प्रवास





...आणि तो अमेरिका प्रवास संपवून युरोप प्रवासाला निघाला. 

हे शेवटचं वाक्य लिहून तिनं वही बंद केली आणि ज्या लेखिकेसाठी म्हणून ती हे लिहीत होती, त्या लेखिकेकडं वही द्यायला ती घरातून बाहेर पडली. 

मार्गी. कनिष्ठ मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली मुलगी. आपल्या वडिलांना नोकरीतून फार पैसे मिळत नाहीत आणि जे मिळतात ते पुरवण्यात आईची तारांबळ उडते हे ती अगदी लहानपणापासूनच बघत आली होती. त्यामुळं तिला काटकसरीचं महत्त्व समजलं नसतं तरच नवल! आपल्याला जगभर फिरायचं होतं पण ते जमलं नाही, निदान मुलीला तरी ते करायला मिळावं अशी मार्गीच्या आईवडिलांची इच्छा होती. बेताचीच परिस्थिती आहे हे माहीत असूनही. म्हणून तर त्यांनी तिचं नाव मार्गी ठेवलं होतं. मार्गीनंसुद्धा तिचा प्रवास कधीच थांबवला नाही. फक्त तिचा प्रवास तिच्या आईवडिलांच्या स्वप्नातल्या प्रवासापेक्षा थोडा वेगळा होता. तिचा प्रवास म्हणजे कामानिमित्त किंवा कॉलेजला जाण्यासाठी शहराच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत असं दररोज जाऊन येऊन १९ किलोमीटर चालणे. दररोज अभ्यासाला लवकर जावं लागतं आणि उशिरापर्यंत थांबावं लागतं हे कारण सांगून ती घरातून लवकर बाहेर पडून उशिराच घरी यायची. कॉलेजला किंवा कामाच्या ठिकाणी गेल्यावर आणि घरी आल्यावर आपण थकलोय हे न दाखवता नॉर्मल राहण्याची तिची जिद्द, धडपड खरंच वाखाणण्याजोगी होती. आपल्या या प्रवासाचं गुपित तिनं तिच्या आईवडिलांपासून खूप चांगल्या पद्धतीनं लपवलं होतं, असं तिला वाटत होतं. पण शेवटी आई बाप ते आई बाप! त्यांना का असल्या गोष्टी समजल्यावाचून राहतात? ते तिला बस आणि रिक्षासाठी पैसे द्यायचे. कधी उशीर झालाच तर खायला म्हणून आपणहून जास्तीचेही पैसे द्यायचे. पण मार्गी ते सगळे पैसे शिलकीत टाकायची. फक्त जेव्हा पाळी असेल तेव्हा मात्र तिला नाईलाजानं ते पैसे वापरावे लागायचे. याचं दुःखही होतं तिला. त्यामुळं आईबाबांना घर सांभाळण्यात आपलाही काही हातभार लागावा म्हणून ती शिकता शिकता 'नामवंत' लेखकांना त्यांच्या काल्पनिक पात्राचा समावेश असलेल्या लहान कथा, लेख तर कधी कविताही लिहून द्यायची. त्याबदल्यात तिला थोडे का होईना पण पैसे मिळायचे. पण कोणालातरी 'प्रवासवर्णन' लिहून देण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. जिच्यासाठी म्हणून मार्गीनं हे प्रवासवर्णन लिहिलं होतं, ती खूप प्रसिद्ध लेखिका होती. तिच्या घराबाहेर उभं राहून मार्गीनं पहिल्यांदा चेहरा धुतला. जवळच्या बाईकला असलेल्या आरशात पाहून केस नीट करत असतानाच तिला आठवला तो दिवस. ज्यादिवशी तिनं तिच्या एका मित्राचं ऐकून खऱ्या अर्थानं लिहायला सुरुवात केली होती. मात्र नुसतं लिहून काही पोट भरत नाही याचा अंदाज तिला होता. 

त्यादिवशी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता. आंतरशालेय निबंधस्पर्धेचा विषय प्रवास, आत्मकथन किंवा तुम्हाला आवडेल तो असा होता. मार्गीनं या तिन्ही विषयांचं मिश्रण केलं होतं आणि एक सुंदर असा निबंध लिहिला होता. तिनं मुख्य विषय ठरवला होता, तो म्हणजे 'रस्त्याचं आत्मकथन.' त्यातच तिच्या गावातून नुकतीच वारी गेली असल्यानं रस्त्याच्या जीवनप्रवासाबरोबर वारकऱ्यांच्या प्रवासाचीही जोड तिनं निबंधात दिली होती. निबंध स्पर्धेत मार्गीचा पहिला नंबर येणार याची तिला स्वतःला गॅरंटी नसली तरी तिच्या मित्राला नक्कीच होती. तसा तो नंबर आला आणि तिला २ हजार रुपये रोख बक्षीस मिळालं. हे बक्षीस सगळ्या परीक्षकांनी त्यांच्या खिशातून दिलं होतं. मार्गीचा निबंध आवडला म्हणून. त्यातल्या एका परीक्षक मॅडमनं मार्गीला नंतर भेटायला बोलावलं होतं. मार्गीच्या वर्गशिक्षकांना भेटून त्यांनी तिच्याबद्दल माहिती मिळवली होती. मार्गीला भेटल्यावर त्या दोघींमध्ये थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यानंतर 'तू खूप छान लिहितेस. तुला जर असं चांगलं पण दुसऱ्यासाठी लिहून द्यायचं असेल तर देशील का? त्याबदल्यात पैसे मिळतात. फार नाही मिळत. पण असं काम करणारे पुष्कळ लोक आहेत. बघ विचार कर आणि मला कळव.' अशी खुल्ली ऑफरच त्या मॅडमनं मार्गीला दिली. हो म्हणून ती बाहेर पडली खरी, पण १५ मिनिटात परत येऊन 'काम करेन' असं सांगितलं. तिथून तिचं खरं काम सुरू झालं. त्या मॅडममुळं मार्गीच्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या. त्यातून ती बऱ्याच जणांना लिहून देऊ लागली. त्याबदल्यात तिला थोडा मोबदला मिळायला लागला. अशीच एका कार्यक्रमात या प्रसिद्ध लेखिकेशी मार्गीची ओळख झाली होती. वागायला आणि बोलायला ही लेखिका थोडी फटकळ असली तरी पैसे जास्त देत होती. म्हणून मार्गी त्यांचं काम करत होती. त्यांचं एरवीचं लिखाण वेगळं असायचं. पण या वेळी त्यांनी प्रवासवर्णन लिहून द्यायला सांगितलं होतं आणि तेच लिखाण घेऊन मार्गी आली होती. 

आरशात पाहून मार्गीनं केस नीट केले आणि चेहऱ्यावरचा थकवा घालवून तिथं एक उसनं स्मितहास्य आणलं. अशी रोजच्यासारखी तयारी झाल्यावर मगच तिनं बेल वाजवली. आत गेल्यावर पूर्वीप्रमाणेच फक्त नमस्कार चमत्कार झाले आणि 'हे वाचून कळवते' असं सांगून मार्गीची रवानगी झाली. तीही बिचारी आल्यापावली परत गेली. नेहमीसारखीच! पण मार्गीनं या वेळी जे लिहिलं होतं, ते इतकं अप्रतिम होतं की लेखिकेनं सगळी १७५ पानं वाचूनच वही खाली ठेवली. 'आजवर आपण ज्यांच्याकडून लिहून घेतलं त्यावर काम करण्यात परत काही दिवस जायचे. पण या मुलीनं एवढं सुंदर लिहिलं आहे की डायरेक्ट छापायला दिलं तरी चालण्यासारखं आहे.' असा विचार मनात येताच ती लेखिका फोनपाशी गेली.

'तू खूप उत्तम लिहितेस. इथून पुढं कोणासाठी म्हणून तुझं लिखाण द्यायचं नाही. स्वतःचं लिखाण स्वतःच्या नावावरच प्रकाशित करायचं. मी तुझ्याबद्दल काही प्रकाशकांशी बोलले आहे. आपल्याला त्यांनी बोलावलं आहे. मी तुला न्यायला येते. पत्ता सांग.' मार्गी हे सगळं हातात फोन घट्ट धरूनच ऐकत होती. तिला या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. डोळ्यात पाणी, हातात फोन घट्ट पकडलेला, शरीर पुतळ्यासारखं ताठ अशी मार्गीची अवस्था पाहून तिची आई धावत तिच्याजवळ गेली आणि मार्गीच्या वडिलांना तिनं हाक मारली. त्या दोघांनी मार्गीला खुर्चीत बसवलं आणि प्यायला पाणी दिलं. ती जरा शांत झाल्यावर बोलायला लागली. आजवर लपवून ठेवलेलं लिखाणाचं गुपित तिनं तिच्या आईबाबांना सांगितलं. ती संपूर्ण गोष्ट, मार्गीचा हा लेखनप्रवास, घरच्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द पाहून मार्गीची आई तिला मिठी मारून रडायला लागली. वडिलांना तिच्यासमोर डोळ्यातले अश्रू परतवणं कठीण झालं होतं, त्यामुळं ते 'आलोच' असं म्हणून दरवाजाच्या पलीकडं थांबले. असं काही होईल हे मार्गीला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. ती तर त्या लेखिकेला इतर कामांसारखं म्हणून भेटली होती. आई वडिलांशी बोलत असतानाच मार्गीच्या घराबाहेर लेखिकेच्या गाडीचा हॉर्न वाजला

...आणि एक लेखिका म्हणून मार्गीचा 'प्रवास' सुरू झाला.


(२७ जून २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर