द व्हाइट टायगर
द व्हाइट टायगर
शोषण, दारिद्र्य, गरिबी, भ्रष्टाचार, जातीयवाद हे सगळे मुद्दे किंवा यापैकी किमान काही तरी भारतीय सिनेमांत आता असतातच असतात. अनेक वेळेला चघळून चोथा झालेले हे शब्द असले, तरीही त्यांचा वापर नव्याने केला जातो, तेव्हा ते वेगळेपण उठून दिसतं. 'द व्हाइट टायगर' या सिनेमातही हे वेगळेपण उठून दिसतंय. हा सिनेमा २०२१मध्ये अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि आपल्याकडे थेट नेटफ्लिक्सवर आला. अरविंद दिगा यांनी लिहिलेल्या 'द व्हाइट टायगर' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. २००८ साली प्रकाशित झालेल्या या इंग्रजी भाषेतल्या पुस्तकाला त्याच वर्षीचा ४०वा बुकर पुरस्कारही मिळाला आहे.
साधी, नेहमीचीच वाटणारी; पण एक सुंदर कथा आहे. भारताच्या एका खोपच्यातल्या खेडेगावातून एक मुलगा दारिद्र्याला वैतागून मोठ्या शहरात जातो आणि कधी परिस्थितीचा, तर कधी माणसाचा पायरी म्हणून वापर करून एक मोठा उद्योजक होतो. पण या साध्या गोष्टीची मांडणी उत्तम केल्यानं सिनेमा बघावासा वाटतो.
बलराम हलवाई (आदर्श गौरव) एका खेड्यात अतिशय हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढतोय. त्याचे वडील कमवून आणलेले सगळे पैसे त्याच्या आजीला देत असतात, द्यायलाच लागत असतात. नाईलाज असतो. त्या पैशातला एक तृतीयांश हिस्सा गावच्या जमीनदाराला (महेश मांजरेकर) आणि त्याचा मुलगा (विजय मौर्य) द्यायला लागत असतात. बलरामच्या वडिलांकडे कधीच पैसे नसतात, म्हणून एके दिवशी त्याला शाळा सोडून त्याच्या भावाबरोबर कोळसा फोडायला बसवलं जातं. त्यात मधल्या काळात त्याच्या वडिलांना टीबी होतो आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू. बलराम असाच मोठा होतो. त्यालाही त्याच्या आजीला हातात आलेले सगळे पैसे द्यावे लागत असतात. एके दिवशी जमीनदाराचा छोटा मुलगा अशोक (राजकुमार राव) गावात येतो. तो अमेरिकारिटर्न असतो. बलराम त्याला बघून त्याच्या हाताखाली काम करायचं ठरवून मोकळा होतो.
आता अशोक अमेरिकेतून परत आलाय म्हटल्यावर त्याला ड्रायव्हर लागणार असल्याचं एके दिवशी बलरामला कळतं. मग हातात येतील, ते सगळे पैसे तुला देईन, असं आजीला वचन देऊन तो धनबादला त्यांच्या घरात जातो. तिथं नोकरी मिळवतो. तिथं गेल्यावर अशोकची बायको पिंकी (प्रियांका चोप्रा) आणि अशोकचं नातं, मग त्या दोघांचे अशोकच्या घराच्यांशी असलेले संबंध याबद्दल बलरामला कळायला लागतं. बलराम मुळातच महत्त्वाकांक्षी असतो. त्याला दारिद्र्यातून बाहेर पडून मोठं व्हायची इच्छा लहानपणापासूनच असते. मात्र, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीयवादाला, गरीब-श्रीमंत दरीला वैतागलेला बलराम काय करतो? त्याला मोठं होण्याची संधी मिळते का? त्या भानगडीत अशोक आणि त्याच्या घरच्यांचा काय रोल असतो? बलरामच्या कुटुंबाचं काय होतं, हे सगळं सिनेमातच पाहावं लागेल.
सिनेमाचं दिग्दर्शन आणि पटकथा रामीन बहरानी यांची आहे. ते अमेरिकी लेखक-दिग्दर्शक आहेत, हे वेगळं सांगायची गरज पडत नाही, कारण सिनेमा बघताना हा भारतीय दिग्दर्शकाचा नाही हे सहज जाणवतं. कथेची मांडणी, बांधणी, पात्रांची निवड, बिटवीन द लाइन्स अनेक मेसेज सोडणं या सगळ्यावर त्यांची मजबूत पकड असल्याचं दिसतं. सिनेमाचं संगीत, संकलन आदी महत्त्वाच्या बाबींची धुराही विदेशी लोकांनीच सांभाळली आहे. त्यामुळं टिपिकल बॉलिवूड मसाला यात बघायला मिळत नाही, हे विशेष. आदर्श गौरव, राजकुमार राव आणि प्रियांका चोप्रा यांनी चांगली कामं केली आहेत. महेश मांजरेकर यांनीही छोटीशी भूमिका चांगली निभावली आहे. त्यांच्या भूमिकेला जास्त वेळ काम दिलं असतं, तर कदाचित या सिनेमात बॉलिवूड आलं असतं, असा अंदाज आहे. सिनेमाच्या सुरुवातीला दिसणारा बलराम आणि सिनेमाच्या शेवटी दिसणारा बलराम या दोन्हींतली तफावत, त्यांच्यातला ग्राफ आदर्श गौरवने उत्तमरीत्या दाखवला आहे. प्रत्येक माणूस पिंजऱ्यात बंद असलेल्या कोंबडीसारखा आहे. कोंबडीच्या डोळ्यादेखत इतर कोंबड्या मरत असतात, तिला माहिती असतं, की पुढचा आपलाच नंबर आहे. तरीही ती त्या पिंजऱ्यातून सुटायचा प्रयत्न करत नाही, हीच प्रत्येक माणसाची अवस्था आहे, हे बलराम आपल्याला सांगतो. हे खरं तर प्रत्येकाला माहिती आहेच; पण सिनेमात प्रभावीपणे दिसलं आहे. बलरामला स्टॉर्क त्याची जात विचारतो, तेव्हा तो सांगतो; पण माणसाचे दोन प्रकार असतात. एकाचं पोट मोठं असतं, दुसऱ्याची भूक, असंही बलरामच आपल्याला जातीबद्दल सांगतो.
२०२१ साली आलेला सिनेमा मी आज पाहिला, तरी परिस्थिती जैसे थे असल्यानं मला तो आत्ताचाच वाटला. पुढच्या काळात तो तसाच वाटू नये, यासाठी बदल घडायला हवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा