मोहिनी
या शहरातलं चित्रही बऱ्याच शहरांमध्ये अगदी सर्वसामान्य वाटेल, असंच होतं. अगदी निर्मनुष्य नाही; पण गजबजलेलाही म्हणता येणार नाही असा मध्यवर्ती शहरातला एक रस्ता. रात्रीचे १२ वाजून गेलेले. मधूनच गार वाऱ्याची झुळूक येऊन हाडं गोठवून टाकत होती. रस्त्यावर दिवे होते; पण त्यातले काही सुरू, तर काही बंद होते. ते असायचेच! त्यात मध्येच कुठूनतरी लांबवरून कुत्र्यांचं भुंकणं छातीत धडकी भरवत होतं. रस्त्याच्या एका टोकाहून सुशिक्षित, तर दुसऱ्या टोकाहून अशिक्षित बेवड्यांची अस्पष्ट कुजबुज ऐकू येत होती. अशा या रस्त्यावरून मोहिनी जीव मुठीत धरून चालली होती.
सडपातळ, नाजूक बांधा, मोकळे केस, पिटुकली जिवणी, अंगावर पांढरा क्रॉप टॉप आणि जीन्स असा एकंदरीत अवतार होता तिचा. लांबून तिला कोणी पाहत असेल, तर ती दिव्यांच्या लपाछपीमुळं कदाचित अधे-मध्ये अदृश्य होतीये की काय, असं वाटेल. मोहिनीच्या चेहऱ्यावर भाव तसे भेदरल्यासारखे होते; पण डोळे कोणालाही भुरळ घालतील असेच होते. म्हणून तर तिचं नाव होतं, मोहिनी! मान खाली घालून ती झपाझप चालत होती. एवढी भराभर चालत होती, तरीही तिच्या चालण्याचा आवाज काही येत नव्हता. तिच्या मागून पुढं जाणारी टाळकी हळूच तिची छेड काढत होती. पण ही मात्र न थांबता चालतच होती. ती अशीच एका थांबलेल्या रिक्षाला क्रॉस करून रस्त्यापलीकडं गेली. पण तिकडून रस्त्यापलीकडं गेल्यावर तिचा चालण्याचा स्पीड थोडा कमी झाला.
बास्स! त्या थांबलेल्या रिक्षातल्या माणसाला बहुतेक हेच हवं होतं. त्यानं पटकन एक पिचकारी मारली आणि जॅकेटची टोपी घालून रिक्षाला स्टार्टर मारला. मोहिनीनं तिच्या चालण्याचा वेग तसा कमी केलाच होता. पण हा रिक्षावाला मागून येतोय म्हटल्यावर तिनं तो वेग आणखीन हळू केला आणि मोबाईलमध्ये बघण्याचं नाटक करायला लागली. तेवढ्यात आलाच रिक्षावाला. आधी त्यानं रिक्षाचा वेग तिच्या वेगाशी मॅच केला आणि मग आवाज टाकला,
"ओऽऽऽ मॅडऽऽम!"
हा आवाज आल्या आल्या मोहिनी स्वतःला सोडून दुसऱ्या कोणालाच कळणार नाही अशी गालातल्या गालात हसली. आता ती जागेवर थांबली आणि चेहऱ्यावरचे हसरे भाव बदलून जरा चिडका चेहरा करून त्या रिक्षावाल्याला म्हणाली,
"काय?"
"अहो, मी म्हणत होतो, कुठं सोडू का?"
"नको. काही गरज नाही."
"एवढी रात्र झाली आहे. या रस्त्यावरून एकट्याच चाललाय तुम्ही. एरिया फार चांगला नाही हा. म्हणून म्हणालो कुठं सोडू का?"
"तुम्हाला ठिकाण सांगितलं, तर तुम्ही काहीही न बोलताच निघून जाल."
"नाही जाणार. मॅडम, सकाळपासून उपाशी आहे. लोकांच्या मागं लागतोय. पण कोणीच भाडं देईना. आता काय सगळ्यांकडं गाड्या आल्या आहेत. काहींकडं स्वतःच्या आहेत, तर तुमच्यासारख्या काही जणींना गाड्या घ्यायला येतात. तुम्ही मला जागा सांगूच नका. गाडीत बसा आणि फक्त रस्ता सांगा. मग तर झालं?"
त्या माणसाचं तोंड बघून मोहिनी आधी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. कारण तो उपाशी आहे असं सांगत होता; पण त्याच्या दाढीवर मगाशी मारलेल्या पिचकारीतून उडालेली थोडी लाल थुंकी आणि भाताची शितं दिसत होती. तरीही त्याच्यावर दया दाखवावी, उपकार करावेत म्हणून तिनं ठिकाण सांगितलं आणि तो 'चला' म्हटल्यावर गाडीत बसली.
मॅप लावून रिक्षावाला तिनं सांगितलेल्या जागेकडे निघाला. वाटेत सुरुवातीला तो सतत बडबड करत होता. पण मोहिनी त्याच्याशी काही बोलतच नव्हती. गरजेपुरतं 'हो, नाही, बरं बरं' एवढंच बोलत होती. एके ठिकाणी ट्रॅफिकमध्ये रिक्षा अडकली. १० मिनिटं झाली, २० मिनिटं झाली......
'काय झालं असेल? कोणीतरी ॲक्सिडेंट केलेला दिसतोय. नाहीतर एखादा ट्रक वगैरे बंद पडला असेल. यांचं हे नेहमीचंच आहे रात्रीचं. पिऊन गाड्या चालवतात साले आणि गाड्या चेक करून घेत नाहीत निघायच्या आधी' वगैरे वगैरे अशी रिक्षावाल्याची टकळी अखंड सुरू होती. तो सारखा बडबड करून मोहिनीला त्याच्याशी बोलण्यास भाग पाडायचा प्रयत्न करत होता. पण ती काही त्याला दाद द्यायला तयार नव्हतीच.
शेवटी रिक्षावाला कंटाळला आणि उतरून चालत चालत पुढं जाऊन काय झालं ते बघायला गेला. पण दुसऱ्याच मिनिटाला परत येऊन मोहिनीला म्हणाला,
"मॅडम, काय दिसेना काय झालंय ते. फार गर्दी आहे. लाईन खूप मोठी लागली आहे."
मोहिनीचं एक नाही आणि दोन नाही. ती नुसतीच त्याच्या चेहऱ्याकडं बघत बसली. तिचा असा चेहरा बघून रिक्षावाला म्हणाला,
"आपण एक काम करूया. इथून डावीकडून एका शॉर्ट कटनं जाऊ. तो रस्ता स्मशानातून जातो, म्हणून तिथून कोणी जात नाही. पण आपण गेलो, तर आपला वेळ वाचेल खूप. जायचं का?"
"नको."
आत्तापर्यंत मोहिनी पहिल्यांदाच बोलली होती, तोही केवळ एक शब्द. पण 'नको' हे तिनं एवढ्या ठामपणे सांगितलं, की रिक्षावाल्यानं कारणही विचारलं नाही तिला. त्याला वाटलं की बाई घाबरली असेल. आपण स्मशानाचा उल्लेख उगाच केला. ते सांगितलं नसतं, तर आत्तापर्यंत हे ट्रॅफिक ओलांडून गेलो असतो कधीच.
असा विचार करत करत तो मधून मधून रिक्षा घुसवायचा प्रयत्न करत होताच. शेवटी त्याला जागा मिळाली आणि त्यांची रिक्षा ट्रॅफिकमधून सुटली. 'नेमकं ट्रॅफिक का झालं होतं? गाडी बंद पडली नव्हती, ॲक्सिडेंट नव्हता. मग काय झालं होतं ?' असे प्रश्न रिक्षावाल्याच्या मनात होतेच. पण तेवढ्यात 'थांबा इथेच' असा मोहिनीच आवाज आला आणि रिक्षावाला थांबला.
"अहो मॅडम, पण तुमचं लोकेशन अजून १ किलोमीटर दाखवतंय इथून. सोडतो की तुम्हाला."
"मी इथंच उतरणार आहे. तू मला सोडशील, पण मग तुला कोण सोडवणार? जा आता." असं म्हणता म्हणता मोहिनी रिक्षातून उतरलीसुद्धा.
तिच्याकडं रिक्षावाल्यानं बघितलं. त्याला तिचं बोलणं काही तरी विचित्र वाटलं. त्याला काही समजलं नाही. तसंही ती रिक्षात बसल्यापासून त्याला तिचं वागणं कळलेलं नव्हतं आणि बरंचसं खटकलंही होतं. त्यामुळं तो वैतागून म्हणाला,
"ठीके, जावा. २०० रुपये झाले आहेत. तेवढे द्या आणि मग तुम्ही मोकळ्या आणि मीही."
"मी मोकळी होणार नाहीच. पण तूही अडकू नयेस म्हणूनच तुला इथून जायला सांगितलं."
तिला असं बोलताना आणि मधूनच गूढ, चमत्कारिक आणि किंचित निराश हसताना बघून रिक्षावाला गोंधळात पडला होता. आता त्याला भीती वाटायला लागली होती. एवढा वेळ गप्प बसलेली बाई बोलायला लागली. पण ते काहीतरी विचित्रच बरळल्यासारखं बडबडणं वाटत होतं त्याला. त्याच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले आणि भित्रे भाव बघताच मोहिनीनं पर्समधून ५००ची नोट काढली. पण ती तिच्या पायाशी खाली पडली. ती खरंतर नोट उचलणार होती. पण उचलली नाही.
तिनं विचार केला की या गोंधळलेल्या माणसानं जर ती नोट उचलली तर त्याचा गोंधळ संपेल. हा विचार मनात येताच ती हसली. आधी गालातल्या गालात आणि मग थोडं मोठ्यानं हसत राहिली. तिच्याकडं बघत बघत रिक्षावाला न उचलायला मोहिनीच्या पायाशी वाकला. त्याला तिथं नोट तर दिसली; पण मोहिनीचे पाय दिसलेच नाहीत. तो अतिशय घाबरला. पण तशाच अवस्थेत त्यानं ती नोट उचलली आणि झर्र्कन वर आला, तर तिथं मोहिनी नव्हतीच. फक्त तिचं मोठमोठ्यानं हसणं तेवढं ऐकू येत होतं.
(२९ मार्च २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा