कोऱ्या मनावरच्या काळ्या नोंदी
पूर्वी घडलेल्या कोणत्या तरी गोष्टीचं बॅगेज काही लोक आयुष्यभर बाळगतात. हे लोक स्वत:चाच तिरस्कार करायला सुरुवात करतात. आपल्या आजूबाजूला आपण किती तरी असे लोक बघतो. काही वेळा आपण स्वत:च ‘ते’ लोक होऊन जातो; पण नकळतच. मी सांगतोय त्याची उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतो.
नोकरीत काही सहकारी किंवा वरिष्ठ आपली काहीच चूक नसतानाही आपल्याला त्रास देतात. त्याचं काय कारण असेल, याचा विचार आपण करत बसतो. त्यांच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली, त्यांचा विश्वास संपादन केला, तर आपल्याला लक्षात येतं, की ते आपल्या जागी असताना त्यांच्याशी त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ असेच वागलेले असतात. त्यामुळे नकळतच तेही आपल्याशी तसंच वागायला बघतात.
अनेक शिक्षक आपल्याला लहानसहान गोष्टींवरून ओरडत असतात किंवा ओरडलेले असतात. त्याचं कारण काय? एक तर आपण आयुष्यात खूप पुढं जावं अशी त्यांची अपेक्षा असते किंवा त्यांना त्यांच्या लहानपणी त्यांचे शिक्षक असेच ओरडलेले असतात. त्यामुळं हे शिक्षकही आपल्याशी थोडे रूड वागू शकतात.
याउलट दुसरी जमात म्हणजे, सगळ्यांबरोबर मिसळायचा प्रयत्न करणारी. यांना कोणीही आपल्यात मिसळून घेत नसतं. त्यामुळं हे लोक, विशेषत: तरुण मुलं काय वाट्टेल ते करायला तयार होतात. आपल्याला मित्र-मैत्रिणी मिळाव्यात म्हणून हे लोक त्यांना कोणत्या गोष्टी आवडतील, ते शोधतात आणि त्या करायला एका पायावर तयार होतात.
समाजात या दोन प्रवृत्ती आपल्या जवळपासच असतात. आपण फक्त डोळे उघडे ठेवून त्यांच्याकडं बघायला हवं. त्यानुसार आपण स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. आयुष्यात घडलेल्या काही जुन्या गोष्टी सोडून दिल्या, तर हे सहज शक्य आहे.
हे सगळं अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे एका नाटकात. ‘न केलेल्या नोंदी’ असं त्याचं नाव आहे. विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते, ज्यामुळं त्या माणसाचं आयुष्य ढवळून निघतं. त्यात सध्या घडणाऱ्या गोष्टी तर दाखवल्या आहेतच; पण त्याबरोबर त्या माणसाच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या गोष्टीही दाखवल्या आहेत. मगाशी सांगितलेल्या पहिल्या प्रकारातले हे प्राध्यापक आहेत. यात एक प्राध्यापिकाही आहेत आणि एक विद्यार्थीही आहे. हा विद्यार्थी मी मगाशी सांगितलेल्या दुसऱ्या प्रकारातला आहे.
सुमित संघमित्र, शर्वरी लहाडे, श्रीनिधी झाड हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. त्यांनी त्यांची कामं अप्रतिम केली आहेत. नाटकाचं संगीत अमोघ इनामदारने केलं आहे. ध्वनी संयोजन यश लोणकरचं आहे. नाटकाचा लेखक ओंकार गोखले आहे आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन क्षितिश दातेनं केलं आहे. नेपथ्य संकेत पारखे आणि टीमनं केलं आहे. प्रकाश योजना संकेत पारखे आणि वेदिका कुलकर्णी यांची आहे.
थिएट्रॉन या नाट्यसंस्थेचं हे नाटक आहे. या संस्थेला यंदा १२ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांनी संस्थेच्या नाटकांचे प्रयोग ठेवले होते. त्या फेस्टिव्हलमधलं पहिलं, ‘मिकी’ नावाचं नाटक बघायचं राहिलं. पण बाकी सगळी बघितली. त्याविषयी आता एक एक करून पोस्ट करणार आहेच. आता ‘न केलेल्या नोंदी’ या नाटकाविषयी किंवा नाटकात काय घडतं, हे जर विस्तारानं सांगायचं ठरवलं, तर मजा जाईल नाटक बघण्याची. त्यामुळं हे नाटक प्रत्यक्ष बघायला पाहिजे.
(२ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा