मोहिनी
या शहरातलं चित्रही बऱ्याच शहरांमध्ये अगदी सर्वसामान्य वाटेल, असंच होतं. अगदी निर्मनुष्य नाही; पण गजबजलेलाही म्हणता येणार नाही असा मध्यवर्ती शहरातला एक रस्ता. रात्रीचे १२ वाजून गेलेले. मधूनच गार वाऱ्याची झुळूक येऊन हाडं गोठवून टाकत होती. रस्त्यावर दिवे होते; पण त्यातले काही सुरू, तर काही बंद होते. ते असायचेच! त्यात मध्येच कुठूनतरी लांबवरून कुत्र्यांचं भुंकणं छातीत धडकी भरवत होतं. रस्त्याच्या एका टोकाहून सुशिक्षित, तर दुसऱ्या टोकाहून अशिक्षित बेवड्यांची अस्पष्ट कुजबुज ऐकू येत होती. अशा या रस्त्यावरून मोहिनी जीव मुठीत धरून चालली होती. सडपातळ, नाजूक बांधा, मोकळे केस, पिटुकली जिवणी, अंगावर पांढरा क्रॉप टॉप आणि जीन्स असा एकंदरीत अवतार होता तिचा. लांबून तिला कोणी पाहत असेल, तर ती दिव्यांच्या लपाछपीमुळं कदाचित अधे-मध्ये अदृश्य होतीये की काय, असं वाटेल. मोहिनीच्या चेहऱ्यावर भाव तसे भेदरल्यासारखे होते; पण डोळे कोणालाही भुरळ घालतील असेच होते. म्हणून तर तिचं नाव होतं, मोहिनी! मान खाली घालून ती झपाझप चालत होती. एवढी भराभर चालत होती, तरीही तिच्या चालण्याचा आवाज काही येत नव्हता. तिच्या मागून पुढं जाण...