कात्री
"अरे दादा, हे सॅचे उघडत नाही. दुसरं मिळेल का? किंवा मग कात्री असेल तरी चालेल."
त्या मुलानं असं म्हणताच आजूबाजूच्या दोन-तीन टेबलांवर खसखस पिकली. त्याच्याबरोबरची मुलगी तर त्याच्याकडं खाऊ की गिळू नजरेनं बघत होती. शिवाय एकीकडं तोंड लपवायचाही प्रयत्न करत होती. तो 'दादा' काय करायचं हे न समजल्यानं त्याच्याकडं बघून हसला. (महागड्या ठिकाणी गेल्यावर आपली जशी पंचाईत होते ना तसं त्याचं झालं)
"एन्जॉय युअर मील सर." असं म्हणून तो बिचारा निघून गेला. तोपर्यंत त्या मुलाला काय घडलं असेल याचा जरासा अंदाज आला होता. बरोबरच्या मुलीनं त्याची थोडक्यात कानउघाडणी केली आणि मग तो मुलगा सॉसचा सॅचे बाजूला ठेवून कोल्ड्रिंकबरोबर बर्गर गिळू लागला.
मी त्यांच्या मागच्याच टेबलावर बसून हे सगळं बघत होतो. मजा येत होती मला. नुकतीच दहावी झालेली त्यांची आणि तो मुलगा बहुदा पहिल्यांदाच आला होता अशा जागेत. (मुलगा-मुलगी गप्पा मारतायत म्हटल्यावर त्यांचं बोलणं माझ्या 'कानावर पडत' होतंच) झाल्या प्रकरणावर हसता हसता मला माझाच जुना किस्सा आठवला आणि कोल्ड्रिंकचा मोठा घोट घेऊनही बर्गर घशात अडकल्यासारखा झाला.
माझ्या १२ वीचा रिझल्ट लागल्यावर मी पहिल्यांदाच आलो होतो 'मॅकडी'ला. आलो होतो म्हणण्यापेक्षा मला सिद्धीनं आणलं होतं. शाळेनंतर, म्हणजे खरंतर चौथीनंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो. आम्हाला दोघांनाही मार्क चांगले पडले होते आणि चौथीतल्या बाईंना पेढे द्यायला आम्ही योगायोगानं एकत्रच गेलो होतो. तिथं भेटलो. मग एकमेकांचे नंबर घेतले आणि 'परत लवकर भेटूया आता सगळेच' असं एक घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आम्ही एकमेकांना म्हणालो. पण ती पोरगी बाहेर पडली आणि माझ्याच मागं आली. मला म्हणाली,
"ऐक. असं काही लवकर परत भेटणं होईल की नाही सांगता येत नाही. शिवाय सगळे एकत्र कधी येणार? भेटूया भेटूया म्हणत त्यांच्या हाता-पाया कोण पडणार? त्यापेक्षा चल, आपण भेटलोय तर काहीतरी खाऊन घेऊ. भूक तर लागलीए मला आणि परत कॉलेजला जाऊनही पेढे वाटायचे आहेत."
मला काय बोलावं तेच कळेना. मी एकतर लगेच घरी जायचं या हिशोबानं नाश्ता न करताच आलो होतो. त्यामुळं मलाही भूक लागली होती; पण लगेच घरी जायचं असल्यानं मी पैसे आणलेच नव्हते. फक्त तोंड घेऊन आलो होतो. हे सगळं माझ्या चेहऱ्यावर उमटलं आणि ते बहुतेक तिनं वाचलं. गालातल्या गालात हसत मला म्हणाली,
"चल रे, पटपट हालचाल कर. माझं तोंड बघत उभा राहू नको. कुठं जायचं सांग."
आता आली का पंचाईत! मी काय सांगू कप्पाळ! मला गप बसलेला बघून ती आगाऊ परत म्हणाली,
"पटकन सांग. नाहीतर मी सांगेन तिथं यावं लागेल. आणि हो, गाडी माझी असेल तर बिल तू भरायचं आणि तुझी गाडी असेल तर बिल मी भरणार."
व्वा! काय हुशार आहे ही पोरगी! उगाच फालतू आढेवेढे घेत मी शेवटी तोंड उघडलं,
"बरं आता तू मागेच लागलीस म्हणून चल. पण कुठंतरी लांब जाऊ आणि गाडी माझीच घेऊ. पण तुला चालवायला देणार नाही. मी माझी गाडी कोणालाही चालवायला देत नाही."
हा २४ वर्षांचा मी जर मी तिथं असलो असतो ना, तर १७ वर्षांच्या माझ्याच खाड्कन मुस्काटात मारली असती मी. असो!
शेवटी तिनं एक लांबचं मॅकडी सांगितलं आणि आम्ही तिथं गेलो. गेल्यावर अर्थातच मला तिथं काय घ्यायचं, कसं मागायचं हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळं "तू काय घेणार?" असं सिद्धीनं विचारल्यावर "मला फार भूक नाही. जे तू घेशील तेच मी घेईन." हे बावळट उत्तर मी दिलं. आता ते आठवलं तरी लाज वाटते.
तिनं ऑर्डर दिली आणि ती येईपर्यंत मी मॅकडी कसं असतं, तिथं येणारे लोक कसे असतात, ते काय काय खातात याचं निरीक्षण करत होतो. ती बहुतेक अधून मधून माझ्याकडं बघून हसत होती. आमची ऑर्डर आली. आम्ही ती घेऊन टेबलवर बसायला आणि आमच्या शेजारी राहणारे काका मॅकडीमध्ये शिरायला एकच गाठ पडली. जाम तंतरली माझी. त्या फाटक्या तोंडाच्या माणसानं जर मला सिद्धीसोबत बसून बर्गर गिळताना बघितलं तर माझं अवघड आहे, हे मला लगेचच समजलं. कशातच काहीही नसताना हा माणूस उगाच काय वाट्टेल ती बडबड करू शकतो हे मला दिसायला लागलं. पुढं घडू शकणाऱ्या घटना डोळ्यासमोरून सरकायला लागल्या आणि माझा घास घशातच अडकला.
मला जोराचा ठसका लागला. मी लगेच कोल्ड्रिंक प्यायलो; पण ते सोडायुक्त होतं त्यामुळं घशात कसंतरीच झालं मला. मी उठलो आणि बेसिनपाशी गेलो. तशी सिद्धीही माझ्या मागं आली. मी बेसिनमध्ये वाकून खोकत होतो आणि बिचारी घाबरलेली सिद्धी माझ्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला वाटलं तिनं जी ऑर्डर दिली, त्यामुळं मला त्रास झाला. मला असं खोकताना बघून आजूबाजूची माणसं जमा झाली. पण मी त्यांना घालवून दिलं. माझ्याभोवती गर्दी जमली, तर 'ही गर्दी कसली?' असा विचार करून तो रिकामटेकडा मला बघायला यायचा नेमका! म्हणून मी ५-१० मिनिटं तिथं थांबलो. सिद्धीला जाऊन बस म्हणालो. ती जाऊन बसली आणि १० मिनिटांनी मीपण हळूच बेसिनपासून मुंडकं बाहेर काढून ते काका कुठं दिसतायत का? ते बघितलं. सगळ्या टेबलांवरून नजर फिरवली, काउंटरलाही बघितलं. पण तो चमकणारा पौर्णिमेचा चंद्र मला कुठं दिसला नाही. त्यामुळं टेन्शन कमी झालं माझ्या डोक्यावरचं. हळूच तिथून बाहेर आलो आणि सिद्धीसमोर बसलो. होता तेवढा सगळा बर्गर कोल्ड्रिंकसोबतच गिळला आणि बाहेर पडलो.
'मी बेसिनपाशी उभा राहून हळूच इकडं तिकडं का बघत होतो?' असं मला परत येताना सिद्धी विचारत होती. पण तिला मी खरं काय ते सांगितलं नाही. तिला शाळेपाशी सोडून गप घरी गेलो.
तेवढ्यात मला धक्का लागला आणि मी जुन्या आठवणींमधून बाहेर आलो. ती मुलगी त्या मुलाच्या बखोटीला धरून त्याला बाहेर घेऊन जात होती. ते बघून लोक आश्चर्य व्यक्त करत होते. पण मी मात्र गालातल्या गालात हसत माझा बर्गर कोल्ड्रिंकबरोबर गिळत होतो.
(२० जुलै २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा