समाजाने ठरवलेले बिल्डिंगचे मजले
सामाजिक आणि आर्थिक विषमता, श्रीमंत-गरीब दरी, उच्च-नीच, भेदभाव अशा प्रकारचे सगळे शब्द जर गूगलला टाकले ना, तर याविषयी जे लेख किंवा बातम्या येतील, ते वाचून आपलं मानसिक स्वास्थ्य हरवतं. काही वेळेला तर अतिशयोक्ती बघून डिप्रेसिंग वाटतं. पण जे वास्तव आहे, ते तर आपल्या कोणालाच नाकारता येणार नाही. ही विषमता काय, जगात काय चाललंय हे घराबाहेर पडून बघावंच लागेल.
हे सगळं विस्तारानं; पण कमी वेळात समजावून घ्यायचं असेल, तर त्यासाठी एक सोपा उपाय सांगतो. ‘थिएट्रॉन’ संस्थेचं ‘ऊँची है बिल्डिंग’ नावाचं नाटक बघा. दीड तासाच्या दीर्घांकात समाजाचे भाग आपल्याला दिसतात. एवढंच नाही, तर समाजाचे हे भाग जे वागतात, त्यामागचं कारणही सांगण्याचं काम त्या नाटकात उत्तम प्रकारे झालं आहे. हे नाटक बघा म्हणून सांगतोय त्याचं आणखी एक कारण आहे. मगाशी म्हणालो, तसं हा गंभीर विषय यात विनोदी पद्धतीनं मांडला आहे. पण उगाचच कॉमेडी करायची म्हणून केलेली नाही किंवा कोणताही विनोद ओढूनताणून झालेला नाही. प्रत्येक विनोदामागं आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे विचार करायचा की नाही हा पूर्णपणे ऐच्छिक भाग जरी असला, तरी डोळे आणि कान उघडे ठेवून समाजाकडे बघणारी प्रत्येक व्यक्ती विचार करतेच.
तर.... नाटकाची पूर्ण गोष्ट सांगणार नाही. त्यासाठी नाटकच बघा.
एका उंच बिल्डिंगमधला तरुण - साधारणत: तिशीचा असेल - रात्री भूक लागते म्हणून जेवणाचं पार्सल मागवतो. ते पार्सल घेऊन एक डिलिव्हरी बॉय येतो. हाही त्याचा समवयस्क म्हणता येईल. पार्सल तेराव्या मजल्यावर पोहोचवायचं असतं; पण लिफ्ट बंद असते. त्यामुळं मग पार्सल घेऊन हा डिलिव्हरी बॉय वर जातो की नाही? गेला तर कसा गेला? नाही गेला तर का नाही गेला? नाटकात पुढं काय होतं? आणि नाटकाचा शेवट काय होतो? हे सगळं सांगण्याची किंवा वाचण्याची गोष्ट नाही. ती बघण्याचीच गोष्ट आहे.
छोट्या छोट्या गोष्टी मोठ्यातलं मोठं रूप कसं घेऊ शकतात? त्या तशा मोठ्या होण्यामागं कोणी असतं का? असेल तर मग कोण असतं? हे सगळं बघावं आणि त्याहीपेक्षा जास्त अनुभवावं लागेल. कल्पनाशक्ती काय करू शकते आणि त्यानं काय इम्पॅक्ट पडतो हे जर शब्दांत सांगायचं झालं, तर ते खूपच मिळमिळीत वाटेल.
या सगळ्या प्रोसेससाठी सगळ्या टीमनं खूप मेहनत घेतली आहे. सौरभ शामराज आणि ओंकार गोखले या दोघांनी मिळून सुंदर लिहिलं आहे नाटक. ओंकारनं दिग्दर्शनही खूप सुंदर केलं आहे. पुष्कराज चिरपुटकर, ओंकार गोखले आणि क्षितीश दाते यांचा रंगमंचावर जेवढा सहज वावर आहे, तितकाच रुचिता भुजबळ, आदित्य यादव, संघर्ष जोगदंडे, आशिष कदम, सुमित पवार, चैतन्य सरदेसाई, शिवम नहाटकर, श्रेयस, आदित्य, सिद्धांत, लक्ष्य, ओंकार यांचाही आहे. नेपथ्य शिवराज वायचळ, मुग्धा भालेराव यांनी केलं आहे. नेपथ्य साह्य शिवानी नरवडेनं केलं आहे. वेशभूषा मुग्धा भालेरावची आहे. प्रकाशयोजना संकेत पारखेने केली आहे. प्रकाशयोजना साह्य वेदिका कुलकर्णीने केलं आहे. संगीत तन्मय भिडेनं दिलं आहे. संगीत आणि ध्वनी संयोजन यश लोणकरनं केलं आहे.
(३ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा