तप्त उन्हातली थंडगार झुळूक





मे महिन्याची संध्याकाळ होती. सरकारी दौऱ्याचं कारण देऊन माझ्या ‘खौट’ बॉसनं हिंगोलीला पाठवलं होतं. तसं बघायला गेलं, तर सरकारी दौरा म्हटल्यावर सर्व सोयीसुविधा असतात. उन्हाळा जाणवणार नाही अशा एसी रुम्स, दिमतीला एक ड्रायव्हर आणि जेवणाची उत्तम सोय. पण एकट्यानं नव्या प्रदेशात, तेही हिंगोलीसारख्या... माझ्या अगदी जिवावर आलं होतं. काय करावं म्हणून शनिवारची सुट्टी बघून नांदेडला जाऊन यायचं ठरवलं. सुट्टीच्या दिवशी ड्रायव्हरला त्रास नको म्हणून लाल परीनं निघालो. गुरुद्वारा वगैरे पाहून संध्याकाळी सातच्या सुमारास हिंगोलीला पोहोचलो. मला जायचं होतं औंढ्याला; कारण माझी राहायची सोय तिथल्याच विश्रामगृहात केली होती. मी अगदी ‘पुणे-मुंबई’सारखी कनेक्टिव्हिटी असल्याच्या आविर्भावात चौकशी कक्षात जाऊन औंढ्याला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली. समोरून कपाळावर आठी आणून उत्तर आलं, ‘आता गाडी नाही. टमटम पकडा.’

तसं हिंगोलीपासून औंढा फक्त २०-३० किलोमीटरवर आहे; पण दररोज दिमतीला ड्रायव्हर असल्यानं हे अंतर कधी जाणवलंच नाही. आता मात्र पंचाईत झाली होती. वातावरण ढगाळ व्हायला लागलं होतं आणि भूकपण फार लागली होती. उकाड्याबद्दल तर बोलायलाच नको. साधारण ४०-४२ टेम्परेचर असेल. रस्त्यावर घामानं चिंब भिजून मी उभा होतो. टमटमवाल्यांना माझ्या तोंडाकडे बघून बहुधा मी इथला नाही हे कळत होतं; पण कोणीच मला एकट्याला एवढ्या लांब घेऊन जायला तयार नव्हते.  तसं माझ्याकडं काही फार सामान नव्हतं; पण २०-३० किलोमीटर चालणं हा काही जोक नव्हता. गेले काही दिवस चांगली सोय झाली होती. मागेल ती गोष्ट हातात आणून द्यायला माणूस होता. त्यामुळं नाही म्हणालं तरी थोडा माज वाढला होता. असो...

लांबून एक टमटम येताना दिसली. जरा बरं वाटतंय, तोवर ड्रायव्हरच्या दोन्ही बाजूंनी पाय बाहेर आलेले दिसले. म्हटलं संपलं. पुन्हा दुसऱ्या टमटमची वाट बघा. तेवढ्यात तो माझ्या थोडं पुढं जाऊन थांबला. मान कशीबशी बाहेर काढून त्यानं मला ‘ओ साहेब’ अशी हाक मारली. मी लगबगीनं त्याच्यापाशी गेलो.

‘कुणीकडं...?’

‘औंढा, शासकीय विश्रामगृह.’

‘बसा.’

‘कुठं?’

‘तुमाला चालणार असंल, तर गडी मागं लटकंल अन् तुमी हितं बसा. बोला.’

एक नजर आत टाकली. टमटममध्ये मुंगीदेखील शिरायला जागा नव्हती. पुढं ड्रायव्हरच्या दोन्ही बाजूला २-२, मध्ये ५, मागं ४ आणि लटकलेला एक. दीर्घ श्वास घेतला आणि म्हणलं, ‘चला.’

मी असं म्हटल्यावर त्यानं त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला मागं लटकायला लावलं. (जिथं अॅलरेडी एक माणूस हवा खात होता.) मी त्याच्या जागी बसलो. बसल्यावर एक परिचित सुगंध नाकाशी दरवळला. पुण्या-मुंबईत काम केल्यामुळं हा सुगंध कसला हे मला कळायला वेळ लागला नाही. चोरट्या नजरेनं मागं वळून बघायची पंचाईत. जागा एवढीशी. मागं बघतोय म्हटल्यावर मागच्या व्यक्तींचं लक्ष माझ्याकडं सहज जाणार आणि माझी चोरटी नजर पकडली जाणार. बस, रेल्वेसारख्या ठिकाणी ही अडचण येत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही.

मी मनात मांडे खाईपर्यंत मागचे चौघे उतरले आणि लटकणारी दोन माणसंदेखील उतरली.

‘मागं बसायचं असंल, तर बसा. पैस अंगानं बसता येतंय.’

हे ऐकताच मी आणि एक मध्यमवयीन माणूस मागच्या डिक्कीत बसायला गेलो. जाताना मधल्या सीटवर नजर मारायचा प्रयत्न केला; पण दोन सेकंदांत काय दिसणार हो? भिन्नलिंगी व्यक्ती होत्या, याची खात्री मला बसल्या बसल्या झाली होती. पण त्या व्यक्ती तरुण होत्या आणि दिसायला बऱ्या होत्या हे मला पुरेशा उजेडाअभावीसुद्धा दिसलं. नजर झालीच आहे तयार त्याला कोण काय करणार?

तर... मी मागं जाऊन बसलो आणि समोर बसलेल्या माणसाकडं बघून स्मितहास्य केलं सवयीप्रमाणं. तोही हसला आणि मग गप्पा सुरू झाल्या. बोलण्यावरून कळलं की गृहस्थ मुंबईत डॉक्टर आहेत आणि सहकुटुंब माहूरला देवीचं दर्शन घेऊन मूळ गावी, म्हणजे औंढ्यात काही दिवस राहायला आले आहेत.

‘काय करता तुम्ही?,’ डॉक्टरांनी विचारलं.

‘मी राज्य सरकारच्या एका विभागात काम करतो.’

‘अरे व्वा! काय म्हणून?’

‘काही नाही मागास जिल्ह्यांचा विकास कसा करता येईल याची चाचपणी करायला आलोय. मंत्रालयात असतो; पण कामानिमित्त सध्या फिरतीवर आहे.’ उगाचच नसता अभिमान आणून मी म्हणालो.

डॉक्टर म्हणाले, ‘मस्त काम आहे की तुमचं. आमच्या तालुक्याकडं जरा लक्ष द्या.’

‘हो...’ असं म्हणून मी जरा अवघडल्यासारखं हसलो. इथपर्यंत मला नीट बोलता येतं; पण पुढं काय बोलायचं ते समोरच्याला आणि मला कळत नसल्यानं नेहमी घोळ होतो. पण आता बहुतेक अशी वेळ येणार नव्हती.

‘मी पण मुंबईतच असतो, क्लिनिक आहे माझं. आई मागे लागली होती म्हणून बऱ्याच दिवसानंतर संपूर्ण कुटुंबासोबत गावी आलोय.’ असं त्या माणसानं मध्ये बसलेल्या आजीकडे बोट दाखवून सांगितलं.  आता आजी मला पटकन दिसल्या. पण मुलींकडं कसं बघणार ना त्यांच्याच बापाच्या समोर... मला फक्त झुमक्यांचे चार सेट, व्यवस्थित विंचरलेले केस; पण अवखळ मुलींसारख्या त्या केसांतून सुटून वाऱ्यावर स्वार झालेल्या बटा दिसल्या. सुगंध तर मघापासून येत होताच. तो आता जरा तीव्र झाला होता एवढंच काय ते.

आमच्या गप्पा त्या आजी पण ऐकत होत्या. त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि छान हसल्या. मग मी म्हणालो,

‘आमचं पण कुलदैवत माहूरची रेणुकामाता आहे. लहानपणी मुंज झाल्यावर आलो होतो आणि जाता जाता ओंढ्या नागनाथाचं पण दर्शन घेतलं होतं.’

आजी एकदम चमकल्या आणि डॉक्टरांकडे बघून म्हणाल्या, ‘अरे वा! आपल्यातलाच आहे की. छान! काय वय तुमचं?’

‘२६.’ गावाकडं जरा थेट आणि मोकळेपणानं बोलायची पद्धत आहे, याची मला कल्पना आहे; पण या आजी पार पुढच्या निघाल्या. कशा ते सांगतो. पुढचाही प्रश्न थेट.

‘लग्नाचं काय? कोणी शोधली, की कसं?’

‘नाही अजून.’ अगदी लाजून उत्तर दिलं.

‘आणि किती वाट बघणाराय? तुमच्याएवढी असताना मला ह्यो झालता.’ असं म्हणून त्या आजीनं माझ्यासमोर बसलेल्या तिच्या पोरासमोर हात नाचवला आणि आजी पुढं म्हणाली, ‘याला पण फार थांबवला नाही आमी. उरकलं शिक्षण सपल्यावर. हा २३चा असताना याला बायको होती.’

त्या दोन्ही पोरी या गप्पा रोजच्या असल्यासारख्या शांत होत्या. डॉक्टर मात्र स्मितहास्य करून शांत बसले. माझी चुळबुळ सुरू झाली होती.

आजीनं पुन्हा बाँब टाकला.

‘या बघा माझ्या दोन नाती. एक २२ आणि दुसरी २४.’

अरे काय चाललं होतं हे... मगाशी घाम आला होता; आता फुटला होता.

मी गप्प बसलो होतो. काही बोलत नव्हतो. आजींचं तोंड सुरूच होतं आणि पोरी गालात हसत होत्या. त्यांचा बाप उगाच बाहेरची माणसं आणि गाड्या बघत होता. आता हलका पाऊस यायला लागला होता. जरा गार वाराही सुटला होता; पण माझा घाम काही थांबेना.

आजींच्या सांगण्यानुसार मी एक-दोन वेळा त्या मुलींकडं पाहण्याचा प्रयत्न केला; पण धीरच होईना. शेवटी एकदाचं विश्रामगृह आणि जोराचा पाऊस एकदमच आला. टमटमवाल्यानं आमचं बोलणं ऐकलं होतं. सरकारी विभागात काम करतो म्हटल्यावर त्यानं मला थेट आत सोडलं आणि पैसेही घेतले नाहीत. मी उतरताना आजींनी स्मितहास्य केलं. मी पण हसून आत गेलो. नको तिथं सभ्यपणा दाखवत मागंदेखील पाहिलं नाही. पण त्यामुळं ते चेहरे बघायचे राहून गेले, ही हुरहुर मात्र कायम मनात राहणार...

तळटीप - माझ्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेला खरा प्रसंग...



(३ जुलै २०२४ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर