महामाया निळावंती
महामाया निळावंती
आपल्याला कोणतीही एखादी गोष्ट हवी असेल किंवा काही साध्य करायचं असेल, तर त्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. फार मेहनत केली, तर त्याची चांगली फळं मिळतात. पण मेहनत ही आलीच.
‘अगर तुम किसी चीझ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है,‘ हा ‘ओम शांती ओम’मधला डायलॉग संपूर्ण खरा नाही. काही अंशीच तो प्रत्यक्षात येऊ शकतो. असाध्य ते साध्य करण्यासाठी लागते, ती दुर्दम्य इच्छाशक्ती. ही नेमकी कशाशी खातात, ते जाणून घ्यायचं असेल, तर सुमेध लिखित निळावंती वाचायला पाहिजे. पण एक गोष्ट आधीच सांगतो, की या कादंबरीमध्ये जी इच्छाशक्ती आहे, ती चांगली नाही. ती सर्वनाशाकडे घेऊन जाणारी आहे, हेही तितकंच खरं आहे.
निळावंती या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलेलं वाचलं होतं. म्हणजे अर्थातच कौतुक. कारण ही एक रहस्य उलगडणारी कादंबरी आहे. ४०० वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या जंगलात राहणाऱ्या निळावंतीशी बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली आणि नंतर तिचा खून केला. या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो.
अलीकडच्या काळात, १९९२साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. सोबत आणलेल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी तो जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरीत्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? निळावंती आजही अस्तित्वात असेल, तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘महामाया निळावंती’मध्ये मिळतील.
कादंबरी वाचायला सुरुवात केली, तेव्हा अतिशय बोअर झालं. सुरुवातीची दोन पानं मी दोन वेळा, दोन दिवस वाचली. काहीच शिरत नव्हतं डोक्यात. पण म्हटलं, हळूहळू पुढं जाऊ, लागेल रेफरन्स. असं म्हणून सुरुवात केली आणि मग कादंबरीबद्दल वाचलेले रिव्ह्यू केवळ पटायला लागले नव्हे, तर माझंही तेच व्हायला लागलं. आता पुढं काय, त्याचं काय होणार, ते एकमेकांना भेटणार का, असले प्रश्न सतत मनात सुरू होते. पण कादंबरी संपली, तेव्हा फार वाईट वाटलं. आयुष्यातलाच एक मोठा अध्याय संपला, असं आपल्याला एखादी आवडलेली वेबसीरिज संपल्यावर वाटतं ना, तसं झालं. मला आता कादंबरीतल्या पात्रांची पुढची गोष्टही वाचायची इच्छा होत होती.
खरं तर निळावंती जानेवारीतच वाचून संपली. बरेच दिवस त्याचं गारूड मनावंर होतं हे कितीही खरं असलं, तरी लिहायचा आळस असल्यानं पोस्ट लिहायला एवढा वेळ झाला. ज्यांना तर्क लावत बसायचे आहेत आणि ‘ह्याऽऽऽ असं कुठं असतं का,’ असे प्रश्न डोक्यात येतात, त्यांनी ही कादंबरी कृपया वाचू नये. कारण त्याबद्दल तुम्ही वाईट बोलाल. हांऽऽऽ तुम्हाला जर वेगळं काही तरी आणि कल्पनाविस्तार करतात तरी कसा हे वाचायचं असेल, तर त्यांनी हे जरूर वाचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. ‘हॅरी पॉटर’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’, ‘नार्निया’ अशा कल्पना परदेशातच कशा सुचतात? आपल्याकडं अजून तसलं काही लिहिलं गेलं नाही, तयार केलं नाही कुणी.... अशी रडरड करणाऱ्यांनी तर ‘निळावंती’ जरूर वाचावी. आणखी एक गोष्ट म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना. तो एक सरप्राइजिंग एलिमेंट आहे.
या कादंबरीवर उत्तमातली उत्तम कलाकृती, मग तो सिनेमा असो किंवा वेबसीरिज, जरूर व्हावी अशी माझी इच्छा आहे. अशीच पुढची सुंदर फिक्शन कादंबरी वाचायला आवडेल.
(चित्रे एआय वापरून तयार केली आहेत. आणखी चांगली चित्रे तयार करता येतील.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा