कोल्हापूर दौरा
‘जब वी मेट’मध्ये शाहीद कपूरचं ‘आओ मिलों चलें...’ असं एक गाणं आहे. त्या गाण्यात तो आणि करीना प्रवास करताना दाखवले आहेत. तसं काही तरी करायची फार इच्छा होती. माझ्या नशीबानं अगदी त्याच्यासारखा नाही, पण थोडासा सिमिलर योग जुळून आला होता. (पण इथं शाहीदबरोबर करीना नव्हती.)
नुकताच कोल्हापूरला गेलो होतो. २-३ दिवस होतो तिथं. जाताना आणि येताना वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरलो. जाताना रात्री ११.३० वाजता कोंडूसरकरनं (एसी खासगी बस) निघालो. कोल्हापुरात गेल्यावर आत्याकडं असलेल्या मोपेडवरून फिरलो. ज्या गावाला कामासाठी जायचं होतं, तिथं जाताना सर्वांत जुन्या लाल डब्यानं गेलो. काय मजा आली बसमध्ये! सकाळी सव्वासातलाच बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर येणारे सरकारी अधिकारी जिथं थांबले होते, तिथं काकांनी मला सोडलं. सकाळी लवकर निघाल्यामुळं भूक लागली होती. बसमध्ये बसल्याबसल्या कोल्हापूर सोडायच्या आधीच डबा उघडला आणि फोडणीचा भात संपवला. फोडणीच्या भातापेक्षा फोडणीच्या पोळीनं आणखीन मजा आली असती. पण चालत्या गाडीत ती दह्याबरोबर हळूहळू चव घेत खाता आली नसती. त्यापेक्षा भात पटापटा कोंबता आला.
बसला आधी काहीच गर्दी नव्हती. पुढच्या दोन सीटांवर तर टपालाची पोती होती. वाटेत दोन-तीन ठिकाणी स्टॉपवर कंडक्टरनं ती दिली. पण हळूहळू गर्दी व्हायला लागली. म्हातारे-कोतारे होतेच. पण शाळेत जाणारी आणि कॉलेजला-क्लासला जाणारी मुलं-मुली खूप होती. सगळा डबा खचाखच भरला होता. लोकं उभं राहूनही जागा पुरत नव्हती. शेवटी दोन स्टॉपवर कंडक्टरनं ज्यांना उतरायचं होतं, त्यांना उतरू दिलं; पण नवीन लोकांना आत बसू दिलं नाही. असा माझा दोन बस बदलून त्या गावापर्यंत प्रवास सुरू होता. दोन्ही वेळेला जुनेच लाल डबे होते. मी कधी खिडकीतून बाहेर बघत होतो, तर कधी बसमधल्या माणसांकडं बघत होतो. खिडकीतून बाहेर भाताची आणि उसाची शेती दिसत होती. भातशेतीचा सुवास दरवळत होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर शाळेला जायला थांबलेली मुलंमुली दिसत होती. शेतातली बुजगावणी दिसत होती. एवढं सगळं असताना मी बसमध्ये काय चाललंय ते कशाला बघत बसू?
आणि बसमध्ये तसं काही इंटरेस्टिंग घडतही नव्हतं. एकदाही भांडण झालं नाही कोणाचं. आपापसांतही नाही आणि कंडक्टरशीही नाही. जागेवरून नाही की सुट्ट्या पैशांवरूनही नाही. दुर्मीळ असतं हे खरं तर. लोक काय गप्पा मारतात ते मी ऐकत होतो. त्यांच्या गप्पांच्या विषयांत मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी फक्त त्यांची भाषा ऐकत होतो. माझी भाषा. इथं पुण्यात अशी भाषा ऐकायची, तर ‘भावा’, ‘मर्दा’, ‘रांडिच्या’ हे असले काही ठरावीक शब्द आणि बेंबीच्या देठापासून काढलेला खोटा हेल. इथं वाटतं, हे असलं बोललेलंच कोल्हापुरी. आता त्यात इथल्या लोकांनाही दोष नाही देता येणार. असो.
शेवटी गावात पोहोचलो एकदाचा. तिथं गेल्यावर बाईकवरून ट्रिप्सी फिरलो. गाडी चालवायला गावकरी, मधोमध सरकारी अधिकारी आणि शेवटी आमची स्वारी.
आता गावात का गेलो होतो? तिथं काय काय बघितलं? सरकारी अधिकारी कशाला होता? या सगळ्यांची उत्तरं ‘महाराष्ट्र टाइम्स, पुणे २०२३’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर २०२३’च्या दिवाळी अंकात वाचायला मिळतील. त्यामुळं ते आता इथं सांगत बसत नाही.
कुठं होतो आपण? हांऽऽ. ट्रिप्सी फिरलो. त्यानंतर परत यायला निघणार होतोच; पण खूप जोरात पाऊस आल्यामुळं एका आडोशाला थांबलो होतो. संध्याकाळ झाली होती. पण अजून अंधार झाला नव्हता. फक्त आभाळ आलं होतं. आम्ही आपली वाट बघत होतो; पण आमचा लाल डबा काही येत नव्हता. रस्त्यावर एकही गाडी किंवा माणूस दिसत नव्हता. शेवटी एक मोकळी स्कूल बस दिसली. छोट्याशा गावात स्कूल बस कशी काय? हा विचार त्या बसला हात करून आत बसलो, तेव्हा आला. तोपर्यंत जीवात जीव नव्हता. स्कूल बसमध्ये बसल्याचं एक वेगळंच समाधान होतं. आमच्या शाळेला खासगी रिक्षाकाका किंवा व्हॅनदादा. शाळेची अशी स्कूल बस नव्हती. तेव्हा बाकीच्या पोरांना त्यांच्या शाळेच्या स्कूल बसमध्ये बसून जाताना बघायचो आणि हेवा वाटायचा त्यांचा. पिक्चरमध्ये दिसणाऱ्या स्कूल बसमध्ये पोरं काय काय मजा करायची, ते बघूनही भारी वाटायचं खूप. आपल्यालाही असं काही तरी करता यायला हवं होतं, असं वाटायचं.
आम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांना किंवा व्हॅनवाल्या दादाला काही कमी त्रास दिला नव्हता. त्रास जास्त दिल्यावर रट्टेही खाल्ले होते. मजा यायची पण. ‘ओ, चला उतरा,’ असं जेव्हा माझ्याबरोबरचे अधिकारी म्हणाले, तेव्हा मी भानावर आलो आणि उतरलो. तो स्कूल बसवाला आम्हाला घरी सोडणार नव्हता. त्याचं घर येईपर्यंतच्या वाटेवर सोडणार होता.
त्यानं रस्त्यावर उतरवलं आणि आम्ही पुन्हा आमच्या लाल डब्याची वाट बघत बसलो. त्यानं जिथं सोडलं, ते रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वसलेलं गाव होतं बहुतेक. तिथं दुकानं होती, माणसं होती. आम्ही थोडा वेळ थांबलो. बस काही येत नव्हती. आम्हाला थांबलेलं बघून आमच्याही आधीपासून थांबलेला एक ट्रॅक्सवाला आमच्यापाशी आला. ट्रॅक्स म्हणजे थोडे थोडे पैसे घेऊन एखाद्या ठिकाणी नेऊन सोडणारा. थोडक्यात सांगायचं, तर शेअर रिक्षाचं श्रीमंत व्हर्जन किंवा शेअर टॅक्सी. पण या टॅक्सीची कपॅसिटी १०-१२ माणसं कोंबायची असते. आता आम्हाला बस मिळत नव्हती आणि याला भाडं. म्हणून २०-२० रुपये देऊन आम्ही बसलो आणि त्यानं आम्हाला जवळच्या एका बस स्टँडवर सोडलं. हे म्हणजे प्रॉपर गाव होतं. इथं बस स्टॉपवर पुष्कळ शाळकरी, लहान मुलं-मुली, छोटं बाळ कडेवर घेतलेल्या बाया, म्हातारी माणसं, आमच्यासारखी काही सॅक अडकवलेली माणसं असा जथ्था होता.
आम्ही इथंही वाट बघत होतो सगळे लाल डब्याची. तेवढ्या वेळात मी तिथं असलेली बघता येतील तेवढी माणसं बघून घेतली. पुलंनी कोणत्या तरी एका पुस्तकात लिहिलं आहे, त्याप्रमाणं मला माणसांचं निरीक्षण करायला आवडतं. मजेशीर असतात. त्यांच्याकडं बघत बघत मित्राला फोन केला. त्याच्याशी थोडं बोललो, तेवढ्यात बस आली. बसनं मोठ्या स्टँडवर गेलो. इथं बसमधलं फार काही बघत बसलो नाही. तेवढा वेळच मिळाला नाही. स्टँडवर कोल्हापूरची बस लागलेलीच होती. आता ही बस म्हणजे जुनाट लाल डबा नव्हता. नवीन लाल डबा होता. पण याला डबा म्हणता येणार नाही एवढी चांगली ती बस आहे. त्यात बसलो. इथं माझ्या आजूबाजूला सगळी कॉलेजची मुलं बसलेली होती. त्यांची आपली मस्त शिवीगाळ सुरू होती. भस्सकन कॉलेजला गेल्यासारखं वाटलं. आपण बसमध्ये बसलोय, लोक ऐकत असतील वगैरे विचार त्यांनी केलाच नाही. तेच बरं आहे माझ्यामते. माझ्या शेजारी एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत बसली होती. त्यालाही ऐकू येणार नाही, अशा भाषेत ‘गँ गँ गँ’ करत गेंगाणत होती. असू दे. आपल्याला काय करायचं आहे, तसा अनुभव काय आपल्या गाठी नाही असा विचार करत मी गप मोबाईल काढून त्याच्यावर टाइमपास करत बसलो. सकाळी साडेदहापासून मोबाईलला रेंजच नव्हती. आत्ता सहा-साडेसहाला कुठं मिळाली होती.
कोल्हापूर येईपर्यंत मस्त टाईमपास केला. शेवटी बस स्टँडला जायच्या आधीच सिग्नलला उतरलो. स्टँडपासून जरा लांब झालं असतं. सिग्नलला उतरून तिथून अडीच किलोमीटर ‘अकरा नंबर’च्या बसनं आत्याच्या घरी गेलो. पुण्याला परत येतानाचं तिकीट काढलेलं नव्हतं. सकाळी स्टँडवर गेलो, तर तिथं ‘शिवाई’ लागलेली होती. ही नवीन ई-बस आहे. यात अजून बसलो नव्हतो, म्हणून यानं यायचं ठरवलं. थांबत थांबत आली येताना. पण मजा आली. सायकल, रिक्षा, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी या गाड्यांमधून या वेळी फिरायचं राहिलं. मी फक्त ट्रकमध्ये बसलो नाही अजून किंवा कोणत्याही गाडीच्या टपावर बसलो नाही. पुढच्या वेळी कदाचित यातूनही फिरता येईल. बघू, आता कुठं जायचा योग येतोय ते...
(९ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा