मध्यम काही नसतंच का?





There is nothing such as Black and White now. Everything is Grey. 

हे वाक्य जगजाहीर आहे. पण लोक अजूनही ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. निदान त्यांच्या वागण्यातून तरी तसंच वाटतं. प्रत्येक वेळी दोन टोकं प्रामुख्यानं दिसतात. सण, राजकारण, संगीत, परंपरा, लेखन, माणसं, चित्रपट, जात, धर्म, भाषा, खेळ, तंत्रज्ञान, भावना, कुटुंब व्यवस्था......... ही यादी न संपणारी आहे. अशी जी मनात येतील ती क्षेत्रं निवडली आणि त्यावर थोडा जरी विचार केला तरी आपल्याला ही दोन टोकं लगेच दिसतील. ही दोन टोकं काही आत्ता तयार झालेली नाहीत. फार पूर्वीपासून आहेत; पण सोशल मीडियामुळं ती जरा जास्तच टोकदार झाली आहेत.त्याला करोना काळही तितकाच जबाबदार आहे असं मला वाटतं.

माणसानं १०० चांगल्या गोष्टी केल्या आणि एक जरी चूक केली तरी ती चूकच लक्षात राहते, असं म्हटलं जातं. त्यात खोटं काहीच नाही. मनुष्यस्वभाव आहे तो. पण मग आपण बदलणार कधी? देश सुधारतोय, असं एकीकडं म्हणायचं; पण विचार मागासलेलेच ठेवायचे, असं कसं चालेल? सतत आपलं एकच एक टेप लावून लोक कंटाळत कसे नाहीत? प्रत्येक वेळी हंगामी बोलणं आणि लिहिणं कसं जमतं?

उदा. आला एखादा सण की त्याची दोन टोकं समोर, पदार्थाचा विषय निघाला किंवा मुद्दाम काढला की मांड त्याच्या बाजूनं किंवा विरोधात मत, राजकारणी काही बोलला की धुवा त्याची धुणी किंवा करा जहाल टीका..... ही प्रकरणं अक्षरश: न थांबणारी आहेत. माझं निरीक्षण आहे, की करोनाकाळात जे लॉकडाउन झालं, त्या वेळी अशा सगळ्या गोष्टींच्या भडीमाराला सुरुवात झाली. आणि आता लोकांना स्वस्थ बसवत नाही ते बोलल्याशिवाय, वाचल्याशिवाय, ऐकल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय.... केलेलं दाखवल्याशिवाय राहवत नाही, हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा.

‘कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीत मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता ‘अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसविण्याचा खरा मार्ग कोणता?’ या विषयावर आपण स्वत: पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.’

पुलंनी हे ‘पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर’ यामध्ये पुणेकर होण्यासाठी ‘व्यंगात्मक’ लिखाण केलं आहे. पण सध्या हा उतारा केवळ पुणेकर होण्यासाठी नाही, तर देशाचा ‘आदर्श नागरिक’ होण्यासाठी वापरला जातोय. त्यात व्यंग वगैरे बाजूला ठेवून वर लिहिल्याप्रमाणं लोकांनी तंतोतंत वागायला सुरुवात केली आहे.

हे सगळं झालं मुख्यत: सोशल मीडियावर दोन टोकांचा आधार घेऊन व्यक्त होणाऱ्यांसाठी. आता मूळ मुद्द्यावर येऊ. माणसं कायम दोन टोकं बघतात, अधलंमधलं सोयीनुसार सोडून देतात, असा मुद्दा होता. रस्त्यावरून चालताना आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी मस्त हसतखेळत, गप्पा मारत आणि प्रसंगी ‘बदलेल्या’ जगानुरूप स्वत:मध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न म्हणून खांद्यांवर, कमरेत हात घालून चालताना दिसले की काय काय विचार येतात हो?

‘यांचं काही तरी आहे, हे काय वागणं झालं का चारचौघात हे एकीकडं आणि त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, ते समाजाचा भाग असल्यानं त्यांना हवं तसं ते वागू शकतात, हे दुसरीकडं....’ माझ्यामते हे असे दोन टोकांचे विचार करणारी माणसं वाढत चालली आहेत. ‘ते दोघं केवळ मित्र-मैत्रीण असू शकतात. पण समाजात वावरताना त्यांनी आजूबाजूचं जरा भान राखायला हवं.’ हा माझ्यामते मधला एक विचार झाला. हा किंवा असा विचार करणारे किती लोक आहेत? प्रत्येक वेळी मुलगा आणि मुलगी यांच्यातल्या नात्याला लैंगिकतेचं लेबल लागलंच पाहिजे का?

पुन्हा एकदा सांगतो. मुलगा आणि मुलगी हे फक्त सगळ्यांना लवकर समजेल म्हणून दिलेलं एक उदाहरण आहे. असे चर्चा करण्यासारखे अनेक विषय आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यावर कधी तरी मध्यम विचार करता येऊ शकतो का? मधला काही मार्ग निघू शकतो का? हे मांडण्याचा प्रयत्न. अडचणींमध्ये शक्यतो सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न आपण करतो. मग विचारांमध्ये हा सुवर्णमध्य कुठं जातो?

पूर्वी परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांना प्रचंड महत्त्व होतं. कमी मार्क पडले, की त्या मुलाला किंवा मुलीला प्रसंगी हिणवलं जायचं, टोमणे मारले जायचे. त्यामुळं केवळ मार्क मिळवण्याकडं मुलामुलींचा कल होता. काहीही करून मार्क मिळवायचे हे एक ध्येय होतं. पण मग त्यामुळं कॉप्यांसारखे प्रकार वाढले. मनासारखे मार्क न मिळाल्यामुळं आत्महत्या करायला लागले लोक. हे झालं होतं एक टोक. पण मग ते होऊ नये म्हणून काय झालं? मार्कांना काही महत्त्व नसतं, आयुष्यात मार्क मिळवून कोणी काही फार आंबे पाडलेले नाहीत, असं म्हणून शाळा-कॉलेजांत नापास झालेल्यांचा उदोउदो करायला सुरुवात झाली. हे झालं थेट दुसरं टोक.

खूप दिवसांपासून हे मनात होतं. लिहूनही ठेवलं होतं. त्यात काही तरी भर पडणार आहेच. आयपीएलमध्ये रिंकू सिंहने मॅच जिंकवून देण्यात खूप मोठा वाटा उचलला. त्यामुळं त्याला डोक्यावर घेऊन नाचत आहेत सगळे. काही कारणांमुळं जर तो पुढच्या काही मॅच वाईट खेळला तर....? याच्या आधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनच्या बाबतीतही हेच झालं. आणि नुकतंच उदाहरण म्हणजे महेश काळेंचं.... जेव्हा ते सगळ्यात आधी लोकांसमोर आले, त्यांचं गायन आलं, तेव्हा त्यांना डोक्यावर घेतलं. आणि त्यांनी केलेला प्रयोग म्हणा किंवा आणखी काही... ते ऐकवलं नाही मलाही. पण म्हणून त्यांच्यावर टीका करताना काही भान?? 

कोणत्याही ठिकाणी टोकाची भूमिका घेण्याआधी आपण कुठं आहोत ते प्रत्येकाला समजायला हवं, असं माझं मत आहे.


(१२ एप्रिल २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर