भुताची खरीखुरी जाणीव
हॉरर पिक्चर मी शक्यतो बघत नाही. आवडत नाहीत मला. काही तरी ओंगळवाणं, किळसवाणं दिसणार याची मी मनाशी आधीच खूणगाठ बांधतो आणि असे पिक्चर बघतच नाही.
असं असलं, तरी जाऊ दे, बघू तरी एकदा असं म्हणून या वेळी मी हॉरर जॉनर बघितला. आणि तोही पुण्यात. स्टेजवर. इंग्रजीतून. आत्ता तुम्ही इथं हे फुलस्टॉप वाचताय. पण थिएट्रॉन संस्थेनं जेव्हा १२ वर्षांपूर्वी त्यांचं हे पहिलं इंग्रजी हॉरर नाटक आणलं, तेव्हा त्यांना लोकांनी हेच शब्द प्रश्नचिन्ह घालून विचारले होते. हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. विराजसनं हे स्वत: सांगितलं भरत नाट्य मंदिरात उभं राहून.
काहीही झालं तरी ’ॲनाथिमा’ या नाटकाची स्टोरी मी सांगू शकत नाही. हे एक सस्पेन्स हॉरर नाटक आहे. त्यामुळं मी थोडं जरी बोललो, तर नाटकातली मजाच जाईल. पण एका गोष्टीची गॅरंटी. हे नाटक एकदा बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा बघायची इच्छा होईल. पहिल्यांदा जेव्हा नाटक बघू, तेव्हा स्टोरी बघू. एकदा ती समजली की मग पुढच्या वेळी बघताना तांत्रिक गोष्टी उलगडतील. त्याच्या पुढच्या वेळी बघताना सगळी कॅरेक्टर्स उलगडत जातील. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळी बघू, तेव्हा जर काही चुका झाल्या असतील, तर त्या लक्षात येतील. एवढा मोठा हा प्रवास आहे. आणखी एका गोष्टीची गॅरंटी देतो. या नाटकात वरवरची भुताटकी नाही. भूत असल्याचा कायम होणारा भास आणि भुताचं प्रत्यक्ष होणारं दर्शन.
एका फ्लॅटमध्ये तीन मुलं आणि एक आत्मा राहत असतात एकत्र. सॅम, जय आणि शेखर ही या मुलांची नावं. हा 'आत्मा' फ्लॅटमधल्या कुत्र्यांना घाबरवतो. मग ही मुलं यावर काही तरी उपाय करण्याचा निर्णय घेतात. मग आपला नेहमीचा फिल्मी उपाय. एका तांत्रिकाला बोलावतात. पण याचा लूक आणि अप्रोच खूप भारी आहे. तांत्रिक म्हटल्यावर डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी खोट्या ठरवणारा हा तांत्रिक आहे. पण हा तांत्रिक या मुलांना खरोखरच मदत करू शकतो का, ही मुलं आत्म्याच्या तावडीतून सुटतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाटक बघूनच मिळतील.
नाटकात विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस, जीत अशोक, स्वराली अंबलढगे, ज्ञानदा आणि निमिष जाधव हे ऑनस्टेज कलाकार आहेत. हे सतत दिसतात, त्यामुळं खरं तर ऑनस्टेज म्हणालो. नाटक बघितल्यावर ऑनस्टेज आणि ऑफस्टेज यातला फरक लगेच कळेल. प्रेम मोहिते, अक्षय निंबाळकर, संघर्ष जोगदंडे आणि विवेक वनारसे यांनी बॅकस्टेज केलं आहे. ऋत्विक केळुस्करनं लाइट्स केले आहेत. संगीत विक्रांत पवारचं आहे आणि ते यश लोणकरनं ऑपरेट केलं आहे. बास यापुढं काहीच सांगता येणार नाही. नाटक बघितलेल्यांशी चर्चा मात्र करता येईल.
(६ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा