नैराश्याची सोशल जाहिरात





'खूप वाईट वाटतंय. निराश झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळं काय करावं हे सुचत नाहीए,' अशा आशयाची एक पोस्ट समाजमाध्यमावर वाचली; पण त्यावर असंख्य लाइक्स दिसले. त्या पोस्टवर 'काय झालं' अशा अर्थाच्या कमेंट कमी होत्या. किती लोकांनी त्या पोस्टकर्त्याला भेटून कारण विचारलं असेल किंवा निदान फोन केला असेल? या अशा प्रकारच्या अनेक पोस्ट्स आजकाल 'व्हायरल' झालेल्या दिसतात. त्यांना लाइक्स भरपूर असतात; पण खरी मदत किती मिळते, हा चर्चा करण्याचा विषय आहे. मुख्यतः या पोस्ट्स स्क्रोल केल्या जातात. मुळात आपल्याला एवढं निराश झाल्यासारखं वाटतंय, तर आपण आपल्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी का बोलत नाही? जर यांपैकी कोणाशी संवाद साधायला लाज किंवा संकोच वाटत असेल, तर एखाद्या समुपदेशकाची मदत घ्यायला काय हरकत आहे? आजकाल विशेषतः तरुणाईमध्ये लहान सहान गोष्टींवरून नाराज होण्याचं आणि निराश होण्याचं वाढतं प्रमाण आहे.
बऱ्याच वेळा कुटुंबासोबत साध्या कारणावरून वाद झाला की नाराजी, कधी छोटं जरी अपयश आलं की नाराजी किंवा रोज बोलणारी एखादी व्यक्ती बोलली नाही की लगेच नाराजी व्यक्त केली जाते. या नाराजीलाच काही जण नैराश्य समजून लगेच सोशल मीडियावर अपडेट करतात. अशा वेळी त्या पोस्टकर्त्याला फार फरक पडलेला नसतो. किंबहुना, ती भावना अगदी काही वेळापुरती असते; पण त्याचं टेन्शन इतर लोक घेतात आणि लगेच विचारपूस करतात. मात्र, त्यांनाही लगेच ती नाराजी तात्पुरती असून नैराश्य नाही याचा अंदाज येतो आणि मग प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. पोस्टकर्त्यांनी 'लांडगा आला रे आला' हा गोष्ट ऐकलेली असते; पण ती नेमकी या वेळेला त्यांना आठवत नाही. त्यातूनच दुःख वाटू शकेल अशी एखादी अगदी लहानशी गोष्ट घडली, तरी ती सोशल मीडियावर जाते. त्यातून सहानुभूती मिळते, पोस्टकर्ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही काळ चर्चेतही राहतात; पण त्याचे दूरगामी परिणाम भयंकर असू शकतात. अशा निराशाजनक पोस्ट पाहून एखादी व्यक्ती त्या पोस्टशी स्वतःचा संबंध जोडते आणि कालांतराने ती व्यक्तीही अशा पोस्ट्सचा सपाटा लावण्याची शक्यता असते. त्यातून कधीही तुटू न शकणारी अशी एक लांबलचक साखळी तयार होते. मात्र, ही निराशा तात्पुरत्याच स्वरूपात असल्याचं अनेक प्रकारणांवरून दिसून आलं आहे.

एक उदाहरण दिल्यास ही बाब स्पष्ट होण्यास आणखी मदत होईल. एका गरीब घरातील तरुणीने आत्महत्या केली. तिला ओळखणाऱ्या एका तरुणाने ही बातमी समजताच सकाळी तिच्याबाबत जुजबी माहिती असलेली आणि तिला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्या मुलीबाबत आणखी थोडी माहिती असलेली एक बातमी त्या मुलाने त्याच समाजमाध्यमवरून दुपारी पोस्ट केली. पुढील तीन तासांत त्या मुलाने त्याच्या आवडत्या नेत्यासोबत फोटो पोस्ट करून त्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्याच दिवशी रात्री वाईट वाटलेल्या पोस्टला १२ तास होतात न होतात, तोवर स्वतःचा हसरा, चांगल्या कपड्यातला, राजबिंडा वगैरे म्हणता येईल असा फोटो पोस्ट केला. या उदाहरणावरून प्रकरणाची गंभीरता लक्षात येऊ शकते. हे केवळ पाहण्यातले आणि घडलेले एक सत्य प्रकरण आहे. यासारखीच कितीतरी अनेक प्रकरणे असण्याची शक्यता आहे, जी बऱ्याच वेळा समोर येत नाहीत.

'लहानात लहान गोष्टीमधून रेकग्निशन मिळावं, म्हणून लोक सातत्यानं विविध समाजमाध्यमांवर पोस्ट्स करताना दिसतात. मात्र, काही वेळा अपेक्षित असलेले लक्ष वेधले जात नाही. याचा परिणामही वागणुकीवर होताना दिसतो. सोशल मीडियावर पटकन रिऍक्शन मिळते. त्यातच निराशाजनक पोस्ट काही वेळा गांभीर्यानं न घेता त्याची चेष्टा केली जाते. म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समाजमाध्यमांवर टाकू नये. प्रत्येक घटनेचा फोटो, सातत्याने वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती देणारे लिखाण अशा गोष्टी पोस्ट करणे टाळावे, असे आवाहन आम्ही करीत असतो,' अशी माहिती रिस्पॉन्सिबल नेटीझनचे उन्मेष जोशी यांनी दिली.

'निराशा, उद्वेग, चिडचिड या मानवी भावना आहेत. मात्र, निराशा जर जास्त काळ टिकली, तर ती घटक ठरू शकते. कोणी तरी माझ्याकडे लक्ष देणारे आहे हे समजावे, म्हणून समाजमाध्यमांवर अशा पोस्ट्स केल्या जातात. त्याला मिळालेल्या लाईक्समुळे संबंधित व्यक्ती सुखावते. या भावना भासमान आहेत की खऱ्या याचे अनुमान काढता येत नाही; पण काही वेळा निराशाजनक पोस्ट जाणीवपूर्वक केलेल्या आढळतात. एखाद्या व्यक्तीकडून निराशा वारंवार व्यक्त केली जात असेल, तर जवळचे नातेवाइक, मित्रमंडळींनी त्याची दखल घेणे आवश्यक आहे. अशा दुसऱ्याने केलेल्या निराशावादी पोस्ट पाहिल्यानंतर त्यातील घटनांशी व आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांची काही साधर्म्य असेल व त्या पोस्ट वाचून आपल्या भावना उद्दीपित होत असतील, तर बऱ्याच जणांना आपणही अशा पोस्ट टाकाव्या असे वाटू शकते. वस्तूतः दोघांचे आयुष्य त्यातील घटना व त्यांचे वास्तव यात फारसे साधर्म्य नसले, तरी वरवर पाहता माझ्या आयुष्यात अगदी असेच घडले आहे, असे अनेक जणांना वाटते. समाजमाध्यमांवर येणाऱ्या पोस्टला केवळ पोस्टकर्ता कोण आहे, हे पाहूनही लाइक केलं जातं. प्रत्येक वेळी पोस्ट वाचणं शक्य नसल्याने लाइक करून स्क्रोल करणं हा दुर्दैवानं आयुष्याचा एक भाग झाला आहे. एकंदरीत पाहणीमध्ये असे दिसून आले आहे, की १६ ते २४ या वयोगटातल्या व्यक्तींमधील धैर्य, संवेदनशीलता, सहनशीलता आणि संयम कमी झाला आहे. त्यामुळे इन्स्टंट मिळणाऱ्या फास्ट फूड प्रमाणे प्रत्येक बाबतीत जलद परिणाम मिळावेत अशी अपेक्षा केली जाते,' असे मत समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ मकरंद ठोंबरे यांनी व्यक्त केले.

'बऱ्याचदा सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट्स बघून पोस्ट टाकणारा खूप दुःखी, एकटा आणि कदाचित मानसिक कमकुवत झाला आहे, हे सायबर भामट्यांच्या लक्षात येतं. आपणच खरे काळजी करणारे आणि आपल्याशिवाय त्या व्यक्तीची जगात कोणीच काळजी घेऊ शकत नाही, असे निराश व्यक्तीला भासवले जाते. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते किंवा आर्थिक फसवणूक केली जाते. असे अनेक गुन्हे घडले असल्याने सोशल मीडियावर अशा कोणत्याही गोष्टी टाकणे टाळावे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जवळीक वाढवू नये,' अशी प्रतिक्रिया सायबर सुरक्षा तज्ज्ञ  ओंकार गंधे यांनी दिली.

आपण व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांमधून वारंवार लक्षात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर व्यक्त होणे कधीही चांगले. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतातच. त्यापैकी वाईट गोष्ट घडली असतानाही त्यातून आपल्याला काय चांगला फायदा होऊ शकतो, हे शोधल्यास निराशा येण्याचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.


(पूर्वप्रसिद्धी मैफल पुरवणी, महाराष्ट्र टाइम्स २४ डिसेंबर २०२२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर