लग्न
सकाळी एका लग्नाला गेलो होतो. मुंज, लग्न, रिसेप्शन अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना जरा लवकर जायचं असतं. कोपऱ्यातल्या एखाद्या जागेवर बसून सगळीकडे नजर पोहोचते मग. हा विचार करून गेलो होतो लवकर. तिथं जेमतेम १० लोकं आली होती. नंतर झाली गर्दी. सुरुवातीला एक लहान मुलगी सगळ्यांना विचारत होती, 'तुम्ही वरपक्ष की वधूपक्ष?'
वधूपक्ष असं सांगितलं तर छातीला लावायचा बॅच देत होती. त्यावर नथ होती आणि वधूपक्ष असं लिहिलेलं होतं. वरपक्ष असं म्हटलं तर हसत होती नुसती. दोन-चार जणांनी तिला विचारलं, 'आम्हाला नाही देणार का बॅच?'
ती म्हणे, तुम्हाला वरपक्षवाले देतील.'
मग मी आजूबाजूला बघितलं, तर दोन्ही प्रकारचे बॅच लावलेली माणसं फिरताना दिसली. त्या मुलीनं मलाही विचारलं, मी नको म्हणालो बॅच. सायन्स प्रोजेक्ट फेअरला गेल्यासारखं वाटलं असतं मला. वरपक्षाच्या बॅचवर पगडी होती आणि वरपक्ष असं लिहिलेलं होतं.
त्यानंतर थोड्या वेळानं आणखी एक मुलगा आला आणि त्यानं तोच प्रश्न विचारला मला. त्यालाही नको म्हणालो मी.
आता गर्दी झाली होती बऱ्यापैकी. लग्न लागलं होतं. नवरा आणि नवरी जुजबी फोटो काढून चेंज करायला गेले होते. मला भूक लागली होती. कधी एकदा त्यांना भेटतो आणि गिळायला जातो असं मला झालं होतं. (किंवा मग ९९ टक्के लोक करतात, ते करणार होतो) तेवढ्यात समोरून एक बाई काही तरी पुटपुटत येताना दिसल्या.
पंगतीत कोशिंबीर वाढणारा एक माणूस असतो. त्याला माहीत असतं की फार लोक कोशिंबीर घेत नाहीत. पण ती फिरवावी लागते. मग तो कोष्मिर कोष्मिर असं करत फिरत असतो. फक्त विचारून इमानेइतबारे तो पुढं जात असतो, पण तेवढ्यात एखाद्याला कोष्मिर हवी असते. मग तो तसाच मागं जातो आणि त्याला वाढून दुप्पट वेगात पुढं जातो.
अशाच त्या काकू येत होत्या. पण त्या पूर्ण शब्द उच्चारत नव्हत्या. वर, वधू एवढंच म्हणत पुढं जात होत्या. माझ्यापाशी आल्या. मला आधीच भूक लागली होती. जीव कासावीस झाला होता. तेवढ्यात त्यांनी वर, वधू? असं विचारलं.
मी म्हणालो, 'मी वर आहे. वधूच्या शोधात आहे. कोणी एखादी चांगली असेल तर सांगा.'
बास. त्यांचं तोंड कोष्मिर वाढणाऱ्या माणसासारखं झाल्यावर जरा बरं वाटलं.
(१३ जुलै २०२४ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा