रिकामा वेळ


तर.... माझ्याकडे सध्या भरपूर रिकामा वेळ आहे, म्हणून मी हे लिहितोय. तुमच्याकडेही तसाच रिकामा वेळ असेल, तर वाचा. नाही तर सोडून द्या.

लिहायचं तर बऱ्याच दिवसांपासून होतं. खूप सहन केलं आधी; पण आता सहन होत नाही असं म्हणणार नाही, तर वेळ आहे म्हणून लिहितोय असं म्हणीन. कोणाकडे असतो हा रिकामा वेळ? बऱ्याच जणांकडे असतो. ज्यांच्याकडे नसेल, त्यांना तो काढताही येतो. पण सगळेच काही मी लिहितोय तसं लिहीत बसत नाहीत ना! तसं जर त्यांनी केलं असतं, तर गहजब उडाला असता. पण ते मेंदूचा वापर करत असतील थोडासा म्हणून लिहीत नसावेत. पण त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? फेसबुक फुकट आहे. लिहायलाही आणि वाचायलाही. त्याला जर आधीच्या फोन व्यवस्थेप्रमाणं पैसे मोजायला लागले असते ना, तर तथाकथित व्यथित होणारे लोक इकडं फिरकलेही नसते. फुटक ते पौष्टिक; शिवाय इथं फेसबुकवर जो लिहितो, तिथं त्याचे त्याचे चाहते (दत्तू) ठरलेले असतातच की. त्यामुळं घे फेसबुक, की लिही पोस्ट.

मुद्दा भरकटतोय असं तुम्हा वाचणाऱ्यांना वाटायला नको, म्हणून पुन्हा मुद्द्याकडं येतो. नाही तर मला वेळ आहेच रिकामा बाकीची बडबड करायला. हा रिकामा वेळ मुख्यत: नवनिवृत्त किंवा म्हाताऱ्या लोकांकडं असतो, हे मला अनुभवावरून माहीत आहे. माझ्या नात्यात असे लोक आहेत, काही ओळखीचे आहेत. पण ते फेसबुकवर लिहीत नाहीत जास्त. कारण त्यांना व्यवधान आहे दुसरं. मुख्य म्हणजे, आपण किती मोठे आहोत हे त्यांना कोणालाही दाखवायचं नाही. त्यामुळं त्यांचे स्वत:चे असे ‘व्हर्चुअल दत्तू’ही तयार झालेले नाहीत. प्रत्यक्ष भेटल्यावर हो-हो करणारे हुजरे असतीलच; पण त्यांच्याबद्दल मला काही माहीत नाही. अरे हो! माहीत नाही त्या गोष्टींबद्दल आपण बोलू नये, हा अलिखित सामाजिक नियम मला ठाऊक आहे बरं! त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल मला खोलात जाऊन जराही माहीत नसतं, त्याबद्दल मी बोलत नाही. खासगीतही नाही, तर इथं कसं काय बोलणार? आणि जरी बोललो, तरी मग एखाद्या गोष्टीविषयी बोललो, तर मला तसल्याच दुसऱ्या गोष्टीविषयी बोलणं गरजेचं आहे. नाही तर माझ्यावर पक्षपातीपणाचा शिक्का बसेल, जो मला नको आहे.

हे मुद्द्याला धरूनच आहे बरं का! नाही तर आरोप कराल, की पाल्हाळ लावलं म्हणून. मुळात तुमचीही काही चूक नाहीच म्हणा. आरोप करायला काय पैसे पडतात की काय? मी मघाशी म्हणालो तसंच आहे ते. घे फेसबुक, की लिही पोस्ट किंवा कर कमेंट. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी असं मला वाटतं. एखाद्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल, तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करावा आणि मग त्याविषयी ‘व्यक्त’ व्हावं. हे व्यक्त होणं खूप महत्त्वाचं असतं कधी कधी. माझ्यासारखे काही जण सकाळी एकदा किंवा दिवसातून काही वेळा ६ बाय ६च्या खोलीत ‘व्यक्त’ होऊन येतात. पण ज्यांना ते जमत नाही, ते उठल्यापासून झोपेपर्यंत सोशल मीडियावर ‘व्यक्त’ होत राहतात. मला बाबा निसर्गानं जो अवयव ज्या कामाला दिलाय, ना त्याचा त्याच कामासाठी उपयोग करायला आवडतं. नाही तर मग दुसरा अवयव त्या कामासाठी वापरावा लागतो काहींना.

ते असो! एक उदाहरण देतो, म्हणजे पोस्ट पटकन वाचून समजेल तुम्हाला. परत सांगतो, हे सगळं तुमच्यासाठी सुरू आहे. म्हणजे तुम्हाला सगळं सांगण्यासाठीच माझ्यासारख्या रिकाम्या लोकांची इथं नेमणूक झाली आहे. तुम्हाला सगळं कळावं म्हणून तर सर्वज्ञानी मी इथं आहे ना!

तर आता उदाहरण.... सगळ्या लोकांनी पुण्यातला एफसी रोड तर बघितला असेलच. त्यामुळं तिथलंच उदाहरण देतो. वाडेश्वर हॉटेलच्या समोर जो बसस्टॉप आहे ना, त्याच्या मागे खूप मोठा कट्टा आहे. तो वेस्टसाइड नावाच्या कपड्याच्या दुकानापासून सुरू होतो आणि बसस्टॉपपाशी संपतो. तर तिथून जाताना मी खूपदा मुला-मुलींना चुम्माचाटी करताना बघितलेलं आहे. पण ते तसं का करत असतील, हे मी कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून त्याच्या विषयी कधी ‘व्यक्त’ झालो नाही इथं सोशल मीडियावर. त्यांचीही काही कारणं असतीलच की. त्याशिवाय का ते उगाच असं वागतील? लोक नावं ठेवू शकतील याचा अंदाज असूनसुद्धा...! खासगीत बोललो आहे अनेकांशी या लोकांबद्दल. आणखी एक प्रसंग म्हणजे या रस्त्यावर लहान वस्तू विकणारे अनेक गरीब लोक. यांच्यातले काही जण जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला थांबवून पैसे मागतात. काही म्हातारे जोडपीही असतात अनेकांना थांबवून पैसे मागणारी. पण मी कोणालाच काही देत नाही आणि त्यांच्याविषयी कोही बोलतही नाही.

आता एफसी रोडला काहीही वस्तू न विकता हातात डायरी पेन घेऊन लोकांना थांबवून पैसे मागणारे लोक आहेतच की. पण मी कधी या दोन्ही जमातींबद्दल ‘व्यक्त’ झालेलो नाही. कारण मला ते तसं का करत असतील, याची कल्पना नाही म्हणून. अशा लोकांबद्दलची माझी स्वत:ची अशी मतं तयार झालीच आहेत. पण मी मघाशी सांगितलं तसं, माझं पोट रिकामं करण्यासाठी कुठं जायचं हे मला माहीत आहे.

आणखी एक सुचलंय. आपण हॉटेलांमध्ये वेटर बघितले आहेतच. त्यांना त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करण्याची इच्छा असतेच. पण शेवटी समजा एकाला एका टेबलाच्या ऐवजी तीन टेबलं सांभाळण्याची जबाबदारी दिली, तर गणित बिघडणार नाही तर काय? म्हणजे बघा हंऽऽऽ. वेटर जिथून शिकून बाहेर पडतो, तिथं त्याला एका वेळी एक टेबल आणि एका वेळी एक ताटली न्यायची असं शिकवलेलं असतं. पण तो जेव्हा कामाला हॉटेलात जातो, तिथं एका वेळेला दोन टेबलं करणारे असतात; शिवाय ते वेटर एकाच वेळी दोन ताटल्याही नेऊ शकत असतात. त्यामुळं या वेटरला त्यांच्यासारखंच उत्तम काम करणं भाग आहे. त्याबरोबर शक्य झालं आणि आयुष्यात पुढं जायचं असेल, तर प्रसंगी तीन टेबलंही करणं भाग आहे... बरोबर ना? पण मग त्याला शिकवलेला माणूस समजा त्या हॉटेलात आला आणि त्याला म्हणाला की 'अरे, हे चुकीचं आहे. एका वेळेला एक ताटली.' तर त्याला वेटर काय म्हणेल? 'माझ्या जागी तुम्ही या. इथं ते सांगतायत ते केलं नाही, तर हाकलून देतील. स्वत:ला सिद्ध करा माझ्या जागी येऊन मग शिकवण द्या.'

चला संपलं लेक्चर. म्हणजे तुमच्यासाठी. माझ्याकडं आहे वेळ. म्हणजे बघा हंऽऽऽ मी इथंच आहे. कारण मला आता व्यवधान नाही कशाचं. आत्ता मी तुम्हाला एफसी रोडचं उदाहरण दिलं, उद्या जेएम रोडचं देईन. परवा काय न. चिं. केळकर रोडचं देईन, मग लॉ कॉलेज रोडचं देईन. त्यानंतर वाटलं, तर घोले रोडचं देईन, नंतर काय सारसबागेजवळचं देईन. मग नारायण पेठेतलं देईन किंवा बुधवार पेठेतलं देईन किंवा बाजीराव रोडवरचं देईन. ढिगानं वेळ आहे माझ्याकडं. कारण मला काय उदाहरणं तर द्यायची आहेत फक्त. घटनांमागचं कारण समजून घ्यायचं बंधन कुठंय माझ्यावर? 

एका तरुणाकडे किती रिकामा वेळ असू शकतो, याचं चित्र काढ बरं, असं मी 'एआय'ला सांगितलं. तर त्यानं हे असं चित्र काढून दिलंय.




(१ मार्च २०२४ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर