फिरोदिया
या शब्दाशी माझा पहिला संबंध आला मी सातवीत असताना. आईला तिच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेचं तिकीट दिलं होतं. मला नाटकांत कामं करायला आवडायची, म्हणून तिनं मला ते दिलं आणि मी त्या दिवशीचे प्रयोग बघितले.
त्यानंतर या शब्दाशी संबंध आला तो अकरावीत असताना. पूर्व प्राथमिक फेरीत आम्ही या स्पर्धेत सादरीकरण केलं आणि प्राथमिक फेरीत ढकलले गेलो. तिथं आम्ही सादरीकरण केलं नाही ती गोष्ट वेगळी. त्याला अनेक कारणं आहेत.
आता हे लिहिण्याचं कारण म्हणजे फिरोदिया शब्दाशी अगदी काल आलेला संबंध. अंतिम फेरीचं सकाळचं सत्र मी बघितलं. त्या तीन नाटकांपैकी दोन पहिल्या तीनात आली. ती दोन्ही मला टेक्निकल बाजूंनी खूप स्ट्राँग वाटलेली.
पहिलं झालं ते 'यात्रिक' नावाचं नाटक. कथा वेगळी होती आणि छान रंगवली होती. मला सुरुवात जरा संथ वाटली; पण त्यांनी नंतर जो वेग पकडला त्याला काही तोड नाही. सेट फार उत्तम होता. प्रॉपर्टी वापरण्याची आयडिया भन्नाट होती. त्यातले लाईट, डान्स, गाणी आणि बाकीचे फाईन आर्ट छान झाले. सगळ्याची भेळ खूप छान झाली होती.
दुसरं होतं ते 'जोर लगा के हैश्शा' नावाचं. यांची भेळ चांगली झाली होती एकंदरीत. पण मला त्यात चुरमुरे जरा चामट होते असं वाटलं. बाकी सेट अतिशय भरगच्च होता. लाईटचा आणि पार्श्वसंगीताचा ताळमेळ छान झाला होता. पण तरीही काही तरी मिसिंग वाटलं शेवटपर्यंत. मुख्य म्हणजे हे नाटक संपूर्ण हिंदीतून होतं.
या सत्रातलं शेवटचं नाटक म्हणजे 'रहनुमा'. यांची कथा मला फार सामान्य वाटली. म्हणजे पुढं काय होणार हे मला माहीतच होतं असं म्हटलं, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण त्यांनी ती प्रेडिक्टेबल गोष्टही एवढी भारी सांगितली, की उत्सुकता ताणली गेली होती त्यांचं सादरीकरण बघण्यासाठी. यांचा सेट, लाईट, गाणी, पार्श्वसंगीत, फाईन आर्ट हे सगळं नेक्स्ट लेव्हल होतं. त्यांनी जे काही शॅडो आर्ट केलं, त्यानं म्हणजे चार चाँद लावले. त्यामुळं कथेतून नाही; पण बाकीच्या गोष्टींमधून फार मजा आली. नाटकांमध्ये कोणीही फोन वापरणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली होती, हे मला फार आवडलं. पण त्यामुळं नाटकातले फोटो नाही मिळाले.
(२६ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा