सावल्या



आज जसा मी पल्लवीशी बोललो तसं उद्या रमाशी बोलेन. म्हणजे तेवढीच मुलींशी बोलायची सवय होईल. मला मित्र पुष्कळ आहेत. पण मुलींशी बोलायला गेलं की नको नको वाटतं. का कुणास ठाऊक! पण त्या माझ्याशी बोलणार नाहीत, मला हसतील अशी भीती वाटते सारखी. उद्या रमाशी काय काय बोलायचं आणि ती कशी बोलेल याची रंगीत तालीम करत आरशासमोर उभा होतो. अचानक आरशात माझ्याऐवजी ती सावली दिसली आणि माझी झोप मोडली. दचकून उठलो. घामाघूम झालो होतो. माझ्या तोंडावरून काहीतरी हलल्यासारखं वाटलं. असं वाटलं कोणीतरी माझ्या तोंडावरून हात फिरवला. मला कोणी कानाशी ढोल वाजवले तरी जाग येत नाही एरवी. पण गेले ४-५ दिवस अशीच जाग येत होती. कोणीतरी तोंडावरून हात फिरवतंय असा भास होत होता. म्हणजे रात्री किंवा पहाटे अशा ठरावीक वेळेला नव्हे, तर १२ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत कधीही जाग येत होती.

आठवडाभर असा घाबरत काढल्यावर मी एक दिवस ठरवलं, की आज काहीही होऊ दे जागं राहायचं. झोपायचंच नाही रात्री. तसं ठरवल्याप्रमाणं मी खोलीत एका कोपऱ्यात लपलो. मी गादी घालून खाली झोपतो. कॉटवर नाही झोपत. नेहमीसारखी खाली गादी घातली, त्यावर उशा ठेवल्या आणि कोणीतरी झोपल्याचा भास व्हावा अशी चादर अंथरून ठेवली. ही व्यवस्था मी रात्री १० वाजता केली आणि सगळीकडं निजानीज होईपर्यंत थांबलो कोपऱ्यात दिवे बंद करून. गादीकडं बघत चवड्यावर बसलो होतो, संडासला बसतात तसा. बाकी कसाही बसलो असतो तर निश्चितच झोपलो असतो बसल्या बसल्या. पायाला रग लागली म्हणून घड्याळ पाहिलं तर हादरलोच. 

मी रात्रीचे १२.३० वाजलेले पाहिले होते, त्याला नुकताच अर्धा तास वगैरे झाल्यासारखा वाटत होता. पण तेव्हा वाजले होते ३.४५. म्हणजे मधला संपूर्ण वेळ मी झोपलो होतो? आणि आज मला जाग कशी नाही आली? आज बरा सावलीचा वगैरे भास नाही झाला! असा विचार करत असतानाच नजर समोर असलेल्या गादीवर गेली. तोंडातून शब्द फुटेना. जोरात ओरडावंसं वाटत होतं. कारण मी जिथं उशीवर डोकं ठेवतो तिथं, बरोबर त्याच जागेवर एका हाताची सावली हलताना दिसली. बसल्याजागी उडालो मी. आत्तापर्यंत जेवढ्या म्हणून भयकथा वाचल्या आहेत, त्यातली सगळी पात्रं, सगळे प्रसंग झाडून समोर आले. पण मी थोडा धीर एकवटला. त्या हलणाऱ्या हाताच्या सावलीकडं लक्ष देऊन बघायला लागलो, पण बसल्या जागेवरूनच. जितका मी त्या सावलीकडं बघायला लागलो तशी माझी भीती जरा कमी झाल्यासारखी वाटली. नक्की ती हाताची सावली कुठून आली हे मी हळूहळू बघितलं तर मला माझंच हसू आलं. खिडकीबाहेर उभ्या असलेल्या 'सावली' देणाऱ्या झाडाची फांदी माझ्याकडं बघून हसत होती.


(१६ जून २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर