चांगलं काय आणि वाईट काय?


जावेद अख्तरांनी एका मुलाखतीत सांगितल्याचं चांगलं आठवतंय. ‘ओम शांती ओम’ या पिक्चरमधलं ‘दिल में मेरे है दर्द-ए-डिस्को’ हे गाणं का आणि कसं लिहिलं याविषयी ते बोलत होते. ते गाणं असंबद्ध लिहिण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागली होती. गाण्यातल्या ओळींमध्ये कशाचाच कशाला अर्थ लागू नये, यासाठी त्यांना फार विचार करून ते गाणं लिहावं लागलं होतं, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. सगळी मुलाखत ऐकायची असेल, तर ती आहे यूट्यूबवर.

सध्या ‘असंबद्ध लिहिणे’ या गोष्टीसाठी वेगळे कष्ट करावे लागत नाहीत अशीच परिस्थिती आहे. कोणीही उठतं आणि काहीही लिहितं. पण याचा त्रास होत नाही; करून घेतला नाही तर. हे असलं काहीही लिहिलेलं लोक डोक्यावर घेतात ना उगाच, त्यांचा राग येतो; त्याचा त्रासही होतो. फेसबुकवर लिखित गोष्टी जास्त आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओचं प्रमाण जास्त आहे. काहीही समजत नाही हे लोक जे काही लिहितात किंवा व्हिडिओ करतात त्यातून. पण लोक त्यांना डोक्यावर घेतात; कारण त्यांना चांगलं म्हणजे काय, हेच माहीत नसतं असं आता लक्षात यायला लागलंय.

ओळखीच्या माणसानं केलंय म्हणून हे लोक दाद आणि महत्त्व (अवास्तव) देतात हे जरी मान्य केलं, तरी त्याला प्रमाण म्हणून काही आहे की नाही? काहीही डोक्यावर कसं घ्यायचं? बुद्धी कुठं गहाण ठेवली आहे का आपण? या अशा प्रकारच्या कंटेंटला ‘क्रिंज’ असं नाव आहे. मनोरंजन म्हणून अशा गोष्टी लोक वाचतात, बघतात. पण त्यामुळं या लोकांचं फावतं आणि ते अशा प्रकारच्या आणखी गोष्टी तयार करतात. त्यांचं बघून आणखीही बरेच लोक यांच्या रांगेत उभं राहतात. एखादी ताजी घटना, करंट टॉपिक, ट्रेंडिंग विषय किंवा गाणं अशी बरीच उदाहरणं देता येतील.

आता चांगलं बघावं किंवा वाचावं असं मी म्हणतोय; पण चांगलं तरी नेमकं कशाला म्हणावं असाही प्रश्न समोर आहेच. कंटेंटचा निव्वळ पसारा दिसतोय समोर. रोज त्यात भरपूर भर तर पडत आहेच. वेगवेगळ्या लोकांचं लिखाण वाचलं, वेगवेगळ्या कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ बघितले, तर आपण आपलंच ठरवू शकतो चांगलं काय आणि वाईट काय ते... सरसकटीकरण करणं बंद केलं पाहिजे. मला नाटक बघायला आवडतं म्हणून त्याचंच उदाहरण देतो. सध्या कोणत्याही नाटकाला ‘स्टँडिंग ओवेशन’ देण्याचा प्रकार रूढ झाला आहे. पूर्वी फक्त खूपच आवडलेल्या नाटकाच्या बाबतीत असं व्हायचं. पण आता प्रत्येक नाटकाला असं होत असेल, तर मग एखादं खरोखरीच चांगलं नाटक असेल, त्याला काय करणार?

सध्या ‘असण्यापेक्षा दिसणं’ जास्त महत्त्वाचं झालंय, हे कितीही खरं असलं, तरी यावर उपाय म्हणून लोकांनी ‘व्यक्त’ होणं जरा आटोक्यात आणलं पाहिजे असं मला वाटतं.

लिखाणाला असंबद्ध फोटो...





(२५ मे २०२४ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर