मापात वाढलेली भक्कम वार्ता




लहानपणी आपण सगळे कानगोष्टी खेळलो आहोत. गोलात बसायचं आणि एकाने सांगितलेलं लांबलचक वाक्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं. कानात हे सगळं सांगताना सुरुवातीचं वाक्य कधीच तसंच्या तसं सांगितलं जात नाही. पण त्यात फार मजा येते.

आता वयानं मोठे झाल्यावर या कानगोष्टीतून मजा नाहीशी होते आणि त्याची जागा घेते अफवा. फरक एकच आहे. कानगोष्टी खेळताना सगळ्यांनाच त्याची मजा येते; पण अफवा असेल, तर त्याची सुरुवात केलेल्या माणसालाच पुढं होत जाणाऱ्या फजितीची मजा येते.

नमनाला घडाभर खूप झालं. ही सगळी बडबड करण्यामागं कारण आहे. ‘वार्ता वार्ता वाढे’ नावाचं एक नाटक बघितलं नुकतंच. त्यामुळं ही नको ती फिलॉसॉफी झाडायची इच्छा झाली. नाटकाच्या नावातच गंमत आहे आणि नाटकात काय असेल याचा अंदाज नाटकाचं पोस्टर आणि नाव बघितलं तर येऊ शकतो. पण नुसता अंदाज घेऊन उपयोग नाही. ते नाटक प्रत्यक्ष बघायला पाहिजे. एखादी गोष्ट किंवा खबर किंवा बातमी आपण कशी वाचतो, ऐकतो किंवा बघतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. शिवाय आपल्यापर्यंत या गोष्टी कशा पोहोचतात, यावरही बरंच काही अवलंबून असतं.

नाटकात एका संपूर्ण गावाची गोष्ट सांगितली आहे. या गावात नीट रेंज येत नाही, इंटरनेट किंवा वीजही नाही. त्यामुळं बहुतांश काम पोस्टावर अवलंबून आहे. त्यातच एका दिवशी गावकऱ्यांना एक बातमी समजते. या बातमीमुळं प्रत्येक जण अस्वस्थ होतो. पण आलेल्या परिस्थितीला प्रत्येकानं तोंड देणं आवश्यक होऊन बसतं. प्रत्येक जण त्याच्या डोक्यानं काय काय करतो, हे बघण्यासारखं आहे. आणि नावात सांगितल्याप्रमाणं ही बातमी गावभर कशी पसरत जाते, हे तर केवळ बघण्याचं काम आहे.

छोटंसं गाव असल्यानं त्यात एका गावात असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. गावकऱ्यांना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं, ते सगळंच मांडण्याचा खूप छान प्रयोग झाला आहे. मग त्यात महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक, लिंगभेद, जातीभेद, साक्षरता, अंधश्रद्धा अशा सगळ्याच गोष्टी घेतल्या आहेत, ज्या कोणत्याही छोट्या गावाचा भाग असतातच.

येणाऱ्या परिस्थितीला सगळे गावकरी कसे तोंड देतात, विशिष्ट समजुतींपासून त्यांची सुटका कशी होते, त्यांच्या साध्या; पण गुंतागुंतीच्या जीवनावर त्या बातमीमुळं काय फरक पडतो, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील, तर नाटक बघणं मस्ट आहे.

मी मघापासून म्हणतोय गाव, गावकऱ्यांची गोष्ट वगैरे वगैरे. या नाटकात खरंच एक गाव दाखवलं आहे. स्टेजवर ६० कलाकारांचा वावर आहे. देऊळ आहे, पाटलाचं घर आहे, नदी आहे, टाकी आहे, दुकान आहे, टेम्पो आहे, वडाचा पार आहे. तुम्ही ज्याचा विचारही केला नसेल, तेही आहे. ही सगळी मोट बांधली आहे थिएट्रॉन या संस्थेनं. विचार करा, आपल्याला ६-७ लोकांना कुठं फिरायला जायचं असेल, तर सगळ्यांना विचारून, जागा वगैरे ठरवेपर्यंत नाकी नऊ येतात. पण या नाटकातल्या ६० कलाकार आणि तंत्रज्ञांनी मेहनत करून राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा करंडक मिळवला आहे.

नाटकाची निर्मिती थिएट्रॉन एन्टरटेन्मेंट आणि स्नेहा भावे प्रोडक्शन यांनी केली आहे. लेखक ओंकार गोखले आहे आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस आहे. प्रेम मोहिते नाटकाचा सहायक दिग्दर्शक आहे. संगीत, गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर अमोघ इनामदारचं आहे. ध्वनी आरेखन विक्रांत पवारनं केलं आहे आणि ध्वनी संयोजन भक्ती सागरेनं केलं आहे. संगीत संयोजन यश लोणकर आणि ऋतुराज साठ्ये यांनी केलं आहे. लाईट संकेत पारखेचे आहेत, तर लाईट साह्य वेदिका कुलकर्णीने केलं आहे. वेशभूषा देविका काळेने केली आहे. गीतकार संकेत पारखे आणि संजय पिले आहेत. नेपथ्य आदित्य यादव आणि संकेत पारखे यांनी केलं आहे. आशुतोष मुंगळे आणि तन्मय भिडे हे गायक आहेत. नाटकाला अपूर्व पेटकर (हार्मोनियम), कल्याणी मुजुमदार (व्हायोलिन), नीरज पंडित (गिटार) यांनी साथ दिली आहे. व्हॉइस ओव्हर शिवराज वायचळ आणि विराजस कुलकर्णी यांनी केला आहे.

आता नाटकातल्या कलाकारांची नावं

हिमांशू पिले, प्रनोती काकडे, श्राव्या सूर्यवंशी, संघर्ष जोगदंडे, शिवानी नरवडे, गीता प्रभाकर, सौरभ साठे, तेजसी खडके, ओम प्रकाश, शिवम नहातकर, श्रीनिधी झाड, आशिष कदम, आदित्य यादव, वैष्णवी पारखी, निलेश नागराळकर, हर्षदा ताम्हाणे, अपर्णा बहिरट, विवेक खालाने, धनंजय कुलकर्णी, ऋषिकेश जाधव, सौरव सराटे, हैदर शहा, तन्मय भिडे, वैष्णवी देशपांडे, सौरभ नवरे, ऋतुल पांडे, सुमीत पवार, शुभम पांडे, श्रेयस चौधरी, अनुष्का जुन्नरकर, श्रुती कार्लेकर, शायस्ता सावंत, अक्षता दोद्दामनी, ऐश्वर्या पोटे, गौरी शेवडे, योगेश येलवांडे, प्रतीक फरांदे, आनंदिता मुळे, मृणाल कुलकर्णी, चिराग चांडक, साक्षी शेळके, अवनी मत्स्ये, प्रशांत पाटील, रोहन ढेकणे, प्रज्ञा जामदार, देवेंद्र केळकर, मानसी कुलकर्णी, मृण्मयी कुलकर्णी, मृणाल डेंगळे, अवनी ताम्हाणे, समीरा जोशी, स्वराली जोशी, सायली पाटील, आदिश्री देशमुख, श्रुती वनारसे, मानसी दिघे, सूरज देशमुख, विवेक वनारसे, संस्कृती भागल, सिद्धी जोशी, अक्षय सपकाळ, वैष्णवी वैद्य, मयुरेश मराठे, शार्दुल असवाडेकर.

मला नावं लिहितानाच दम लागला. विचार करा यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन अख्खं नाटक कसं उभारलं असेल...! त्यांना खूप मजा आली असेल, याचा मला अंदाज आहे कारण मी नाटक बघितलं आहे. बाकीच्यांनाही स्टेजवर एकाच वेळी ६० लोकं बघायची असतील, तर हे नाटक बघणं मस्ट आहे.


(४ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर