बसप्रवासी
मनातल्या मनात बसला शिव्या घालत उभा होतो. उन्हात. चेहर्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या, शेवटी आली एकदाची बस. माझ्या सीटचा नंबर सांगितला आणि जागेवर जाऊन बसलो खिडकीतून बाहेर बघत. वैतागलो होतो.
दिवसभर काम केलं, गाडी मेहेंदळे गॅरेजजवळ लावली आणि रिक्षा मिळेल म्हणून रस्त्याने मागे बघत बघत येत होतो. वाटेत बस सुटू नये म्हणून चालकाला फोन करून सांगत होतो की, "बाबा येतोय मी. मला घेतल्याशिवाय जाऊ नको." तर तो म्हणाला, "लगेच या बस लागली आहे."
रिक्षा काय मिळाली नाहीच शेवटी. चालत, पळत दांडेकरला पोहोचलो तर जागेवर बस नाही. एकाला विचारल्यावर तो म्हणाला, "येईल थांबा. तिकडं सामान भरून घेतायत बसमध्ये." जे डोकं फिरलं होतं माझं. पण आली एकदाची बस आणि मी गार वारं खात खिडकीतून बाहेर बघत बसलो.
मी बाहेर बघत असतानाच "Excuse me!" अशी मधाळ आवाजातली हाक (बहुतेक मलाच मारलेली) ऐकू आली. मी उजवीकडे बघितलं. गव्हाळ रंगाच्या कपाळावर हलकी घामाची धार, केसाला बहुतेक मागं क्लिप लावली होती, खांद्याला टेकतील अशी चंदेरी लांबडी कानातली, आकाशी रंगाचा टॉप, काळी जिन्स आणि एका खांद्यावर सॅकचा एक बंद अशी एक मुलगी त्रासिक चेहऱ्यानं (आता) माझ्याकडं बघत होती.
मला काही कळेना. मी तर काहीच केलं नाही. मग माझ्याकडं असा मारक्या म्हशीसारखा लूक का म्हणून??
त्या प्रश्नाचं उत्तर तिनं माझ्या शेजारच्या सीटवर ठेवलेल्या माझ्याच सॅककडे रागाने बघत दिलं. (काय सुंदर, बोलके डोळे होते तिचे)
मी लगेच सॅक मांडीवर घेतली आणि तिला सॉरी म्हणालो.
स्वतःची सॅक वर ठेऊन मला म्हणाली, "दे तुझी सॅक. वर ठेवते."
"नको. असू दे माझ्याकडं."
"कुठं जाणार आहेस?"
"कोल्हापूरला."
"मग पूर्ण वेळ अशीच ठेवणार उरावर?"
"हो."
तोंड वाकडं केलं आणि बसली माझ्या शेजारी.
च्यामारी... माझ्यावर असली दादागिरी करणं, माझ्याशी असं बोलणं ही फक्त माझ्या बहिणीची मक्तेदारी आहे. मित्रांचीही हिम्मत नाही माझ्याशी असं बोलायची. ही कोण लागून गेली? आणि मी ऐकून का घेतलं? जाऊदे आता नेहमीसारखा नंतर विचार करून काय फायदा होता? गप खिडकीबाहेर बघत बसलो.
"ऐक ना."
(बोला काय ते एकदाचं) "काय?"
"अरे मी जवळजवळ वर्षभराने आले या एरियात. म्हणजे इथे येणं होतं. पण सिंहगड रोडने एका वर्षानेच जातीए."
(बरं मग?)"....."
"मी प्लीज थोडा वेळ तुझ्या जागी बसू का? थोडाच वेळ. पाहिजे तर वडगाव पूल किंवा कात्रज बोगद्यानंतर तू परत बस."
"हो बस की." (का बस? मुद्दाम खिडकीजवळची सीट घेतली होती मी)
"बापरे! हे किती भारी आहे."
जवळजवळ ती किंचाळली. ती नक्की काय काय बघणार आहे खिडकीतून ते मीही जरा बघत होतो. पण ती अशी ओरडल्यावर मी पटकन मान वळवली आणि समोर बघायला लागलो. राजाराम पुलाजवळ चौकात एक शिल्प उभारलं आहे. बहुतेक त्यासाठी होता तो आरडाओरडा.
त्यानंतरही "अय्या! हे इथे नव्हतं. याचं रेन्युएशन कधी केलं?" अशी तिची स्वतःशीच चर्चा चालू होती.
वडगाव पूल आल्यावर बस डावीकडे आणि ती उजवीकडे वळली.
"बस आता तू."
"नको नको. राहूदे. मला असंही काही बघायचं नाही बाहेर."
मला त्या मुलीचा थोडा रागही येत होता आणि तिच्याबद्दल काहीतरी गंमत वाटल्यासारखंसुद्धा होत होतं.
"मी राणी."
कुठल्या देशाची?, मी राजा! असली तोंडावर आलेली फालतू प्रश्नोत्तरं गिळली आणि मी माझं नाव सांगितलं.
"तू काय करतोस?"
मला हसावं की रडावं ते कळेना. ही कसली गप्पा मारण्याची जबरदस्ती...
"मी मीडिया हाऊसमध्ये जॉब करतो."
"म्हणजे तू Journalist आहेस???"
"हो तसंच काहीसं."
"वॉव! किती मस्त फिल्ड आहे ते. लोकांना भेटायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, वाटल्या तर त्यांच्या स्टोऱ्या करायच्या, मुलाखती घ्यायच्या."
"........"
"मी HR associate आहे."
"इथेच का??"
"नाही रे. मुंबईला."
"बर बर. छान असतो की तुमचाही जॉब."
"कसला डोंबलाचा. म्हणजे तसं नाही. असतोच चांगला पण सध्या मला टेक्निकल काम जास्त आहे."
"हो हो असतं तसं सुरुवातीला." (उगाच आपलं काहीतरी. मला काय कळतंय त्यातलं)
"तू कोल्हापूरला जाणार आहेस ना?"
(अरे! ही पोरगी थांबेचना) "हो."
"बर बर. मी थोडं अलीकडे उतरणार आहे."
"हो का! अरे वा!"
माझा हा कुत्सित स्वर बहुतेक तिच्या लक्षात आला आणि तिनं मोबाईल काढला.
पुढचे ३.३०-४ तास असेच गेले. गप्प. ती तिचं काम करत होती. मी गाणी ऐकत बसलो होतो.
तिनं माझी झोपमोड केली आणि म्हणाली, "सॉरी तुला उठवलं. पण मला उतरायचं आहे."
मी उठलो आणि तिची सॅक काढून दिली.
"थँक्यू!"
आता मात्र मला स्मितहास्य करायला जमलं. तेही गोऽऽऽड...
"बाय!"
"अच्छा बाय!"
खाली उतरल्यावरसुद्धा बाय करत होती.
मीही टाटा केलं तिला आणि परत गाणी ऐकायला लागलो.
च्यामायला काय योगायोग आहे. तिची माझी काहीही ओळख नव्हती. तरी माझ्याशी ती किती चांगलं बोलत होती आणि मी?
मग ठरवलं. आता शक्यतो असं करायचं नाही. जर आपल्याशी कोणी बोलायचा प्रयत्न करत असेल तर बोलण्याचा प्रयत्न करायचा. जमेल तितकं जमेल.
पण परत विचार आला. अरे आपण सगळं होऊन गेल्यावर विचार करतोय पूर्वीसारखा. जाऊदे जे जेव्हा होईल तेव्हा होईल. तेव्हाचं तेव्हा बघू असा विचार करत उतरलो.
(१७ मार्च २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध झालेला मजकूर)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा