिम्मत नव्हती बाबा आपल्यात. शिवाय आमची जाण्यायेण्याची वेळ जवळपास असली, तरी दररोज काही आम्ही एकाच बसनं जात नव्हतो, एकाच ठिकाणी उतरत नव्हतो. त्यामुळं बोलण्याचा वगैरे प्रश्न तर नव्हताच. शिवाय पूर्वीपासून वर्गातल्या मुलींशी मोकळेपणानं बोलण्याची पंचाईत असताना अनोळखी मुलीशी कोण बोलणार? पण अशा वेळ देव आपल्या पाठीशी उभा राहतो. बहुतेक आजही देव माझ्या पाठीशी होता. 



"हॅलो."
"अं...?" असं म्हणत चेहऱ्यावर बावळट भाव येऊ न देता मी गाणं पॉज करून इअरफोन काढले. 
"मी म्हटलं, हॅलो!"
"हॅलो!"
"तू ऐकतोस किशोर कुमारांची गाणी?"
"संध्याकाळी घरी जाताना तर दररोज ऐकतो. पण असं का विचारलंत तुम्ही?" 
"पहिली गोष्ट म्हणजे, मी काही म्हातारी नाही. त्यामुळं मला एकेरीच बोलव. अहो-जाहो नको करूस. मला माहीत आहे की आपली काही ओळख वगैरे नाही. पण बऱ्याच दिवसांपासून तुला बघतीये मी बसमध्ये. चेहऱ्यावर हसू असतं तुझ्या आणि मान हलवत काहीतरी गुणगुणत असतोस. आणि आज 'जिंदगी इक सफर' वाजलेलं ऐकलं. आपल्या जनरेशनमध्ये लोकांना ही गाणी फार ओल्ड फॅशन्ड वाटतात ना! ऐकत नाही कोणी. मग राहवलं नाही म्हणून विचारलं तुला. राग तर नाही ना आला?"
मला राग कश्शाला येईल कप्पाळ! उलट आजच्यासारखा सुंदर दिवस नव्हता माझ्यासाठी दुसरा. तिनं प्रश्न विचारून काही सेकंद निघून जातायत, हे लक्षात येताच मी म्हणालो,
" छे छे! राग कशाला येईल? या जुन्या गाण्यांचं म्युझिक बऱ्याचवेळा शांत असतं. एखाद्या गाण्याला जरी ते शांत नसलं, तरी बाकीच्या गाण्यांप्रमाणं शब्द तर सुंदर असतातच. ते गुणगुणतो मी. पण तुम्हाला..." 
स्कार्फमधले ते डोळे माझ्यावर वटारलेले दिसले. 
"सॉरी, सॉरी. पण तुला असं विचारावंसं का वाटलं? तुला पण आवडतात का ही गाणी?"
"हो. खूप आवडतात मला. पण मी असं येता जाता ऐकत नाही. घरी गेल्यानंतर सगळं आवरलं की शांतपणे एका जागी बसून गाणी ऐकत बसते. असं जर ऐकलं ना, तर लिंक तुटते गाण्याची. ते मला अजिबात आवडत नाही."
"बर बर. तुला अजून कोणाकोणाची गाणी आवडतात? म्हणजे..."
"ऐक ना... सॉरी तुला असं मध्येच थांबवलं. पण माझा स्टॉप आला अरे. आपण उद्या भेटूच की तेव्हा बोलू. अर्रर्रर्र! उद्या रविवार आहे. सोमवारी होईल मग आता भेट. तेव्हा बोलू जर वेळ आणि बस एक असेल तर. बाय बाय."
"बा..य, बा...य!" असं मी म्हणेपर्यंत ती गर्दीतून वाट काढत पुढं गेली आणि उतरलीसुद्धा!


आज संध्याकाळी जरा लवकरच बाहेर पडलो. इअरफोनही लावलेले नव्हते मी. आज सोमवार. का कोणास ठाऊक, पण ती अनोळखी असूनही परवा तिच्याशी बोलून बरं वाटलं होतं. गाणी ऐकून वाटतं ना, अगदी तस्संच! लवकर बस येऊ दे आणि हळूहळू जाऊ दे, अशी मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. परवाच्या दिवशी मी फार काही बोललो नव्हतो. मात्र आज आपणच काहीतरी विषय काढून बोलू, असं मी ठरवलं होतं. शेवटी आली एकदाची बस. गर्दी असूनही धक्काबुक्की करत मी वर चढलो आणि कंडक्टरनं 'मधले पुढं सरका. दरवाजातले वर या' असं म्हणायच्या आतच मी पुढं सरकलो. पुढं जात असताना काही लोकांनी मला तोंडातल्या तोंडात शिव्या दिल्या. एरवी इअरफोन असल्यानं त्या ऐकू येत नाहीत; पण आज ऐकू आल्या. तरीही त्यांच्याकडं मी लक्ष दिलं नाही. कारण आज कानात गाणी वाजत नसली, तरी डोक्यात वाजत होती. मी तिला शोधत होतो. तिच्या स्कार्फसारखाच एक स्कार्फ मला दिसला. पण ते डोळे तिचे नव्हते, हे मी तो स्कार्फबंद चेहरा बघताच ओळखलं. डाव्या बाजूची महिलांची राखीव रांग, उजवीकडं 'जनरल' रांगेत अतिक्रमण केलेल्या स्त्रिया आणि उभ्या असलेल्या स्त्रिया, असं माझं चौफेर लक्ष होतं. पण ती काही शेवटपर्यंत दिसलीच नाही. मनातल्या मनात निराश होऊन माझा स्टॉप आल्यावर मी उतरलो आणि घरी गेलो. 
आज मंगळवार. 'काल लवकर निघाल्यामुळं चुकामुक झाली असेल. त्यामुळं आज वेळेत बाहेर पडू. पण आज काही कालसारखा उतावीळपणा करायचा नाही. गप गाणी ऐकत जायचं. ती भेटली तर भेटली. नाही तर नाही.' असा विचार करत मी माझी वेळ झाल्यावर बाहेर पडलो. माझी बस येईपर्यंत वेळ गेला थोडा. पण बस लांबून येताना दिसली आणि त्याच्यासोबत खिडकीत ते टपोरे डोळेही. ओळखीचा स्कार्फ आणि डोळे दिसताच मी बसमध्ये चढता चढताच गाणी पॉज केली. बोलायचं काय, याची उजळणी काल केलेली होतीच. आज तिच्यापाशी गेल्यावर मी काही बोलणार तेवढ्यात तिनं उठून माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका आजोबांना बसायला जागा करून दिली.
"अरे, सॉरी हां. परवा बोलण्याच्या नादात माझा स्टॉप आला ते समजलं नाही, म्हणून लगेच पळावं लागलं मला."
आता 'परवा रविवार होता. आपण शनिवारी भेटलो होतो.' या टेक्निकल गोष्टी न बोलता मी म्हणालो,
"सॉरी काय त्यात? तेव्हाचा विषय आज कंटिन्यू करू."
"हो. मला किशोर कुमार, आर डी बर्मन, लता मंगेशकर, आशा भोसले, नुसरत अली खांपासून ते केके, सोनू निगम, शान असे सगळेच आवडतात. खूप मोठी लिस्ट आहे. हेच विचारत होतास ना तू त्या दिवशी?"
'अरे वा!' असं मनात म्हणून मी तिला म्हणालो,
"हो मला पण. १९८०-२००० या काळातली जवळ जवळ सगळीच गाणी आवडतात मला. म्हणजे त्याच्यानंतरचीही आवडतात. नाही असं नाही. पण प्रमाण कमी आहे. २०१० नंतर तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच गाणी आहेत जी मला आवडतात."
"अगदी अगदी! आता आपण काही म्हातारे नाही. पण आपल्या पुढच्या पिढीला जी गाणी आवडतात, त्यांना गाणी म्हणावं की नाही हासुद्धा एक प्रश्न आहे."
"मग काय तर!" असं म्हणत आम्ही नकळतपणे एकमेकांना त्या गर्दीत टाळ्या दिल्या. 
"आपण गेले २ दिवस बोलतोय. पण एकमेकांना नावही विचारलं नाही आपण. मी कावेरी. आणि तू?"
"मी वरद."
"अरे वा! बाप्पाचं नाव. बरं , चल. येते मी. उद्या यायचं आहे. सगळ्यांना सुट्टी असली, तरी आम्हाला नाही. परवा भेटू आपण." 
"मलाही नाही सुट्टी उद्या. आम्हालाही बोलावलं आहेच."
"मग ठीके, उद्याच भेटू. पुढच्या स्टॉपला उतरायचं आहे. आत्ताच जाऊन थांबते पुढं, नाहीतर परवासारखं होईल. चला, बाय."
"हो हो. बाय."
उद्या का सुट्टी नाही, कुठं काम करतेस वगैरे प्रश्न विचारायचे होते. पण राहून गेले. असू दे. उद्या भेटणार आहोतच, तेव्हा विचारायचं.


आज संपूर्ण दुनियेला सुट्टी होती; पण मी कामाला आलो होतो. वर्क फ्रॉम होम करण्याचाही ऑप्शन होताच. पण जर ते निवडलं असतं, तर आजची भेट हुकली असती ना! म्हणूनच 'मलाही उद्या सुट्टी नाही' असं काल सांगून टाकलं होतं. आज जरा जास्त बोलूया, ती काय काम करते ते विचारूया. झालंच तर इन्स्टा, फेसबुक आयडी विचारूया, असं काहीसं होतं माझ्या मनात. नंबर मागायचा विचारही एकदा आला होता; पण तिला जर काही विचित्र वाटलं तर कशाला! असं मनात आल्यानं नंबर मागायचा विचार रद्द केला. तिनं जर स्वतःहून दिला तर बघू, नाहीतर जसं चाललंय तसं चालू दे. असं ठरवत असतानाच बस स्टॉप आला. मी पोहोचल्यावर ५ मिनिटातच बस आली. आज ट्रॅफिक नव्हतं आणि बसही निम्म्यापेक्षा जास्त मोकळी होती. त्यामुळं बसायला जागा मिळाली. मी जागेवर बसून कंडक्टरला पास असल्याची खूण केली आणि तिला शोधायला लागलो, डोळ्यांनीच. बहुतेक तीही मला शोधत होती. चार सीट सोडून ती महिलांच्या राखीव रांगेत पुढं बसली होती आणि मी जनरल रांगेत मागं. ती मागं आली, मी पुढं गेलो आणि मोकळ्या पॅसेजच्या शेजारच्या सीटवर आम्ही दोघंही होतो त्याच रांगांमध्ये बसलो. 
"तू कुठं काम करतेस? आज सुट्टी कशी काय नाही?" अशी मीच संभाषणाची सुरुवात केली आणि माझं मलाच भारी वाटलं.
"अरे मी सीए इंटर्न आहे. त्यामुळं नो सुट्टी. फक्त काम. तू काय करतोस?"
"एका डिजिटल मार्केटिंग फर्ममध्ये काम करतो मी. आम्हाला तर जेव्हा सुट्टी असेल, तेव्हाही पडलं तर काम करावं लागतं."
"बापरे! वैताग येत असेल ना, सुट्टीच्या दिवशी काम म्हटल्यावर?"
"कधी कधी येतो. पण मला हे क्षेत्र आवडतं. मजा येते काम करताना."
"इथलाच आहेस का तू मूळचा?"
"हो. म्हणजे लहानपणापासून इथं आहे. जन्म इथला नाही."
"मी तर गेल्या वर्षी आले इथं. त्याआधी गावी होते. त्यामुळं सकाळी गडबड होते माझी बऱ्याचदा सगळं आवरून निघताना. शिवाय गेल्यावरही आवराआवरी, मग स्वयंपाक करायचा."
"कल्पना करू शकतो मी. त्यात बसनं वगैरे प्रवास असताना जास्त वेळ लागतो. ट्रॅफिक, गर्दी, कधी कधी बस बंद पडतात मध्येच."
"तेच ना. पण एक बरं आहे. उद्यापासून माझा बसप्रवास बंद होणार एकदाचा."
"..." काही बोलताच आलं नाही मला. मी काही बोलायच्या आत तिनं सांगितलं,
"अरे मी ज्या फर्ममध्ये इंटर्न आहे ना, त्यांची पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आहे. कोव्हीड काळात बंद केली होती; पण उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मला जेव्हा हे समजलं तेव्हा खोटं वाटलेलं. इंटर्नला कशी मिळणार ती सर्व्हिस असं वाटलेलं. पण तसं नाहीए. त्यामुळं उद्यापासून नो दगदग!"
"बर, बर. चांगली गोष्ट आहे. निदान तुझा तरी त्रास वाचला आणि आमच्या बसच्या गर्दीतला एक माणूस कमी झाला." असं मी म्हणेपर्यंत तिचा स्टॉप जवळ आला होता. ती मला बाय करून उठली आणि मी कानात इअरफोन टाकून प्लेलिस्ट सुरू केली. त्यावर गाणं लागलं होतं,

'मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है...'



(पूर्वप्रसिद्धी प्रभात दिवाळी अंक २०२२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर