सोमनाथ छावणी : एक विलक्षण अनुभूती






आपल्याला आपल्या शहरांमध्ये दिव्यांगांना सहानुभूती दाखवणारे पुष्कळ लोक दिसतात. मात्र इथं तसं नव्हतं. सर्वांमध्ये समानतेची भावना होती. धर्म, जात-पात याबद्दल तर कधी विचारही आला नाही. पाणी जरी प्यायचं असेल तरी कोणीही यायचं आणि कोणाच्याही बाटलीतून पाणी प्यायचं. यासाठी विचारण्याची, परवानगी घेण्याची गरज कधी वाटली नाही, ही खरंच खूप चांगली गोष्ट या श्रमसंस्कार छावणीमधून शिकण्यासारखी होती.


'जोडो जोडो, भारत जोडो!' ही घोषणा जेव्हा पहिल्यांदा दिली तेव्हा अंगात खूप ऊर्जा संचारल्यासारखं वाटलं. बाबा आमटेंनी उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पाबद्दल फार काही माहिती नव्हती. मात्र जेव्हा समजलं तेव्हा जायची खूप इच्छा झाली. बऱ्याच उचापती केल्यानंतर तिथं जायचं नक्की झालं. खूप तापमान असतं ही भीतीही दाखवली गेली मला. पण जायचं ठरवलं असल्यानं मी याकडे फार लक्ष दिलं नाही. 

चंद्रपूरला उतरल्यावरच मला तिथं असलेल्या कडकडीत उन्हाळ्याची जाणीव झाली. बसस्टँडवरून बस पकडून थेट मूल या गावी उतरलो. तिथून सोमनाथ प्रकल्पामध्ये नेण्याची व्यवस्था प्रकल्पातील स्वयंसेवक करतील असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणं स्वयंसेवकांनी मूल बसस्टँडजवळच पाणी, सरबत आणि बिस्कीट पुडा अशी व्यवस्था उन्हातून आलेल्या शिबिरार्थ्यांसाठी केली होती. प्रकल्पामध्ये गेल्यानंतर केलेल्या रजिस्ट्रेशनचं कन्फर्मेशन झालं आणि मग ज्यांचं जेवण राहिल होतं, त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था संध्याकाळी ४.३०-५ वाजेपर्यंत सुरू होती. मुलांसाठी एका मोठ्ठ्या हॉलची व्यवस्था केली होती. त्या हॉलमध्ये एक जागा पकडली आणि पडून राहिलो तिथं. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ८.३० च्या दरम्यान आम्ही पुढचे ७ दिवस काय काय करणार आहोत याची कल्पना आम्हाला दिली गेली. त्यानंतर स्वयंसेवकांच्या संपूर्ण टीमची ओळख करून दिली. रवींद्र सर छावणीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सूत्रसंचालनाला होते. मस्त सूत्रसंचालन केलं त्यांनी. 'उद्या पहाटे ४ वाजता शिट्टी मारून उठवलं जाईल', असं आम्हाला सांगण्यात आलं. पहाटे ४ वाजता उठल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी आमचं शेड्युल इतकं टाईट लावलं होतं, की त्यात जरासा वेळ काढून टाईमपास करूया असं ठरवायलाही अजिबात वेळ नव्हता.






पहिल्या दिवशी श्रमकार्य करताना १-२ लोकांबरोबर ओळख झाली. त्यानंतर दररोज कोणा ना कोणाशी ओळख होतच गेली. पहिला दिवस फार वाईट गेला नाही. तरीही त्यादिवशी संध्याकाळीच 'मी इथं का आलो, काय गरज होती मला इथं यायची', असं वाटायला लागलं. पण का कोण जाणे, दुसऱ्या दिवशीपासून ती भावना एकदम निघूनच गेली. शेवटच्या दिवशी तर कोणत्याही कॅम्पला गेलेल्या मुलाच्या मनात आणखी काही दिवस थांबायला पाहिजे होतं, अशी भावना येते. तशी ती माझ्याही मनात आली. दररोज आमचा दिनक्रम जरी ठरलेला असला, तरीही अनुभव मात्र क्षणाक्षणाला वेगवेगळा येत होता. एकतर मला अशा वेगवेगळ्या भागातून, परिस्थितीतून वेगवेगळे विचार असलेल्या ३५० पेक्षा जास्त लोकांबरोबर राहण्याची सवय नव्हती. म्हणजे पुण्यात राहून खूप वाटायचं, की आपण लोकांना भेटलं पाहिजे, मात्र इथं तशी संधी मिळाल्यावर ही संधीच अंगावर आली. दुसरी गोष्ट म्हणजे मला लवकर उठण्याची सवय अजिबात नव्हती. ती इथं सात दिवसात लागली. मी दररोज शिट्टी होण्याआधीच अर्धा-पाऊण तास उठायचो. कष्टाचं काम करण्याची सवय नव्हती, मात्र इथं श्रमदान केलं. जेव्हा वाटायचं की आता नको, दम लागतोय, तेव्हा आमच्या दिव्यांग शिबिरार्थी मित्रांकडं बघून मला पुन्हा उत्साह यायचा. त्यांच्याबद्दल सांगायची कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी सहानुभूती मिळावी म्हणून एकदाही प्रयत्न केला नाही. आपल्याला आपल्या शहरांमध्ये दिव्यांगांना सहानुभूती दाखवणारे पुष्कळ लोक दिसतात. मात्र इथं तसं नव्हतं. सर्वांमध्ये समानतेची भावना होती, धर्म, जात-पात याबद्दल तर कधी विचारही आला नाही. पाणी जरी प्यायचं असेल तरी कोणीही यायचं आणि कोणाच्याही बाटलीतून पाणी प्यायचं. यासाठी विचारण्याची, परवानगी घेण्याची गरज कधी वाटली नाही. ही खरंच खूप चांगली गोष्ट या श्रमसंस्कार छावणीमधून शिकण्यासारखी होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे एका जागी दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बसणं. मला अजिबात सवय नव्हती एका जागी बसण्याची. मात्र इथं आम्हाला मार्गदर्शनपर सत्रं इतक्या अनुभवी आणि उत्तम वक्त्यांची होती, की जागेवरून उठण्याची इच्छा होत नव्हती.

पहिल्या दिवशी डॉ. सोमनाथ रोडे यांनी बाबा आमटेंचे विचार सर्वांना सांगितले. त्यानंतर डॉ. विकास आमटे यांनी आम्हा सगळ्यांशी संवाद साधला. त्यांनी आलेले अनुभव जितक्या सोप्या भाषेत सांगता येतील तितक्या सोप्या भाषेत सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी बाबा आमटे यांनी काढलेल्या 'भारत जोडो सायकल यात्रे'तल्या सहभागी लोकांचं अनुभवकथन होतं. दुसऱ्या दिवशी पर्यावरणतज्ज्ञ केतकी घाटे यांचं मार्गदर्शनपर सत्र होत. त्यात त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाला घरातूनच कसे प्रयत्न करता येतील याची माहिती दिली. या दिवशीपासून दररोज संध्याकाळी प्रत्येक ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, एका दिवशी दोन, असे ग्रुप दररोज आपापले कलागुण सादर करणार होते. याच दरम्यान काही प्रेक्षक आपले 'कलागुण' उधळत होते. तिसऱ्या दिवशी 'री-चरखा' संस्थेच्या अमिता देशपांडे यांचं सत्र होतं. त्यांनीही पर्यावरणातल्या प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचे अनेक उपाय सांगितले. चौथ्या दिवशी अंशू गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी आपण जे कपडे दान करतो, त्या विषयासह मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर खूप माहिती दिली. अनेक गोष्टी अशा सांगितल्या, ज्यांची कधी कल्पनाही करता येणार नाही. पाचव्या दिवशी आनंद शिंदे यांचं सत्र झालं. त्यांनी हत्तींसाठी काम करताना काय काय अनुभव आले ते सांगितलं. अनुभव सांगताना त्यांनी क्षणात हसवलं, क्षणात रडवलं तर क्षणात आश्चर्यचकित केलं. या दिवशी संध्याकाळी कोणत्याही ग्रुपचं सादरीकरण न होता 'स्वरानंदवन' या ग्रुपचं सादरीकरण झालं. दिव्यांग, नेत्रहीन, कर्णबधीर अशा व्यक्तींचा समावेश असलेल्या या ग्रुपनं धडधाकट माणसांचे हातपाय गळ्यात जातील, असं सादरीकरण केलं. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. हेमलकसाहून आलेल्या 'लोकबिरादरी प्रकल्पा'तल्या मुलांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केलं. सहाव्या दिवशी मंदार भारदे आणि संजय साळुंखे यांनी सगळ्यांशी करियर या विषयावर संवाद साधला. सातव्या दिवशी कौस्तुभ आमटे आणि पल्लवी आमटे यांच्याशी सर्व शिबिरार्थ्यांनी संवाद साधला. 

मला यातून काय काय शिकायला मिळालं त्याचा उल्लेख वर केला आहेच. पण प्रमुख उल्लेख मुद्दाम शेवटी ठेवला आहे. तो म्हणजे मी हेमलकसा या प्रकल्पातून आलेल्या आदिवासी मुलांशी संवाद साधला. इतकी गुणी, मेहनती, नम्र आणि शांत मुलं मी कधीच पाहिली नाहीत. स्वतःहून ती तुमच्याशी बोलणार नाहीत. पण तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलात, तर वर्षानुवर्षे ओळख आहे अशा गप्पा मारतील. यांनी मला अनेक वाक्यं शिकवली. पण त्यातली काही लक्षात आहेत माझ्या. 'नीवा पेद्दीर बातल?' म्हणजे तुझं नाव काय? त्याचं उत्तर, 'नावा पेद्दीर गौरांग.' मग, 'नीवा बाबा पेद्दीर बातल?' तुझ्या बाबांचं नाव काय? त्यानंतर 'ए मिती?' म्हणजे अंघोळ झाली का? याचं उत्तर, 'इंगो' म्हणजे हो किंवा 'मिवोन' म्हणजे नाही असं द्यायचं. 'घाटो तित्तीन?' म्हणजे जेवण झालं का? याचं उत्तर, 'तित्तन' म्हणजे हो किंवा 'वेल्ला तित्तन' म्हणजे व्यवस्थित झालं. 'नाही' ला काय म्हणतात ते आता आठवत नाही. ज्योती, अश्विन, महेंद्र, सूरज, नीलकंठ, गणेश आणि अश्विनी ही माझ्या हेमलकसाच्या शिक्षकांची नावं. 

सोमनाथ श्रमसंस्कार छावणीमध्ये येण्याआधी अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, त्या आता स्पष्ट झाल्या. बऱ्याच गोष्टींवर कधीच विचार केला नव्हता, तो आता तरी केला पाहिजे हे या निमित्ताने समजलं. ज्याला स्वतःचं एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडवायचं आहे. त्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी सोमनाथ श्रमसंस्कार छावणीला भेट दिलीच पाहिजे, असं माझं मत आहे.





(२२ जून २०२२ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्धी)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

चेहरे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर