लोनली लूपचा भोवरा






गावात माणसं कितीही कमी असली, तरी माणूस कधी एकटा पडत नाही; पण शहरात माणसांच्या प्रचंड गर्दीत तो एकटा पडतो, असं कुठं तरी ऐकलं होतं. खरं तर या वाक्याचा माझ्या पोस्टशी काहीच संबंध नाही. पण सुरुवात काही तरी भारी व्हावी असं वाटलं, म्हणून चिकटवलं हे वाक्य.

विषयाला डायरेक्ट हात घालू. थिएट्रॉनचं ‘भंवर’ हे नाटक मी दुसऱ्यांदा बघितलं. पुन्हा एकदा तेवढंच आवडलं. नाटकाची मजाच ती आहे. जेवढ्या वेळा बघू, तेवढं ते नवं वाटतं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन सापडतं. ऑनस्टेज घेतलेल्या ॲडिशन्स, सेटमधला बदल, लाईट किंवा म्युझिकमधले बदल, त्यात आलेल्या अडचणी, कलाकारांचे फंबल्स अशा सगळ्या गोष्टी समजतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे रिपीट आणि नव्यानं आलेले ऑडियन्स. बाकी सगळ्या गोष्टींकडं तर लक्ष असतंच आपलं. पण ऑडियन्स हा प्रकार मला जास्त आवडतो. त्यांच्यात दिसणारे बदलही खूप आवडतात.

थिएट्रॉनचा आत्ता नुकताच महोत्सव झाला. त्यात मी ‘भंवर’ बघितलं. पूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या ‘किमया’मध्ये झालं होतं, तेव्हा बघितलेलं. त्या वेळी जागेमुळं काही गोष्टी राहून गेल्या असाव्यात कदाचित. पण मला त्या या वेळी भरत नाट्य मंदिरात बघता आल्या. फार मजा आली. 

‘भंवर’ची स्टोरी खूप छान आणि साधी आहे. पण मगाशी म्हणालो तसं..... जर विचार करायचाच म्हटलं, तर बऱ्याच गोष्टी जाणवतात हे नाटक बघून. सध्या मेंटल हेल्थ, एकटेपणा यावर सारखी चर्चा होत आहे. कोव्हिडनंतर याच्या चर्चांना ऊत आला आहे. पण हे आत्ता आलेलं फॅड नाही. त्याची मुळं खोलवर गेली आहेत.

आता ‘भंवर’ची स्टोरी. ‘भंवर’ ही एकाकी नाइट वॉचमनच्या शेवटच्या शिफ्टची; पण कधीही न संपणारी कथा आहे. भंवर सिंह एका बंद पडलेल्या कारखान्याबाहेर त्याची शिफ्ट संपण्याची वाट बघतोय. त्यात तो पडला प्रामाणिक वॉचमन, नोकरीवर असताना कधीही न झोपणारा. पण या त्याच्या तत्त्वाचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. हळूहळू वास्तव आणि भ्रम यातली रेष धूसर होते. एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या माणसाचं शहरात काम करून मोठं होण्याचं जे स्वप्न असतं, तेच या आपल्या भंवर सिंहचं आहे. भंवर सिंह उत्तर भारतातला आहे. तिथली संस्कृती नाटकात फार छान मांडली आहे. तिथले संदर्भ, तिथली भाषा, संस्कृती, पारंपरिक गाणं या गोष्टींचा अतिशय अचूक वापर नाटकात केला आहे.

नाटकाची भाषा जरी हिंदी असली, तरी ती आपली मातृभाषा असल्यासारखा शिवराज बोलतो. त्याला उत्तम साथ दिली ती विराजसने. शिवराज वायचळ आणि विराजस कुलकर्णी या दोघांनी मिळून नाटक लिहिलं आहे आणि नाटकाचं दिग्दर्शनही केलं आहे. नाटकाचं नेपथ्य प्रेम मोहिते, संघर्ष जोगदंडे आणि स्वराली अंबलढगे यांनी केलं आहे. हेमंत चातुर्यने लाइट्स केले आहेत. नाटकाचं संगीत आकाश प्रकाश चौधरीचं आहे. सेट डिझाइन अमेय भालेरावचं आहे. दीड तास शिवराज एकटाच स्टेजवर असतो, पण एकदाही ‘बोअर होतंय किंवा आणखी कोणी कलाकार का नाही,’ असं आपल्याला वाटत नाही. त्याची काळजी या जोडगोळीनं घेतली आहे. विराजस स्टेजवर नसला, तरी त्याचा नाटकात सहभाग आहे आणि तो कसा हे इथं सांगून मी मजा घालवणार नाही. त्यासाठी ‘भंवर’ आवर्जून बघा.


(५ नोव्हेंबर २०२३ला फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध)

टिप्पण्या